विनायक बेटावदकर, ज्येष्ठ पत्रकार (कल्याण)
जवळ-जवळ तीन वर्षांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साजऱ्या होणाऱ्या दिवाळीनिमित्त आपण सर्वांनीच अनेक प्रकारांनी सावधानता बाळगली पाहिजे. अवतीभवती वावरणाऱ्या व्यक्तींचाही विचार करणे महत्त्वाचे आहे.
शाळा नुकत्याच सुरू झाल्याने, त्यातही काही शाळांच्या परीक्षा नुकत्याच झाल्या. काहींच्या सुरू आहेत. तर काहींच्या दिवाळीनंतर होणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे बच्चेकंपनी पूर्णपणे अभ्यासमुक्त, तणावमुक्त झालेली नाही. हे फटाके उडवताना सर्वांनी ध्यानात घेतले पाहिजे.
दिवाळीनंतर काही महिन्यांनी या भागात होणाऱ्या महापालिका निवडणुकांचेही वेध लागले असल्याने सध्या तरी कार्यकर्त्यांचे पेव फुटल्याप्रमाणे गल्लोगल्ली कार्यकर्ते दिसू लागले आहेत. ज्या व्यक्ती आपणा कुणालाही कधी दिसल्या नाहीत. अशा व्यक्ती वाढदिवसाच्या निमित्ताने, किंवा राजकीय नेत्यांच्या स्वागताच्या निमित्ताने बॅनरवर स्वत:च्या फोटोसह स्वागत करताना, तसेच अनेकविधी कार्यक्रमांचे आयोजन करताना दिसत आहेत. निरनिराळ्या शिबिरांच्या नावाने लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांना मोठा प्रतिसाद मिळून गर्दी होत असली, तरी अद्यापही कोरोनाचा धोका पूर्णपणे टळलेला नाही, हे सर्वांनी लक्षात घेऊन कोरोना नियमांचे पालन केले पाहिजे. कोरोनाबरोबरच बदलत्या वातावरणामुळे शहर व ग्रामीण भागातही डेंग्यू, हिवताप, विषमज्वर यांचे रुग्णही काही प्रमाणात आढळत असल्याने गर्दी टाळण्याबरोबरच स्वच्छतेचीही प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे.
ज्यांना कोरोना झाला होता, तसेच ज्यांच्या घरात लहान मुले आहेत, त्यांनी दिवाळीच्या फराळावर लक्ष ठेवणे, तसेच तळलेले चमचमीत तिखट व अतिगोड पदार्थ, तुपातली मिठाई कमी खाणे किंवा न खाणेच बरे आहे. आणखी एक गोष्ट लक्षात घेणे खूप महत्त्वाचे आहे. कोरोनामुळे रोजगार गेलेल्या मध्यमवर्गीयांची संख्याही मोठ्या प्रमाणावर आहे. आपण त्यांना आपल्या फटाक्यांतील अन् नवीन कपड्यांतील काही वाटा देऊन त्यांनाही आपल्या आनंदात सहभागी करून घेतले, तर सर्वांनाच खूप बरे वाटेल. अनेकांच्या घरच्या आर्थिक परिस्थितीत बदल झाल्याने अद्यापही स्थलांतरितांचे प्रश्न पूर्णपणे सुटलेले नाहीत. अशावेळी महिलांनी संघटित होऊन घरगुती फराळाचे पदार्थ बनवून ते आपसांत वाटून घेतले किंवा अल्प किमतीला विकता आले, तर त्यातून काही प्रमाणात आर्थिक सहाय्यही मिळू शकेल. कुटुंबालाही घरचा आरोग्यदायी फराळ मिळू शकेल. कल्याण-डोंबिवली महापालिकेने मुख्यालयाबाहेरच महिला गटांना निरनिराळे स्टॉल टाकून दिले आहेत, ते स्वागतार्हच आहे.
यावर्षी फटाके उडवताना विशेष काळजी घेणे जरुरीचे आहे. ज्यांना कोरोना होऊन गेला, त्यांची ऑक्सिजन लेव्हल कमी झालेली असते. किंवा ज्यांना श्वसनाचा विकार आहे, त्यांना फटाक्यांच्या धुराचा खूप त्रास होतो. त्यांना मोठा आवाजही सहन होत नाही. या सर्वांचे फटाके उडवताना भान ठेवले पाहिजे.
महापालिकेचे सध्या कायापालट अभियान सुरू आहे. त्यात सफाई कामगारांसह सामाजिक संस्थांचाही चांगला प्रतिसाद मिळत असल्याने कचऱ्याची वर्गवारी करून कचरा कचरागाडीत टाकणे, हे आपले कर्तव्य आहे. दिवाळीत आपण उडवलेल्या फटाक्यांचा मोठा कचरा होतो. हे लक्षात घेऊन कोठेही कचरा राहणार नाही, याची सर्वांनी दक्षता बाळगली पाहिजे.
पूर्वी वाडा संस्कृती होती, मुंबईत चाळीतूनही मध्यमवर्गीय गिरणी कामगारांमध्ये सामूहिक दिवाळी साजरी करण्याची पद्धत होती. अभ्यंगस्नान झाल्यावर चाळीतील किंवा वाड्यातील मुले एकत्र जमत. कुटुंबातील मंडळी त्यांना घरी केलेल्या फराळाचे पदार्थ खायला देत. यावर्षी कोरोनामुळे ज्यांच्या कुटुंबात दु:खद घटना घडल्याने यंदा दिवाळी नाही, अशा मुलांना दिवाळीत फराळाला घरी बोलवावे, शक्य झाल्यास स्त्रियांना साड्या, आवश्यकतेप्रमाणे कपडे द्यावेत. काही सोसायट्यांतील लोक एकत्र येऊन आर्थिक निधीच्या सहाय्याने अशा मंडळींना पूर्णपणे नाही, पण काही प्रमाणात आनंद मिळवून देऊ शकतात.
कोरोनाबरोबरच यावर्षी आणखी एक संकट महाराष्ट्रावर कोसळले. महाराष्ट्रात कोकणपट्टी, कल्याण-डोंबिवली शहरी ग्रामीण भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेकांची घरे पडली, लोक बेघर झाले. त्यांना शासनाकडून सहाय्य देण्याचे काम सुरू झाले आहे. पण, त्यांना सहाय्य करण्यात आपणही ‘खारीचा वाटा’ उचलला, तर सर्वांचाच दिवाळीचा आनंद द्विगुणित होऊन त्यांना मानसिक आधार मिळू शकेल.