Saturday, August 29, 2026

Jaykumar Gore's Brother : भाजपचे मंत्री जयकुमार गोरेंचे बंधू शिवसेनेच्या गळाला

Jaykumar Gore's Brother : भाजपचे मंत्री जयकुमार गोरेंचे बंधू शिवसेनेच्या गळाला

जिल्हा परिषद निवडणुकीतील राड्याचे उट्टे काढणार?; १ सप्टेंबरला एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मुंबईत पक्षप्रवेश सोहळा

मुंबई : सातारा जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी मोठी घडामोड समोर आली असून, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे बंधू आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक शेखर गोरे हे लवकरच शिवसेना प्रवेश करणार आहेत. विधान परिषदेच्या आमदारकीचे आश्वासन मिळूनही त्याची पूर्तता न झाल्याने गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेल्या शेखर गोरे यांनी बंडखोरीचा पवित्रा घेतला आहे. येत्या १ सप्टेंबर रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईतील नंदनवन निवासस्थानी त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. मंत्री गोरे यांच्यासाठी हा मोठा धक्का असला, तरी सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत झालेल्या वादाचे उट्टे काढण्यासाठीच हा पक्षप्रवेश होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

२०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत माण-खटाव मतदारसंघात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या विजयात त्यांचे बंधू शेखर गोरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. शेखर गोरे यांचा स्वतःचा स्वतंत्र राजकीय गट असल्याने त्यांनी सुरुवातीला दंड थोपटले होते आणि दोघा बंधूंमध्ये राजकीय वैरही पाहायला मिळाले होते. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करत शेखर गोरे यांना निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्यास प्रवृत्त केले होते, तसेच भविष्यात विधान परिषदेवर आमदार म्हणून संधी देण्याचे आश्वासन दिले होते. त्यावर विश्वास ठेवून शेखर गोरे यांनी माघार घेतली आणि बंधू जयकुमार यांच्या विजयासाठी ताकदीने काम केले. मागील दीड वर्षांपासून ते आमदारकीच्या प्रतीक्षेत होते आणि सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतही पक्षाकडून उमेदवारी मिळेल अशी त्यांना अपेक्षा होती. परंतु आश्वासनपूर्ती न झाल्याने त्यांनी आता शिवसेनेची वाट धरण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे शेखर गोरे यांच्या पत्नी भाजपच्या जिल्हा परिषद सदस्य असून, माण व खटाव तालुक्यात त्यांची मोठी पकड आहे.

सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीवेळी शिवसेना आणि राष्ट्रवादीने एकत्र येत भाजपला शह देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, मंत्री जयकुमार गोरे यांनी साम-दाम-दंडाचा प्रयोग करून मित्रपक्षांना शिकस्त दिली होती. यावेळी पोलिसांकडून मंत्री शंभूराजे देसाई यांना धक्काबुक्की झाल्याने त्याचे पडसाद विधिमंडळाच्या अधिवेशनातही उमटले होते. त्यावरून जयकुमार गोरे आणि देसाई आमनेसामने आले होते. जिल्हा परिषद ताब्यात घेण्यासाठी दोन सदस्यांचे अपहरण करण्यात आल्याचा आरोपही यावेळी शिवसेनेने भाजपवर केला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीने हा वाद शमला असला, तरी राजकीय वैर संपलेले नव्हते. या पार्श्वभूमीवर, जयकुमार गोरे यांच्या राजकीय वर्चस्वाला शह देण्यासाठी शंभुराज देसाईंच्या माध्यमातून शेखर गोरे यांना शिवसेनेत प्रवेश दिला जात असल्याची चर्चा आहे. या राजकीय घडामोडीमुळे आगामी काळात सातारा जिल्ह्यातील समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >