नाशिक : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले आहे. मात्र शेतकऱ्याला कर्जाच्या दुष्टचक्रातून बाहेर काढण्यासाठी नव्या तंत्रज्ञानावर आधारित व्यवस्था उभी करावी लागेल. त्यासाठी कृषी क्षेत्रातील आव्हाने लक्षात घेऊन आधुनिकीकरण, नवे तंत्रज्ञान आणि संशोधनाचा वापर करून उत्पादनखर्च कमी करीत उत्पादकता वाढविण्यासाठी कृषी महाविद्यालयांनी महत्वाची भूमिका बजवावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी केले. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या दिंडोरी तालुक्यातील मौजे चाचडगाव येथीलकर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालयाच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी जलसंपदामंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ, खासदार डॉ. शोभा बच्छाव, राजाभाऊ वाजे, भास्कर भगरे, नाशिक महानगरपालिकेच्या महापौर हिमगौरी आहेर-आडके आदी उपस्थित होते.
राज्यात ८० टक्के शेतकरी अल्पभूधारक असून त्यांची गुंतवणूक करण्याची क्षमता कमी आहे. शेतीचा उत्पादन खर्च वाढतो आहे. या तुलनेत हमीभावामुळे शेतकऱ्यांना विशेष लाभ मिळत नाही. यातून मार्ग काढण्यासाठी शेती क्षेत्रातील संशोधनाला चालना द्यावी लागेल आणि हे संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणाऱ्या महाविद्यालयांची आवश्यकता आहे. या महाविद्यालयातील सुविधा लक्षात घेता नाशिकमध्ये भविष्यात होणाऱ्या कृषी संशोधनात हे महाविद्यालय अग्रेसर असेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. नाशिक जिल्हा कृषी क्षेत्रात अग्रेसर आहे. येथील शेतकरी अत्यंत मेहनती आहेत. आदिवासी भागातही विविध वनउपज तयार केली जाते. देशाच्या द्राक्ष निर्यातीच्या ८० टक्के निर्यात नाशिक जिल्ह्यातून होते. नाशिक जिल्ह्यातला कांदा संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. शेती फायदेशीर करायची असेल तर शेतीच्या क्षेत्रात तंत्रज्ञानाचा उपयोग होणे अत्यंत महत्वाचे आहे. देशातील अनेक राज्य कृषी उत्पादकतेत मागे पडली आहेत. रासायनिक खतांच्या अतिउपयोगामुळे मातीची क्षमता कमी झाली आहे. म्हणून राज्य शासन कमी खतांच्या वापरात अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाला चालना देत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. (CM Devendra Fadnavis)
मुंबई : सप्टेंबर महिन्यात बँकेशी संबंधित महत्त्वाची कामे असतील, तर ती आधीच पूर्ण करून घेणे ग्राहकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. विविध सण, नियमित साप्ताहिक ...
नवे तंत्रज्ञान, नवीन संशोधन याच्या साह्याने कृषी महाविद्यालयांनी जमिनीचा पोत ओळखून खतांचा वापर करण्याचे मार्गदर्शन केल्यास शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल. राज्यात कृषी महाविद्यालयाद्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची व्यवस्था उभी करण्यात आली आहे. विविध पिकांकरिता उत्पादकता वाढविण्याचे मॉडेल्स तयार करण्यात येत आहेत. महाविद्यालयातील प्रयोग शेतापर्यंत पोहोचावे, शेतकऱ्यांच्या मुलांनी कृषी महाविद्यालयात शिक्षण घेवून शेतीला विविध प्रक्रीया उद्योगाशी जोडल्यास मोठी अर्थव्यवस्था उभी राहील. या माध्यमातून शेतकऱ्यांसमोरच्या अडचणी दूर होण्यास मदत होईल, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर केल्यास उत्पादन खर्च २५ ते ३० टक्क्यापर्यंत कमी करून उत्पादकता ४० टक्क्यापर्यंत वाढविता येईल. राज्याने यासाठी देशात प्रथमच कृत्रिम बुद्धीमत्तेचा उपयोग करीत ‘महाविस्तार ॲप’ तयार केले आहे. याद्वारे शेतकऱ्याला संपूर्ण पीकसाखळीचे मार्गदर्शन मिळू शकेल. शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे विविध भाषेत उत्तरे मिळण्याची सुविधा या ॲपमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाचा आवर्जून उल्लेख केला. नाशिक जिल्ह्याच्या जडणघडणीत या संस्थेचा मोलाचा वाटा असल्याचे कौतुकोद्गार यावेळी मुख्यमंत्र्यांनी काढले. मराठा विद्या प्रसारक समाजाच्या विविध अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्याची ग्वाही फडणवीस यांनी दिली. (CM Devendra Fadnavis)
नूतन इमारतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या भविष्याला आकार देणारे ज्ञानमंदिर उभे राहिल्याचे पालकमंत्री महाजन म्हणाले. मराठा विद्या प्रसारक संस्थेचे जिल्ह्याच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक जडणघडणीत महत्वाचे योगदान आहे. संस्थेला वैभवशाली इतिहास आणि परंपरा आहे. संस्थेतून अनेक नामवंत आणि यशस्वी विद्यार्थी दिले आहेत. अनेक समाजधुरिणींनी शिक्षणातून समाजपरिवर्तन घडविण्यासाठी संस्थेची स्थापना केली. संस्थेच्या सदस्यांमध्ये संस्थेविषयी आपलेपणाची भावना असल्याने संस्थेचा विस्तार वेगाने होत आहे, असेही पालकमंत्री महाजन म्हणाले. नव्या इमारतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उत्तम ज्ञान संपादन करण्याची प्रेरणा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या हस्ते 'मविप्र पत्रिका'च्या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळासाहेब क्षीरसागर यांनी केले. संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी मनोगतात संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेतला. कार्यक्रमाला आमदार सीमा हिरे, डॉ. राहुल आहेर, राहुल ढिकले, हिरामण खोसकर, दिलीप बोरसे, दिलीप बनकर, नितीन पवार, महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरीचे कुलगुरु डॉ. विलास खर्चे, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, नाशिक महापालिकेचे उपमहापौर विलास शिंदे आदींसह संस्थेचे पदाधिकारी, सभाभद, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.