मुंबई : मुंबई-गोवा महामार्गावरील झाराप-पत्रादेवी बायपासवर इन्सुली येथे रस्त्यावरील खड्ड्यामुळे एका कारचा भीषण आपघात झाला. या अपघातात कारमधील एका महिलेचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला असून इतर तीन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताचा व्हिडीओ महामार्गावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. (Mumbai-Goa Highway)
दीव-दमण येथून पर्यटनासाठी गोव्याच्या दिशेने जात असताना इन्सुली येथे चालकाला महामार्गावरील मोठ्या खड्ड्यांचा अंदाज आला नाही. यामुळे सुसाट कार अचानक खड्ड्यात आदळल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार थेट रस्त्याच्या डिव्हायडरवर जाऊन आदळली. टक्कर इतकी भयंकर होती की, कारमधील एक महिला प्रवासी तब्बल २० फूट उंच उडून थेट रस्त्यावर फेकली गेली. (Mumbai-Goa Highway)
अपघाताची खबर मिळताच स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना बाहेर काढले आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, दुखापत इतकी गंभीर होती की, उपचारादरम्यानच महिलेचा मृत्यू झाला. इतर तिघे गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या भीषण अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांचा आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. (Mumbai-Goa Highway)