मुंबई : WhatsApp वापरकर्त्यांची सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी Metaने तीन नवीन सुरक्षा अपडेट्स जाहीर केले आहेत. यामध्ये एकाच WhatsApp खात्याला अनेक पासकीज् (Passkeys) जोडण्याची सुविधा, अधिक मजबूत Two-Step Verification आणि अनोळखी नंबरवरून येणाऱ्या कॉल्सची अधिक माहिती देणाऱ्या फीचर्सचा समावेश आहे. खाते हडपण्याच्या घटना आणि संशयास्पद कॉल्सपासून वापरकर्त्यांचे संरक्षण करणे हा या अपडेट्सचा मुख्य उद्देश आहे. (WhatsApp New Features Update)
आता एका खात्याला अनेक Passkeys
WhatsAppवरील Passkeyच्या माध्यमातून वापरकर्ते फोनचा Fingerprint, Face ID किंवा Screen Lock वापरून खात्यात पुन्हा लॉग इन करू शकतात. Metaच्या मते, एक अब्जाहून अधिक लोकांनी WhatsAppवर Passkey सेट केली आहे.
नव्या अपडेटनंतर एका WhatsApp खात्याला एकापेक्षा अधिक Passkeys जोडता येणार आहेत. त्यामुळे Android आणि iPhoneसारख्या वेगवेगळ्या डिव्हाइसवर WhatsApp वापरणाऱ्या युजर्सना मोठा फायदा होणार आहे. Passkeys व्यवस्थापित करण्यासाठी Settings > Account > Passkeys या पर्यायाचा वापर करता येईल. (WhatsApp New Features Update)
मुंबई : अभिनेत्री कृती सेनॉनच्या राखीच्या जाहिरातीवरून सुरू झालेला वाद आता राजकीय वळणावर पोहोचला आहे. जाहिरातीवरून झालेल्या टीकेनंतर काँग्रेस नेते ...
६ अंकी PIN ऐवजी अधिक मजबूत पासवर्ड
WhatsAppचे Two-Step Verification फीचरही आता अधिक सुरक्षित होणार आहे. यापूर्वी अतिरिक्त सुरक्षेसाठी सहा अंकी PINचा वापर केला जात होता. आता वापरकर्त्यांना अक्षरे, अंक आणि @, $, # यांसारखी विशेष चिन्हे असलेला अधिक मजबूत पासवर्ड तयार करता येणार आहे. त्यामुळे खाते सुरक्षित ठेवण्यास आणि अंदाज लावून PIN किंवा पासवर्ड क्रॅक करण्याच्या प्रयत्नांना आळा घालण्यास मदत होऊ शकते. (WhatsApp New Features Update)
अनोळखी नंबरच्या कॉलचीही मिळणार अधिक माहिती
अनोळखी नंबरवरून येणाऱ्या कॉल्सबाबतही WhatsAppने महत्त्वाचा बदल केला आहे. Android वापरकर्त्यांना कॉन्टॅक्ट्समध्ये सेव्ह नसलेल्या नंबरवरून कॉल आल्यास कॉलरबाबत अधिक माहिती दिसणार आहे. कॉल उचलण्यापूर्वी कॉलर दुसऱ्या देशातील आहे का आणि त्याचा तुमच्यासोबत कोणता कॉमन WhatsApp ग्रुप आहे का, हे पाहता येईल. त्यामुळे कॉल स्वीकारायचा की नाही, याचा निर्णय घेणे सोपे होणार आहे.
मात्र, हे फीचर पूर्णपणे स्वयंचलित कॉल स्क्रीनिंग किंवा कॉल ब्लॉकिंग सिस्टम नाही. WhatsApp केवळ अतिरिक्त माहिती देणार असून, कॉल स्वीकारायचा की नाही याचा निर्णय वापरकर्त्यालाच घ्यावा लागणार आहे. Metaच्या मते, WhatsAppवरील वैयक्तिक संभाषणे एंड-टू-एंड एन्क्रिप्शनद्वारे संरक्षित आहेत. नव्या सुरक्षा फीचर्समुळे खाते हडपण्यापासून संरक्षण, मजबूत Two-Step Verification आणि अनोळखी कॉल्सबाबत अधिक माहिती मिळण्यास मदत होणार आहे. (WhatsApp New Features Update)