Saturday, May 18, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखअग्रलेख : ७५ हजार कोटींचे प्रकल्प; महाआघाडीचा कद्रूपणा

अग्रलेख : ७५ हजार कोटींचे प्रकल्प; महाआघाडीचा कद्रूपणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या नागपूरच्या एक दिवसाच्या भेटीत महाराष्ट्रासाठी पंचाहत्तर हजार कोटींच्या विकास प्रकल्पांचे भूमिपूजन केले आणि उद्घाटन केले, पण त्याचे मोठ्या मनाने स्वागत करायला महाआघाडीच्या नेत्यांची दातखीळ बसली असावी. देशाच्या कोणत्याही सरकारने महाराष्ट्राला एवढे विकासाचे प्रकल्प एकाच वेळी दिले नव्हते, पण महाराष्ट्रात भाजपचे डबल इंजिन असल्याने विकासाला कशी विलक्षण गती मिळू शकते, हे समृद्धी महामार्गाने दाखवून दिले. केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या सरकारचे ‘सबका साथ, सबका विकास’ हे ध्येय आहे. सर्वांना बरोबर घेऊन देशाला महासत्तेकडे न्यायचे ही मोदी सरकारच्या कामकाजाची दिशा आहे. राजकारण हे निवडणुकीपुरते असते. पण निवडणूक संपली की, विकास हा एकच मंत्र घेऊन काम करायचे, असे हे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या जोडीने देशाला दाखवून दिले. राज्याची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर यांना जोडणारा समृद्धी महामार्ग हे देवेंद्र फडणवीस यांचे स्वप्न होते. ते मुख्यमंत्री असताना हे स्वप्न त्यांनी बोलून दाखवले व एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना ते साकार झाले. समृद्धी मार्गाचे उद्घाटन करताना, ‘‘महाराष्ट्राच्या विकासातील अकरा तारे उदयाला येत आहेत, त्यातला पहिला तारा समृद्धी मार्ग’’, असे उद्गार पंतप्रधानांनी काढले. मुंबई-नागपूर या महामार्ग प्रकल्पातील नागपूर-शिर्डी या ५२० किमी पहिल्या टप्प्याचे उद्घाटन व अकरा प्रकल्पांची पायाभरणी व भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते झाले.

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला काही जणांचा (अगोदर सत्तेवर असलेल्या) विरोध होता. भूसंपादनात अडचणी आल्या व निर्माण केल्या गेल्या. शेतकऱ्यांमध्ये संभ्रम पेरला गेला. पण सर्व अडचणींवर मात करून शिंदे-फडणवीस या जोडीने हे शिवधनुष्य पेलून दाखवले. हीच महाआघाडीला पोटदुखी असावी. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आशीर्वाद आणि केंद्र सरकारची भक्कम साथ यातून महाराष्ट्राचा समृद्धी मार्ग साकारला. अत्याधुनिक सोयी-सुविधांनी युक्त अशा नागपूर-विलासपूर वंदे भारत एक्स्प्रेसला पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवला. नागपूर मेट्रो १ चे लोकार्पण, तर मेट्रो २चे भूमिपूजन पार पडले. नागपूर-अजनी रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाचा शुभारंभ झाला. नागपूर-मुंबई ७०१ किमी अंतराचा समृद्धी महामार्ग आहे. पंचावन्न हजार कोटी खर्च आहे. राज्यातील दहा जिल्हे व ३९० गावे जोडली जाणार आहेत. मुंबई ते नागपूर हे अंतर समृद्धी महामार्गामुळे केवळ आठ तासांत पार करता येणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या शब्दांत सांगायचे, तर ‘समृद्धी महामार्ग हा गेमचेंजर ठरणार आहे.’ महामार्गाच्या लगत अशी चाैदा पर्यटन स्थळे जोडली गेली आहेत.

समृद्धी मार्ग हा महाराष्ट्राच्या विकासातील मैलाचा दगड ठरणार आहे. समृद्धीमुळे उद्योग व्यापाराला मोठी चालना मिळेल. गुंतवणूक व रोजगार प्रचंड वाढेल. राज्याच्या ३६ टक्के लोकसंख्येला लाभ होईल, समृद्धीच्या दुतर्फा अकरा लाख झाडे लावली जाणार आहेत. मोठे, छोटे पूल, उड्डाणपूल अनेक आहेत. येत्या वर्षभरात समृद्धीवरून थेट मुंबईत येता येईल, अशा वेगाने काम चालू आहे. सरकारची इच्छाशक्ती असेल, तर विकास कसा वेगाने साधता येतो, हे शिंदे-फडणवीस यांच्या जोडीने देशाला दाखवून दिले. स्वत: पंतप्रधानांनी त्यांच्या कामाचे व कार्यक्षमतेचे जाहीरपणे कौतुक केले. स्वत: पंतप्रधानांनी गोसीखुर्द प्रकल्पाचे उदाहरण आपल्या भाषणातून दिले. तीस वर्षांपूर्वी त्याचा खर्च केवळ ४०० कोटी रुपये होता. काँग्रेसच्या काळात तर त्या प्रकल्पाची मोठी उपेक्षाच झाली. याच प्रकल्पाची किमत आता अठरा हजार कोटींवर पोहोचली. राज्यात डबल इंजिन सरकार आल्यावर गोसीखुर्दला गती कशी मिळाली, हे स्वत: पंतप्रधानांनी सांगितले.

पंतप्रधान जिथे जातात त्या ठिकाणी तेथील वातावरणाशी व जनतेच्या भावनांशी समरस होऊन बोलतात हा नेहमीचा अनुभव आहे. समृद्धी महामार्गाचे उद्घाटन झाले त्या दिवशी संकष्टी चतुर्थी होती. पंतप्रधानांच्या हे लक्षात होते. त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवातच मराठीतून करून लोकांची मने जिंकली. ‘‘आज संकष्टी चतुर्थी आहे, कोणतेही शुभ काम करताना आपण प्रथम गणेश पूजन करतो, नागपुरात असल्याने मी प्रथम टेकडीच्या गणपती बाप्पाला वंदन करतो’’, असे सांगताना मोदींनी गणेशावर आपली भक्तीही प्रकट केली. मोदींच्या भाषणातून व कामातून काही चांगले स्वीकारण्याची विरोधी पक्षांची तयारी नाही, हेच त्यांच्या नागपूरमधील कार्यक्रमानंतर दिसून आले. विकास प्रकल्पांचे स्वागत करून सरकारला साथ देण्याऐवजी नागपूरच्या कार्यक्रमातील खुसपटे काढण्यातच महाआघाडीच्या नेत्यांना धन्यता वाटली. मोदींनी आपल्या भाषणात शॉर्टकट राजकारणावर टीका केली, त्यांचा रोख राजकारणातील रेवडी कल्चरकडे होता. काही राजकीय पक्षांकडे करदात्यांची कमाई उधळण्याची विकृती आहे. सत्तेत येण्यासाठी ते शॉर्टकट राजकारण करीत असतात. देशाचा विकास शॉर्टकट राजकारणाने कधीच होत नसतो. काही पक्ष अशाने अर्थव्यवस्था नष्ट करण्याचा प्रयत्न करतात, असे त्यांनी सुनावले.

खरे तर त्यांनी वास्तव चित्र मांडले. पण शिवसेना व अन्य विरोधकांना ते पचले नाही. अवैध व असंविधानिक सरकारने आणून भाजप लोकशाही कमकुवत बनवत आहे व सत्तेसाठी शॉर्टकटचा लाभ उठवत आहे, अशी टीका करण्यापर्यंत मजल गेली. एवढेच नव्हे, तर पंतप्रधानांच्या मंचावर राज्यपाल कसे? असा हास्यास्पद प्रश्नही त्यांनी विचारला. पंतप्रधानांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेली शाबासकीही विरोधकांच्या पचनी पडली नसावी. प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेले म्हणून आक्रोश करणारे महाआघाडीचे नेते ७५ हजार कोटींचे प्रकल्प येत आहेत त्यावर ‘ब्र’ही उच्चारत नाहीत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -