Wednesday, April 23, 2025
Homeताज्या घडामोडीआरोग्य भरती परीक्षांपाठोपाठ टीईटीच्या तारखेचाही गोंधळ!

आरोग्य भरती परीक्षांपाठोपाठ टीईटीच्या तारखेचाही गोंधळ!

राज्यातील विद्यार्थ्यांना बसणार फटका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : आरोग्य विभागातील पदांच्या भरती परीक्षांच्या वेळी गोंधळ झाला असतानाच, आता शिक्षक पात्रता परीक्षेच्या (टीईटी) तारखा ठरविण्यातही गोंधळ झाला आहे. टीईटीची परीक्षा २१ नोव्हेंबर रोजी जाहीर केली असतानाच, त्याचदिवशी एनईटी (राष्ट्रीय पात्रता परीक्षा) होणार आहे. त्याचा फटका राज्यातील शेकडो विद्यार्थ्यांना बसणार आहे.

या प्रकाराकडे कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी लक्ष वेधले असून, परीक्षेची तारीख बदलण्याची मागणी केली आहे. कोरोना आपत्तीच्या काळानंतर राज्यात शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) घोळ सुरू आहे. यापूर्वी या परीक्षेचे वेळापत्रक तीन वेळा बदलण्यात आले.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने यापूर्वी १० ऑक्टोबर रोजी परीक्षा घेण्याचे जाहीर केले होते. मात्र, त्याचदिवशी यूपीएससीची परीक्षा होती. त्यामुळे ३१ ऑक्टोबर रोजी परीक्षा जाहीर करण्यात आली. त्याचदिवशी आरोग्य विभागाने भरतीसाठी परीक्षा घेतली. त्यामुळे परीक्षेची तारीख ३० ऑक्टोबर करण्यात आली होती.

परंतु, नांदेड जिल्ह्यातील देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघात ३० ऑक्टोबर रोजी पोटनिवडणूक होत आहे. त्यामुळे पुन्हा तारीख बदलून २१ नोव्हेंबर ठेवण्यात आली आहे. मात्र, ही तारीख ठरविताना, केंद्रीय स्तरावरून होणाऱ्या राष्ट्रीय पात्रता परीक्षेचे (एनईटी) वेळापत्रक लक्षात घेण्यात आले नाही. एनईटी परीक्षेला २० ऑक्टोबरपासून सुरुवात झाली असून, ती ५ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे २१ नोव्हेंबर रोजी एनईटीची परीक्षा देणाऱ्या तरुण-तरुणींना टीईटी परीक्षेला मुकावे लागणार आहे.

राज्य परीक्षा परिषदेच्या नियोजनशून्य व बेफिकीर कारभारामुळे शेकडो विद्यार्थ्यांना टीईटी वा एनईटी यापैकी एकच परीक्षा द्यावी लागणार आहे.

या प्रकाराबद्दल आमदार निरंजन डावखरे यांनी टीका केली असून यूपीएससी, एमपीएससी आणि परीक्षा मंडळांबरोबर समन्वय साधून टीईटीची परीक्षेची तारीख निश्चित करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -