मुंबई : कोरोना काळात संकटात सापडलेल्या आणि तत्कालीन विरोधी पक्षनेते असताना दत्तक घेतलेल्या तरुणीचा पुनर्विवाह लावून देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सामाजिक संवेदनशीलतेचा एक आदर्श घालून दिला आहे. कोरोनाच्या कठीण काळात जोडीदार गमावलेल्या प्रीती आकडे या तरुणीच्या विवाहसोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः उपस्थित राहून नवविवाहित वधू-वरास भावी आयुष्यासाठी आशीर्वाद दिले. (CM Devendra Fadnavis)
कोरोनाच्या संकटाच्या काळात अनेकांनी आपल्या प्रियजनांना गमावले होते. या काळात अनेक कुटुंबे रस्त्यावर आली होती. तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे मित्र व भाजपचे माजी आमदार संदीप जोशी यांच्या सहकार्याने अशा सुमारे ३०० कुटुंबांचे पालकत्व स्वीकारत त्यांना दत्तक घेतले होते. प्रीती आकडे यांच्या पहिल्या पतीचे कोरोना काळातील आजारपणामुळे दुर्दैवी निधन झाले होते. त्यानंतर या दोन्ही नेत्यांनी या कुटुंबाला सर्वतोपरी आधार देत गुरुवारी प्रीती यांचा नागपुरात पुनर्विवाह लावून त्यांच्या आयुष्याची एक नवीन सुरुवात करून दिली आहे. (CM Devendra Fadnavis)
या विवाहसोहळ्यात आपल्या भावना व्यक्त करताना प्रीती आकडे भावूक झाल्या. आज आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी शब्द नसल्याचे सांगत, आपले दोन बंधू आपल्या पाठीशी उभे राहिल्याचा मोठा आनंद असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी आमदार संदीप जोशी यांचे त्यांनी विशेष आभार मानले. राजकारणापलीकडे जाऊन मानवीय नात्यांचे जतन करणाऱ्या या आगळ्यावेगळ्या विवाहसोहळ्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. (CM Devendra Fadnavis)