शिबानी जोशी
देशात १९५५च्या सुमाराला ग्रामीण भागातच नव्हे, शहरी भागातही अतिशय कमी शैक्षणिक संस्था होत्या. शिक्षणासाठी त्याकाळी मुलांना खूप दूर-दूरपर्यंत जावं लागत असे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेले सामाजिक कार्यकर्ते शैक्षणिक संस्थांची उभारणी करत होते.
मुंबईतही त्या सुमारास अनेक शैक्षणिक संस्थांची उभारणी झाली. मुंबईतील खूपच पुढारलेले उपनगर म्हणजे गोरेगाव. पण गोरेगाव हे त्याकाळी मुंबईमध्ये नव्हतंच. गोरेगावला ग्रामपंचायत होती. गोरेगावमध्ये फळबागा होत्या. क्वचित कुठेतरी शेती होती. गाई-म्हशींचे गोठे होते आणि अवघी २००००ची वस्ती होती. गोरेगावची लोकसंख्या हळूहळू वाढत होती. लोकसंख्या वाढीला जशी पिण्याचे पाणी, वैद्यकीय सुविधा यांची गरज असते तशीच शिक्षणाचीही सोय गरजेची होती. शिक्षणासाठी आजूबाजूच्या गोरगरिबांना जवळ सोय उपलब्ध व्हावी, यासाठी ग. भा. कानिटकर, एकनाथ जोशी, दा. वी. सोवनी, डॉ. य. म. फाटक यांच्यासारखे संघ कार्यकर्ते एकत्र आले आणि त्यांनी संस्था सुरू केली. जागा उपलब्ध नव्हती, तरीही चिरमुले यांच्या घरी पूर्व प्राथमिक वर्ग सुरू करण्यात आले. जागा अपुरी पडू लागल्यावर भाजपचे गोरेगावातले ज्येष्ठ नेते राम नाईक यांच्या तेव्हाच्या दोन खोल्यांच्या घरात वर्ग सुरू झाले. सुरुवातीला केवळ १२ मुलं शाळेत शिकत होती. बैरामजी जीजीभॉय या दानशुराने मंडळाला जागा उपलब्ध करून दिली. प्रामाणिक, चांगल्या कामाला हजारो हात साथ देत असतात त्याप्रमाणे स. दी. वैद्य यांनी विनामूल्य आर्किटेक्चर आणि सिव्हिल इंजिनीअर म्हणून योगदान दिलं आणि सन्मित्रची स्वतःची वास्तू उभी राहिली. मंडळाचं पहिल्यापासून मराठी माध्यमातून शिक्षण देण्याचं धोरण होत. १९६२ साली शाळेचा माध्यमिक विभाग सुरू झाला. १९६९ साली शाळेतून पहिली तुकडी एसएससी परीक्षेला बसली. त्यानंतर आतापर्यंत शाळेतील १३,१४ विद्यार्थी बोर्डाच्या गुणवत्ता यादीमध्ये चमकले आहेत. सुप्रसिद्ध सीए सुनील सप्रे, प्रख्यात डॉक्टर श्रीकांत बडवे हे सन्मित्र मंडळाचे विद्यार्थी आहेत. संस्थेचे सभासद असलेले पालकर यांच्या मुलाचं, गिरिशचं दुर्दैवी निधन झालं. त्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ पालकर यांनी एक लाख रुपयांची देणगी शाळेला दिली. ते एक लाख आणि शासनाकडून मिळालेल्या दोन लाख रुपयांचं अनुदान याच्या बळावर शाळेनं संगणक कक्ष सुरू केला आणि शाळेत विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण द्यायला सुरुवात झाली.
संघाच्या विचारधारेनुसार चालणाऱ्या विद्याभारती या संघटनेच्या शिशुवाटिकेच्या अभ्यासक्रमानुसार सन्मित्र मंडळ येथे शिशुवाटिकेत अभ्यासक्रम चालवला जातो. मानसशास्त्रानुसार सुद्धा असं सिद्ध झालं आहे की, तीन ते सहा वर्षं या वयोगटातील मुलांवर केलेले संस्कार, शिक्षण आयुष्यभर त्यांना साथ देतात आणि म्हणूनच शिशुवाटिकेतील मुलांमध्ये राष्ट्रीय विचार, भारतीय संस्कृती रुजवली, तर ती त्यांना कायम उपयोगी पडेल, या दृष्टीनं विद्या भरतीने शिशुवाटिकेचा अभ्यासक्रम तयार केला आहे. शिशुवाटिकामध्ये लेखन आणि वाचनावर भर नसून मानसिक, शारीरिक, बौद्धिक विकास करण्यासाठी सर्वांगीण विकासावर भर देण्यात आला आहे. उदाहरणार्थ, मुलांमध्ये कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी विविध खेळ घेणे, लिखाणासाठी बोटांचे स्नायू मजबूत व्हावे म्हणून विविध खेळ घेणं, शिक्षकांबरोबर संवाद साधणं, पालक प्रबोधन करण्यासाठी वर्षातून कमीत-कमी पाच वेळा पालक बैठकांचे आयोजन करणं, प्लास्टिकचा वापर न करता पर्यावरणपूरक गोष्टींचा वापर प्रत्यक्षात करणं, आपले सर्व सण, मुलांचे वाढदिवस भारतीय संस्कृतीनुसार साजरे करणं असे उपक्रम शिशुवाटिकेत राबवले जातात. सुरुवातीला केवळ बारा मुलांनी सुरू झालेल्या शाळेत सध्या शिशुवाटिकेत दरवर्षी शंभर विद्यार्थी, प्राथमिक शाळेत २५० विद्यार्थी, तर माध्यमिक शाळेत ६५०हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आज सगळीकडेच मराठी माध्यमाच्या शाळांची स्थिती निराशाजनक आहे, त्याचा थोडा फार फटका सन्मित्र मंडळालाही बसला असला तरी इतर शाळांच्या तुलनेत सन्मित्र मंडळ शाळेची दर्जेदार शिक्षणाची परंपरा पाहून विद्यार्थी संख्या आजही चांगली आहे.
जागतिक स्तरावर इंग्रजी भाषेचे महत्त्व आहे. म्हणून केवळ पुस्तकी ज्ञान न देता शाळाबाह्य उपक्रमही मंडळाने सुरू केला. शाळेचे विद्यार्थी इंग्रजी संभाषणात कच्चे राहू नयेत, यासाठी शाळेच्या वेळेनंतर प्रख्यात प्रशिक्षक मीनल परांजपे यांचा इंग्रजी संभाषणवर्ग शाळेत घेतला जातो. तिसरी ते आठवीतील विद्यार्थी या वर्गांना उपस्थित राहतात. त्यानुसार केंब्रिज विद्यापीठाच्या परीक्षांनाही मुलांना बसवलं जातं. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी दिलेल्या देणगीतून आणखी तीस संगणक घेण्यात आले तसेच माजी महापौर सुनील प्रभू यांनी दिलेल्या एक लाख रुपयांच्या देणगीतून संगणक कक्ष वातानुकूलित करण्यात आला आहे.
मुंबईतल्या नेहरू विज्ञान केंद्रातर्फे दरवर्षी विज्ञान प्रश्नमंजुषा ही स्पर्धा घेण्यात येते, या स्पर्धेत संस्थेच्या विद्यार्थ्यांनी सलग तीन वर्षं विजेतेपद पटकावले आहे. शाळेतील विद्यार्थी ‘संस्कृती ज्ञान परीक्षे’ला बसतात. अशा तऱ्हेने राष्ट्रीय विचाराचं शिक्षण घेऊन बाहेर पडलेले संस्थेचे अनेक विद्यार्थी आज समाजात मोठमोठ्या पदांवर कार्यरत आहेत. इथल्या माजी विद्यार्थ्यांनी ‘सन्मित्र मंडळ माजी विद्यार्थी संघ’ स्थापन केला असून माजी विद्यार्थीही शाळेच्या संपर्कात असतात. अशाच मिळालेल्या विविध देणगीतून प्रोजेक्टर्स, ई-लर्निंग सॉफ्टवेअर, ई-लर्निंग लायब्ररी, गणित पेटी, हेडफोन्स शाळेने विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिले आहेत. मुलांना आनंददायी आणि हसत-खेळत शिक्षण द्यायचं असेल तर त्यांना एका जागी बंदिस्त ठेवता कामा नये, म्हणून शाळेच्या प्राथमिक वर्गांमध्ये बाकं नाहीत. मुलं वर्गामध्ये मुक्त विहार करून हसत-खेळत शिक्षण घेतात. माध्यमिक शाळेत आल्यानंतर त्यांना विद्यार्थीकेंद्री शिक्षण दिले जातं. मुलांनी अभ्यास करायचा असून शिक्षकांनी गरज पडेल तिथेच मार्गदर्शन करावं, असे म्हटले जातं. विद्यार्थ्यांना नुसतं शिकवण्यापेक्षा ई-लर्निंगची व्यवस्था करून देण्यात आल्यामुळे ते थेट धडा शिकू शकतात. त्यामुळे तो अभ्यास लवकर आत्मसात व्हायला मदत होते.
२०१८ साली झालेल्या हीरक महोत्सवानिमित्त शाळेनं विविध उपक्रम राबवले. शिक्षक प्रशिक्षण, योग प्रशिक्षण कार्यशाळा, शिक्षकांसाठी अर्थनियोजन मार्गदर्शन, शिक्षकांना संगणक प्रशिक्षण, राष्ट्रभक्तीपर गीत गायन स्पर्धा, रनिंग डिक्टेशन स्पर्धा, कोलाज काम स्पर्धा असे उपक्रम आयोजित केले होते.
शाळा म्हणजे केवळ विद्यार्थ्यांचा विकास नाही, तर तिथले शिक्षक, कर्मचारी, माजी विद्यार्थी, आजूबाजूचा परिसर याचाही विचार होत असतो आणि त्यामुळे संस्थेशी निगडित असलेल्या सर्व स्तरावर सन्मित्र मंडळ काम करत आहे. ‘ज्ञान शील बलोपासना’ हे शाळेचे ब्रीदवाक्य आहे. निव्वळ ज्ञान नाही, तर शील आणि शक्तीची उपासना करणं हे संस्थेचे ब्रीद आहे. २०१८ साली सन्मित्र मंडळाच्या हीरक महोत्सवी कार्यक्रमाला तत्कालीन शिक्षणमंत्री विनोद तावडे उपस्थित होते. गुणवत्तेच्या आधारावर मराठी माध्यमाचा केलेला विकास, मातृभाषेतून शिक्षणाचा पुरस्कार करणाऱ्या, नवभारताची नवी पिढी घडवणाऱ्या अशा महाराष्ट्रातल्या शाळांचा अभिमान वाटतो, अशा शब्दांत विनोद तावडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. यातच संस्थेने ध्येय गाठण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे सार लक्षात येतं.