हलदौनी : ग्रेटर नोएडातील हलदौनी गावात 7 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चॉकलेटचे आमिष दाखवून आरोपीने मुलीला सोबत नेले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार करून हत्या केल्याचा आरोप आहे. मुलीचा मृतदेह पोत्यात भरून तो अज्ञात ठिकाणी नेण्यात आला. या घटनेनंतर परिसरात संतापाचे वातावरण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 28 ऑगस्टच्या रात्री चिमुकली घरातून अचानक बेपत्ता झाली. तिच्या वडिलांचे मिठाईचे दुकान असून आरोपी बलराज हा दुकानात येत-जात होता. त्यामुळे मुलगी त्याला ओळखत होती आणि नेहमी ‘अंकल’ म्हणून हाक मारत होती. आरोपी मुलीच्या काकांच्या घरात भाड्याने राहत असल्याचेही कुटुंबीयांनी सांगितले.
https://www.prahaar.in/2026/08/30/heart-wrenching-how-a-pregnant-girlfriend-was-eliminated-one-plot-by-the-boyfriend-and-it-was-all-over-police-action-causes-a-stir/
मुलगी बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनीही शोधमोहीम सुरू केली आणि पाच पथके तयार केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासताना आरोपी मुलीला सोबत घेऊन जात असल्याचे पोलिसांना दिसले. त्यानंतर आणखी एका फुटेजमध्ये संशयित व्यक्ती पोते घेऊन जात असल्याचे आढळले. या फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने मुलीला एका खोलीत नेले. तेथे तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या केल्याचा आरोप आहे. त्यानंतर मृतदेह पोत्यात भरून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी तो घेऊन गेला. पोलिसांनी शोधमोहीम राबवत परिसरात तपास केला. अखेर जवळच्या भागातून चिमुकलीचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
दरम्यान, आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी कारवाई सुरू केली असता चकमक झाली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या कारवाईदरम्यान झालेल्या गोळीबारात आरोपी बलराजचा मृत्यू झाला. घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस पुढील तपास करत असून सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुरावे तपासले जात आहेत. या घटनेमुळे पुन्हा एकदा अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.