Monday, August 24, 2026

Nitesh Rane : 'सौरऊर्जेवर आधारित आधुनिक प्रवासी बोटींच्या वापराला चालना द्या'

Nitesh Rane : 'सौरऊर्जेवर आधारित आधुनिक प्रवासी बोटींच्या वापराला चालना द्या'

मुंबई : महाराष्ट्रातील जलवाहतूक व्यवस्था अधिक सुखकर, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करावा. पारंपरिक इंधनावरील अवलंबित्व कमी करून सौर ऊर्जेच्या माध्यमातून जलवाहतुकीला चालना देण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले. महाराष्ट्रातील जलवाहतुकीसाठी अद्ययावत सोलार तंत्रज्ञानावर आधारित प्रवासी बोटी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने मंत्रालयात नावाल्ट बोटस् कंपनीकडून सादरीकरण करण्यात आले. मंत्री राणे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सौरऊर्जेसह विविध आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित बोटींची माहिती देण्यात आली. सौरऊर्जेवर आधारित बोटींच्या वापरामुळे पारंपरिक इंधनावरील अवलंबित्व कमी होऊन जलवाहतूक अधिक पर्यावरणपूरक करण्यास मदत होणार आहे. तसेच प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी जलप्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने या तंत्रज्ञानाचा उपयोग होणार आहे.

वर्सोवा-मढ रो-रो सेवेसाठी ४९ प्रवासी क्षमतेची स्पीड बोट, गेट वे ऑफ इंडिया ते अलिबाग-मांडवा मार्गासाठी २० प्रवासी क्षमतेची बोट, तसेच मुंबई ते सिंधुदुर्ग जलप्रवासासाठी आधुनिक बोटी उपलब्ध करून देण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. महाराष्ट्र सागरी मंडळ आणि बंदरे विभागाने आधुनिक बोटींच्या माध्यमातून जलवाहतूक सेवा विस्तारासोबतच महसूलवाढीच्या दृष्टीने प्रस्ताव तयार करावा, अशा सूचनाही मंत्री राणे यांनी दिल्या. उपलब्ध जलमार्गांचा प्रभावी वापर करून प्रवासी जलवाहतूक अधिक सक्षम करण्यावर भर देण्याचे निर्देश त्यांनी दिले. आधुनिक सौर तंत्रज्ञान, स्वच्छ ऊर्जा आणि सुरक्षित जलवाहतूक यांचा समन्वय साधून राज्यातील जलवाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. बैठकीस महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >