Saturday, August 22, 2026

Vande Mataram : ‘वंदे मातरम’च्या जनजागृतीसाठी भाजप राबवणार देशव्यापी मोहीम

Vande Mataram : ‘वंदे मातरम’च्या जनजागृतीसाठी भाजप राबवणार देशव्यापी मोहीम

नवी दिल्ली : ‘वंदे मातरम’ या राष्ट्रीय गीताचा सन्मान आणि ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी भारतीय जनता पक्षाने शनिवारी एक महत्त्वपूर्ण ठराव मंजूर केला आहे. या राष्ट्रीय गीताचा इतिहास आणि महत्त्व याबद्दल जनजागृती करण्यासाठी भाजप देशभरात एक विशेष मोहीम राबवणार आहे. (Vande Mataram)

काँग्रेस कार्य समितीने १९३७ मधील आपला जुना ठराव पुन्हा लागू करत काँग्रेसच्या कार्यक्रमांमध्ये 'वंदे मातरम'ची फक्त पहिली दोनच कडवी गाण्याचा निर्णय १९ ऑगस्ट रोजी घेतला होता. काँग्रेसच्या या निर्णयाचा भाजपने तीव्र शब्दांत निषेध केला आहे. स्वातंत्र्यदिनाच्या (१५ ऑगस्ट) कार्यक्रमात राष्ट्रीय गीत सुरू असताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि संसदीय पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी यांच्यात संवाद सुरू असल्याचा आरोप भाजपने केला होता. या वादानंतर काँग्रेस कार्य समितीने १९३७ च्या निर्णयाचा हवाला देत पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये केवळ पहिली दोनच कडवी गायली जातील, हे स्पष्ट केले. यावर प्रतिक्रिया देताना भाजपने म्हटले आहे की, 'वंदे मातरम' हा केवळ एका राजकीय पक्षाचा विषय नसून देशाचा गौरव आणि लाखो क्रांतीकारकांच्या बलिदानाचा वारसा आहे. १९४७ मध्ये स्वातंत्र्याचा नारा 'वंदे मातरम' होता आणि २०४७ च्या 'विकसित भारत'चा हुंकारही 'वंदे मातरम'च असेल. (Vande Mataram)

भाजपाच्या ठरावातील प्रमुख मुद्दे:

राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक: भाजपने ‘वंदे मातरम’ला भारताचे राष्ट्रीय गीत, भारतमातेबद्दलच्या आदराची अभिव्यक्ती, स्वातंत्र्यलढ्याचा मंत्र आणि राष्ट्रीय जाणिवांचे अमर प्रतीक मानले आहे.

संपूर्ण गीतेला वैधानिक संरक्षण: भाजप पूर्ण सहा कडव्यांच्या ‘वंदे मातरम’चा सन्मान आणि गौरव जपण्यासाठी कटिबद्ध आहे. १९५० च्या संविधान सभेच्या घोषणेचा आणि जन गण मनप्रमाणेच 'वंदे मातरम'ला वैधानिक संरक्षण देणाऱ्या २०२६ च्या संसदेच्या कायद्याचा पक्ष पुनरुच्चार करतो.

राजकीय तडजोडीला विरोध: संविधानाचा दर्जा आणि संसदेचा कायदा हा काँग्रेसच्या कार्य समितीपेक्षा सर्वोच्च आहे. त्यामुळे १९३७ ची राजकीय तडजोड ही १९५० चा घटनात्मक निर्णय आणि २०२६ च्या कायद्यापेक्षा मोठी असू शकत नाही, असे ठरावात नमूद केले आहे.

इतिहासाची जनजागृती: मुस्लिम लीगचे आक्षेप आणि जातीय राजकारणामुळे 'वंदे मातरम' मर्यादित करण्याचा जो इतिहास आहे, तो जनतेसमोर आणला जाईल. तसेच महात्मा गांधींनी 'वंदे मातरम'चा उल्लेख "साम्राज्यवादाविरुद्धचा नारा" आणि "शुद्ध राष्ट्रीय भावनेशी जोडलेला मंत्र" असा केला होता, हा विचारही लोकांपर्यंत पोहोचवला जाईल.

युवा पिढीसाठी विशेष मोहीम: तरुणांना 'वंदे मातरम'चा इतिहास, अर्थ आणि स्वातंत्र्यलढ्यातील त्याचे योगदान समजून सांगण्यासाठी देशभरात जनजागृती मोहीम राबवली जाईल. (Vande Mataram)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा