१०० वर्षपूर्ती निमित्ताने बाबासाहेब पुरंदरे यांनी एका मराठी टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या चरित्राच्या प्रवासाचा उलगडा करताना अनेक आठवणींना उजाळा दिला होता.
केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यसन
१०० वर्षांचा झालोय, मात्र मी काही वेगळं केलेलं नाही. या आयुष्यात कसंलही व्यसन केलं नाही, कुठल्याही औषध, गोळ्या घेतल्या नाहीत. एकच व्यसन होतं, ते छत्रपती शिवाजी महाराजांचं. शिवचरित्राचं काम हाती घेतल्यानंतर एकदा जो मी शिवाजी महाराजांच्या चबुतऱ्याला चिकटलो ते चिकटलोच. मग माघार घेतली नाही. पाय चालत होते, तोवर डोंगर चढत राहिलो.
मी देखील लहानपणी मार खाल्ला
बाबासाहेब पुरंदरे यांनी आपल्या बालपणीच्या आठवणींनाही उजाळा दिला होता. सोबतच शिवचरित्राचा प्रवासदेखील उलगडवून सांगितला. लहानपणी आपणदेखील काही करामतींमुळं मोठ्या लोकांचा मार खाल्ला असल्याचं त्यांनी सांगितलं होते. आम्ही पावनेदोनशे तरुण पोरांनी पोर्तुगीजांवर हल्ला केला होता. परीक्षेला बसताना जसं वातावरण होतं, तसं त्यावेळची स्थिती होती. त्यावेळी पाऊस सुरू होता, त्यावेळी आम्ही नदी-नाले पार करत त्या ठिकाणापर्यंत पोहोचलो होतो, असं त्यांनी सांगितलं.
महाराजांबद्दलचा आदर शब्दांमधून नव्हे, तर कृतीमधून दिसावा
मराठी संस्कृती, मराठी परंपरेवर केलेल्या अभ्यासावर बोलताना, हे मला सहज मिळालं. माझ्या घरातूनच मला हे संस्कार मिळाले. माझे आईवडील, माझे भाऊ यांच्याकडून हे संस्कार मिळाले. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर हा शब्दांमधून नाही, तर कृतीमधून दिसावा, असं बाबासाहेब पुरंदरे म्हणाले होते.
ब. मो. पुरंदरे ते शिवशाहीर बाबासाहेब
बाबासाहेब पुरंदरे यांचे मूळ नाव बळवंत मोरेश्वर पुरंदरे होते. त्यांचा जन्म २९ जुलै १९२२ रोजी झाला. त्यांच्यावर असलेल्या प्रेमापोटी, आदराने त्यांना बाबासाहेब पुरंदरे असे म्हटले जाऊ लागले. जवळपास सात दशके त्यांनी इतिहास संशोधनाचे कार्य केले. पहिल्यांदा ते १९४१मध्ये भारत इतिहास संशोधक मंडळात सहभागी झाले होते. इतिहाससंशोधक ग. ह. खरे यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले होते. पुणे विद्यापीठाच्या ‘मराठा इतिहासाची शकावली-१७४० ते १७६४’ या भारत इतिहास संशोधन मंडळात झालेल्या संशोधन प्रकल्पात बाबासाहेब पुरंदरे संशोधक म्हणून सहभागी झाले होते. महाराष्ट्र सरकारने बाबासाहेबांना २०१५मध्ये राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘महाराष्ट्रभूषण’ देऊन गौरव केला होता. बाबासाहेब पुरंदरे यांनी महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचा आणि मराठा साम्राज्य आणि शिवकालीन ऐतिहासिक दस्तऐवजांचा सखोल अभ्यास केला होता. इतिहास संशोधनात केलेल्या कार्याची दखल घेत त्यांचा पद्मविभूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला होता. बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवचरित्रावर देश-विदेशात सुमारे १२ हजारांपेक्षा अधिक व्याख्याने दिली आहेत
विपूल ग्रंथसंपदा : ‘राजा शिवछत्रपती’ ग्रंथाच्या १६ आवृत्त्या; पाच लाखांहून अधिक प्रती प्रकाशित
बाबासाहेब पुरंदरे यांनी मुख्यत्वे ऐतिहासिक विषयांवर वर्णनात्मक लेखन केले. त्याशिवाय, ललित कादंबरी लेखन, नाट्यलेखनही केले. ‘जाणता राजा’ या ऐतिहासिक गाजलेल्या नाटकाचे दिग्दर्शन केले. ‘सावित्री’, ‘जाळत्या ठिणग्या’, ‘मुजऱ्याचे मानकरी’, ‘राजा शिवछत्रपती’, ‘महाराज’, ‘शेलारखिंड’, ‘पुरंदऱ्यांचा सरकारवाडा’, ‘शनवारवाड्यातील शमादान’, ‘शिलंगणाचं सोनं’, ‘पुरंदरच्या बुरुजावरून’, ‘कलावंतिणीचा सज्जा’, ‘महाराजांची राजचिन्हे’, ‘पुरंदऱ्यांची नौबत’ आदी साहित्य प्रकाशित झाले आहे. राजा शिवछत्रपती या ग्रंथाच्या १६ आवृत्त्या प्रकाशित झाल्या असून ५ लाखांहून अधिक प्रती प्रकाशित झाल्या आहेत.
त्यांची शाबासकीची थाप कायम लक्षात राहील…
शिवशाहीर श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे यांनी काल शेवटचा श्वास घेतला. मंगेशकर हॉस्पिटलमध्ये मागील १५ दिवसांपासून चालू असलेली त्यांची लढाई विसावली.
छत्रपती शिवरायांचा इतिहास ‘जाणता राजा’च्या माध्यमातून मांडतांना त्यांनी केवळ महाराष्ट्रालाच नव्हे, तर साऱ्या जगाला पालथे घातले. अगदी आंग्ल भूमीतदेखील शिवरायांचा जयजयकार आसमंतात घुमला. गोनिदांच्या समवेत सह्याद्रीच्या कुशीतील गड-किल्ल्यांची भ्रमंती करताना तेथील भूगोल व इतिहास यांची सांगड त्यांनी आपल्या व्याख्यांनातून नेहमीच घातली. त्यामुळे आदरणीय बाबासाहेबांच्या अमोघ वाणीचे आकर्षण अगदी बालपणापासून होते.
संस्थानिक वारसा जपणारे आमच्या इस्लामपूरचे श्रीमंत दादासाहेब पंत मंत्री यांच्या स्नेहांतून बाबासाहेबांचे आमच्या गावी वारंवार येणे व्हायचे. माझे आजोबा स्व. डॉ. व्ही. एस. नेर्लेकर यांचे ते पुण्यातील शाळेतले सहध्यायी! त्यामुळे आम्हा कुटुंबाचे बाबासाहेबांशी ऋणानुबंध मनोमन जुळले होते. घरी आल्यानंतर आक्काला (माझी आई) न जमलेल्या फुलक्यांऐवजी पुरी खाताना दगडापेक्षा वीट मऊ आहे, अशी मिश्किल दाद द्यायला ते विसरले नव्हते हे आठवल्यावर आजही नकळत हसू उमटते.
शाळेत असताना त्यांच्या हातून बक्षीस घेतांना व पाठीवर शाबासकीची थाप पडल्यानंतर अभिमानाने ऊर भरुन येत असे. बक्षीस समारंभात त्यांनी दिलेल्या मंत्राप्रमाणे ‘सरस्वतीच्या भक्तांनी आचार कधी सोडू नये आणि लाचार कधी होऊ नये,’ हे शब्द कायम कानांत रुंजी घालत. सह्यादीच्या कडेकपारींतल्या गरीब मावळ्यांत छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची संकल्पना रुजवली. ३५० वर्षानंतर तोच प्रेरणादायी इतिहास जाणता राजाच्या स्वरूपात सादर करताना ‘दार उघड बये, दार उघड …’ असं देवी जगदंबेला साकडं घालणाऱ्या त्यांच्या आवाजाने इतिहासाची पानं पुन्हा सजीव होत होती. त्यामुळे इस्लामपुरातील नाट्यप्रयोगावेळी माझ्यासह माझे वडील डॉ. एन. टी. घट्टे, त्यांचे स्नेही अॅड. व्ही. एम. पंडितराव यांना छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकात सहभागी होण्याचा मोह आवरला नव्हता.
तिथीप्रमाणे या नागपंचमीला बाबासाहेबांनी १००व्या वर्षात पाऊल टाकले. त्यांच्या शताब्दीसाठी त्यांचे अभिष्टचिंतन करण्यासाठी विनायक धारणे यांच्यासोबत आम्ही महिनाभरापूर्वी त्यांचे घर गाठले. इतिहासाच्या पाऊलखुणा तसेच गत आयुष्यातील अनेक घडामोडी त्यांना लख्ख आठवत होत्या. पप्पांना यापूर्वीच्या भेटीतील अनेक गोष्टीची ते आठवण करुन देत होते. शरीर थकले होते; मात्र त्यांचा उत्साह तसूभरही कमी झालेला नव्हता, याची पदोपदी जाणीव होत होती. शिवसृष्टीसह अनेक उपक्रम त्यांना खुणावत होते. त्याबद्दल ते भरभरुन बोलत होते. वेळ भरभर जात होता, पण तिथून पाय निघत नव्हता. आमचे मार्गदर्शक स्नेही डॉ. सागर देशपांडे यांनी संपादित केलेल्या बेलभंडारा या पुस्तकावर त्यांनी थरथरत्या हाताने स्वाक्षरी केली. त्यांनी स्वाक्षरी केलेले हे पुस्तक माझ्या परिवारासाठी अत्यंत अनमोल ठेवा आहे. – मितेश घट्टे, अपर पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण
———-
बाबासाहेब आणि ‘मराठमोळं मुलुंड’
बाबासाहेब निवर्तल्याची बातमी काल सकाळी कानावर पडली आणि सिनेमामधील फ्लॅशबॅकसारखं चित्र डोळ्यांसमोर उभे राहिले. तो जुलै महिना होता. २०१४मध्ये आपल्या ‘मराठमोळं मुलुंड’ संस्थेची स्थापना होण्यापूर्वी म्हणजेच एक महिन्याअगोदर मी, सुकृत खांडेकर व प्रकाश वाघ आम्ही तिघेही बाबासाहेब पुरंदरे यांची भेट घेण्याकरिता पुण्यातील पर्वतीच्या पायथ्यापाशी पुरंदरे वाड्यात आलो होतो. आम्ही तिघेही खूपच टेन्शनमध्ये होतो की, त्यांना फेस करायचे? त्यांच्याशी बोलण्याला सुरुवात कशी करायची? सुरुवात कोण करणार वगैरे, वगैरे, कारणही तसंच होतं. त्यांच्याबद्दल ते किती स्ट्रिक्ट आणि शिस्तबद्ध आहेत, याबद्दल बऱ्याच जणांकडून ऐकलं होतं.
याअगोदर बाबासाहेबांना पडद्यावर किंवा कार्यक्रमात लांबूनच पाहिलेलं होतं आणि आज आमची पहिलीच वेळ होती, की आम्ही त्यांना प्रत्यक्ष भेटणार होतो. त्यांच्याशी बोलणार होतो. बाबासाहेबांचे मदतनीस/सहकारी प्रतापराव टिपरे यांनी आम्हाला त्यांच्या दर्शनी हॉलमध्ये बसण्यास विनंती केली. तो हॉल म्हणजे शस्त्रागार असल्याचा भास होत होता. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ढाली, तलवारी, भाले, धनुष्य,बाण दानपट्टा, गदा, लढाईच्या सर्व साहित्यांची छानप्रकारे मांडणी केलेली होती. आम्ही तिघेही सर्व हत्यारांचे निरीक्षण करीत होतो. इतक्यात सफेद लांब दाढी वाढलेली, डोक्यावर मोकळे सोडलेले पांढरे शुभ्र केस, पांढरे शुभ्र धोतर नेसलेले हातामध्ये सदरा घेऊन बाबासाहेब आम्ही असलेल्या हॉलमध्ये प्रवेश करते झाले. आम्ही तिघेही उठून उभे राहिलो. सर्वप्रथम मी पुढे येऊन त्यांना चरणस्पर्श केला व नमस्कार केला. त्यानंतर, सुकृत व वाघसाहेब दोघेही जण आले व त्यांनी चरणस्पर्श करून नमस्कार केला. बाबासाहेब साहेबांनी बसण्याची विनंती केली. आम्ही तिघेही अगदी लहान मुलांसारखे त्यांच्या आज्ञेचे पालन करून शांतपणे, शिस्तबद्ध विद्यार्थ्यांप्रमाणे बसलो. बाबासाहेबांनी विचारले, काय नियोजन आहे? मी म्हटलं, आम्हाला आमच्या संस्थेची आपल्या हस्ते स्थापना करावयाची आहे. बाबासाहेबांनी आपल्या संस्थेचे नाव काय आहे?, असं विचारलं. मी म्हटलं, ‘मराठमोळं मुलुंड’. बाबासाहेबांनी भुवई वर केली आणि सुंदर स्मित करून ते म्हणाले वा! खूप सुंदर नाव आहे, तुमच्या संस्थेचं. मग मी सुकृत सरांनी त्यांना आपल्या संस्थेची ध्येय व उद्दिष्टे सांगितली. ती ऐकून घेतल्यानंतर ते एकदम खुश झाले व म्हणाले मी नक्कीच येईन.
आम्ही निघताना ते म्हणाले, माझा आशीर्वाद आहे, घोडदौड सुरू करा. यश नक्की तुमचंच आहे, असा आशीर्वाद त्यांनी आम्हाला दिला. त्यांचा आशिर्वाद घेऊन आम्ही परतलो, ते त्यांच्या आठवणी घेऊनच… २१ ऑगस्ट २०१४ महाकवी कालिदास नाट्यगृह, मुलुंड येथे बाबासाहेबांचा आशीर्वाद घेऊन संस्थेची मुहूर्तमेढ रोवली.
मला विश्वास आहे की, एवढ्या महान व्यक्तीच्या आशीर्वादाने ‘मराठमोळं मुलुंड’ या संस्थेला आपण सुरुवात केली आहे, यश तर आपण नक्कीच मिळवू आणि त्यांना जे वचन दिले की, आम्ही मुलुंडमधील सर्व थरातील मराठी भाषिकांना एकत्र आणू व आपली संस्कृती परंपरा जोपासू. ती पूर्ण करू. हीच त्यांना ‘मराठमोळं मुलुंड’ संस्थेतील सर्व सभासदांतर्फे श्रद्धांजली असेल. – हेमंत मोरे, अध्यक्ष,‘मराठमोळं मुलुंड’
शिवशाहीर आणि मी
बाबासाहेबांना भेटणं म्हणजे संचार झाल्यासारखं व्हायचं. एकदा नागपुरहून रेल्वेनं पुण्याला येत होतो. वाचत बसल्यानं बारा वाजून गेल्याचं लक्षातच आलं नाही. अख्ख्यी बोगी झोपलेली. मी झोपण्याआधी हात धुऊन बर्थकडे निघालो असताना पडद्याच्या इवल्याशा फटीतून वाचत बसलेले बाबासाहेब असावेत असं वाटलं. इतक्या रात्री पडदा सरकवणार कसा? पण केलं धाडस, बघतोय तर होय, बाबासाहेबच बसलेले. प्रतापची माझी तीतकी ओळख नव्हती. त्यामुळे तो मला ढकलणार तितक्यात बाबासाहेबांनी त्याला खुणेनं नको ढकलू… बसू दे त्याला म्हणून खुण करत, मला बसण्यासाठी हातानं खुणावलं. मी बसतोय तोवर प्रतापने सांगितले की, ‘ सलगतेने खुप व्याख्यानं झालीत. त्यांच्या घशाला त्रास झाल्यानं डॉक्टरांनी त्यांनी बोलायचं नाही म्हणून सक्त सुचना केली आहे. त्यामुळे गुपचूप बसायचं.‘ त्यावर मी म्हणालो, ‘मला कुठं बोलायचं-ऐकायचंय? मला त्यांच्या जवळ पाच मिनिटं बसायला मिळालं तरी बस्स… ‘माझ्या चपखलपणावर बाबासाहेब खुदकन् हसले. पाच मिनिटं होऊन गेल्यावर बाबासाहेबांनी मला हातानं खुणावलं की, ‘मला बोलायचं नसलं म्हणून काय, तू बोल मी ऐकतो‘
क्षणार्थात हात जोडले आणि म्हणालो, ‘स्वातंत्र्यवीर, शिवशाहिर आणि मी, हा किस्सा सांगू का?’ माझ्या या प्रश्नावर त्यांनी इतके केलेले मोठ्ठे डोळे आजही आठवतात. डोळे मोठे करून हातानं, सांग सांग अशी त्यांनी खुण केली. त्यानंतर मी खडाखड बोलत होतो ते बोल असे थेट काळजातून येत होते अन् बाबासाहेबांच्या चेहऱ्यावर ते त्यांना आवडंतय हे कळत होतं. अखेर डॉक्टरांनी न बोलण्याची घातलेलं बंधन बाबासाहेबांना तोडावं लागलं.
त्यानंतर अनेक भेटी झाल्या. प्रत्येक दुर्ग संमेलनानंतर सुदामदादा गायकवाडांच्या सोबत बाबासाहेबांना भेटणं आणि झाल्या संमेलानाचा वृत्तांत सांगून त्यांचा आशिर्वाद घेणं हे नेहमी सुरू राहिलं. मुळांत त्यांना भेटणं हे माझ्या माझ्यासाठी एक पुर्ण संमेलन होतं. यापुढेही दुर्ग संमेलन होत राहतील. मात्र त्यानंतर त्यांच्या भेटीचं संमेलन संपलं! – दीपक प्रभावळकर, सातारा