काठमांडू : भारत आणि नेपाळ यांच्यात ऊर्जा सहकार्य करार आहे. या करारांतर्गत नेपाळमधील जलविद्युत प्रकल्पांमधून निर्माण होणारी आठशे मेगावॅट वीज भारत आयात करतो. पण महापुराचा नेपाळमधील अनेक वीज प्रकल्पांना जबर फटका बसला आहे. यामुळे नेपाळने भारताला केला जाणारा वीज पुरवठा ४०० मेगावॅटवर आणला आहे. भारताला वीजपुरवठा करणाऱ्या देवीघाट प्रकल्पासह चिलिमे आणि त्रिशूली हे बांगलादेशाला वीजपुरवठा करणारे दोन जलविद्युत प्रकल्पही पुरामुळे प्रभावित झाले आहेत. नेपाळच्या ऊर्जा मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, पुरामुळे देशातील सुमारे १३ जलविद्युत प्रकल्प आणि एका सौर प्रकल्पाचे नुकसान झाले आहे. या पुराचा फटका जवळपास ३५९ मेगावॅट क्षमतेच्या वीज निर्मिती प्रकल्पांना बसला असून, यातील बहुतांश प्रकल्प जलविद्युत आहेत.(Nepal Flood)
नवी दिल्ली : ईशान्येकडील सीमेवर अमली पदार्थ तस्करांविरोधातील कारवाई तीव्र करत महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) आसाम आणि मिझोरममध्ये गुप्त ...
नेपाळच्या रासुवा जिल्ह्यात एकूण २३६ मेगावॅट क्षमतेचे कार्यरत वीज प्रकल्प तसेच ३४२.४२ मेगावॅट क्षमतेचे तीन मोठे बांधकामाधीन जलविद्युत प्रकल्प पुरामुळे प्रभावित झाले आहेत. यामध्ये अप्पर त्रिशूली-१ (२१६ मेगावॅट), रसुवागढी (१११ मेगावॅट), रासुवा भोटेकोशी (१२० मेगावॅट), संजेन खोला (७८ मेगावॅट), अप्पर मेलुंग ए (६.४२ मेगावॅट), मेलुंग खोला (५ मेगावॅट), लैदांग खोला (२० मेगावॅट) आणि चिलिमे (२२ मेगावॅट) या प्रकल्पांचा समावेश आहे. नुवाकोट जिल्ह्यात १२३ मेगावॅट क्षमतेचे चार कार्यरत वीज प्रकल्प आणि ५२.६ मेगावॅट क्षमतेचे दोन बांधकामाधीन प्रकल्प पुरामुळे प्रभावित झाले आहेत. यामध्ये त्रिशूली जलविद्युत प्रकल्प (२४ मेगावॅट), देवीघाट जलविद्युत प्रकल्प (१४.१ मेगावॅट), अप्पर त्रिशूली – ३ए (६० मेगावॅट), अप्पर त्रिशूली – ३बी (३७ मेगावॅट), मिडल त्रिशूली गंगा (१५.६ मेगावॅट) आणि एक २५ मेगावॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प यांचा समावेश आहे. (Nepal Flood)
नेपाळची एकूण वीज निर्मिती क्षमता ४,३०० मेगावॉट असून, त्यातील बहुतांश वीज जलविद्युत प्रकल्पांमधून निर्माण होते. त्यामुळे या प्रकल्पांचे नुकसान झाल्याने देशाच्या वीज व्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. नेपाळ आणि भारतातील वीज व्यापारही मोठ्या प्रमाणात हंगामी आहे. पावसाळ्यात जलविद्युत निर्मिती वाढल्यानंतर नेपाळ अतिरिक्त वीज भारताला विकतो, तर हिवाळ्यात पाण्याची उपलब्धता आणि जलविद्युत निर्मिती कमी असल्याने नेपाळ भारताकडून वीज आयात करतो. (Nepal Flood)