नाशिक : नाशिकमध्ये सायबर फसवणुकीची एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुंबई दहशतवाद विरोधी पथकाचे (Mumbai ATS) नाव सांगून सायबर गुन्हेगारांनी एका नामांकित वाहन निर्मिती कंपनीच्या मॅनेजरला 'डिजिटल अरेस्ट'ची (Digital Arrest) भीती दाखवत तब्बल ८९ लाख ९९ हजार रुपयांचा गंडा घातला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) चौकशीच्या नावाखाली ही अवाढव्य फसवणूक करण्यात आल्याने नाशिकमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. (Cyber Fraud)
अहवालानुसार, संबंधित गुन्हेगारांनी स्वतःला मुंबई एटीएसचे अधिकारी असल्याचे भासवून मॅनेजरशी संपर्क साधला आणि त्यांना गंभीर परिणामांची भीती दाखवून धमकावले. आंतरराष्ट्रीय दहशतवादी आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात तुमचे नाव आले असल्याचे सांगून आरोपींनी मॅनेजरला आपल्या जाळ्यात ओढले. आरोपींनी मॅनेजरचे आधार कार्ड वापरून दहशतवादी आदिल गौरी याने जम्मूमध्ये बनावट बँक खाते उघडल्याची खोटी भीती घातली. (Cyber Fraud)
https://www.prahaar.in/2026/08/30/mohan-bhagwat-religions-may-differ-but-humanity-is-one-mohan-bhagwats-message-of-unity-from-madison-square-garden/
या भीतीपोटी भामट्यांनी मॅनेजरला १७ ऑगस्ट ते २८ ऑगस्ट या दिवसांच्या कालावधीत त्यांच्या स्वतःच्या घरातच 'डिजिटल अरेस्ट' करून ठेवले. त्यानंतर आरबीआय चौकशीची (RBI Investigation) भीती दाखवून आणि कायदेशीर कारवाईपासून वाचवण्याचे प्रलोभन देऊन विविध बँक खात्यांमध्ये पैसे जमा करण्यास भाग पाडले. सायबर गुन्हेगारांच्या सांगण्यावरून मॅनेजरने तब्बल ८९ लाख ९९ हजार रुपये वेगवेगळ्या बँक खात्यांवर ट्रान्सफर केले. पैसे जमा होताच आरोपींनी ती रक्कम इतर विविध खात्यांमध्ये वळवली आणि मॅनेजरची फसवणूक केली. (Cyber Fraud)
हा फसवणुकीचा प्रकार लक्षात आल्यानंतर पीडित मॅनेजरने तात्काळ पोलिसांत धाव घेतली. सध्या या गंभीर प्रकरणाचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशील कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली वेगाने सुरू आहे. नागरिक आणि कर्मचाऱ्यांनी अशा कोणत्याही अनोळखी कॉल किंवा डिजिटल अरेस्टच्या धमक्यांना न घाबरता तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. (Cyber Fraud)