Wednesday, August 19, 2026

Crime News : नवरा गाढ झोपलाय ना? ३ वेळा जाऊन पाहिलं, दोन वर्षांपासून वेगवेगळ्या खोलीत वास्तव्य; बंगळुरुतील दुहेरी हत्याकांडाचा थरार

Crime News : नवरा गाढ झोपलाय ना? ३ वेळा जाऊन पाहिलं, दोन वर्षांपासून वेगवेगळ्या खोलीत वास्तव्य; बंगळुरुतील दुहेरी हत्याकांडाचा थरार

बंगळुरु : सोशल मीडियावरून झालेल्या अनैतिक संबंधांमधून एका पाच वर्षांच्या चिमुकल्यासह त्याच्या वडिलांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना बंगळुरुमधील चिक्काबनावर (Bengluru Chikkabawar Area) परिसरात उघडकीस आली आहे. घटस्फोटाला नकार दिल्याने आणि अनैतिक संबंधांच्या आड येत असल्याने पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने हा रक्ताळलेला कट रचल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी मृत अभिनंदन यांची पत्नी हरिनी आणि तिचा प्रियकर विनय या दोघांना अटक केली आहे.

स्नॅपचॅटवरून ओळख अन् विवाहेतर संबंध

मिळालेल्या माहितीनुसार, २०२१ मध्ये विवाह झालेल्या अभिनंदन आणि हरिनी यांच्या संसारात गेल्या काही वर्षांपासून प्रचंड तणाव होता. गेल्या दोन वर्षांपासून दोघेही एकाच घरात वेगवेगळ्या खोल्यांमध्ये राहत होते. डिसेंबर २०२४ मध्ये हरिनीची ओळख 'स्नॅपचॅट' या सोशल मीडिया ॲपवरून विनय नावाच्या तरुणाशी झाली. या ओळखीचे रूपांतर लवकरच प्रेमात आणि विवाहेतर संबंधांमध्ये झाले. हरिनीला विनयसोबत संसार थाटायचा असल्याने ती पतीकडे सतत घटस्फोटासाठी तगादा लावत होती.

कॉल रेकॉर्ड्सवरून वाद अन् हत्येचा अंतिम प्लॅन

पत्नीचे कोणाशी तरी सूत जुळल्याचा संशय अभिनंदन यांना आला होता. त्यांनी हत्येच्या अवघ्या १५ दिवसांपूर्वी हरिनीचे 'कॉल डिटेल रेकॉर्ड्स' (CDR) मिळवण्यासाठी पोलिसांशी संपर्कही साधला होता. यावरून दांपत्यामध्ये वारंवार खटके उडत होते. १४ ऑगस्ट रोजी झालेल्या एका मोठ्या वादानंतर अभिनंदन यांनी हरिनीला मारहाण केली. याच रागातून हरिनीने प्रियकर विनयच्या मदतीने पतीला कायमचे रस्त्यातून हटवण्याचा भयानक कट रचला.

घरचे सीसीटीव्ही बंद केले; प्रियकराला गॅरेजमध्ये लपवले

हत्या करण्यासाठी आरोपींनी अत्यंत पूर्वनियोजित पद्धतीने तयारी केली होती. हरिनीने आधीच बाजारातून हातमोज्यांच्या दोन जोड्या खरेदी करून ठेवल्या होत्या. हत्येच्या रात्री घरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद करण्यात आले. रविवारी रात्री ११ च्या सुमारास प्रियकर विनय घरी पोहोचताच, हरिनीने त्याला गॅरेजजवळील पॅसेजमध्ये लपवून ठेवले. त्या वेळी पती अभिनंदन आणि पाच वर्षांचा मुलगा यदुवीर टीव्हीवर 'बिग बॉस' पाहत होते.

पती झोपल्याची तीनदा खात्री केली

रात्री साडेअकरा वाजता पती आपल्या खोलीत झोपायला गेल्यानंतर हरिनीने प्रियकराला आत बोलावले. पती खरोखरच गाढ झोपला आहे की नाही, हे पाहण्यासाठी हरिनीने तीन वेळा त्याच्या खोलीत जाऊन खात्री केली. मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास दोघांनी हातामध्ये ग्लोव्हज घातले आणि अभिनंदन यांच्या खोलीत प्रवेश करून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला चढवला.

जागा झालेल्या चिमुकल्याचाही घोटला आवळला

दोघे मिळून अभिनंदन यांच्यावर हल्ला करत असताना झालेल्या झटापटीच्या आवाजाने पाच वर्षांचा चिमुकला यदुवीर झोपेतून जागा झाला. आपण पकडले जाऊ या भीतीने पाषाणहृदयी आईने आणि तिच्या प्रियकराने त्या निष्पाप बालकाचीही गळा आवळून हत्या केली. या घटनेची माहिती देताना उत्तर-पश्चिम विभागाचे डीसीपी नागेश यांनी सांगितले की, दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली आहे.

आत्महत्येचा बनाव रचण्याचा प्रयत्न

हत्या केल्यानंतर आरोपींनी हे प्रकरण आत्महत्या आणि हत्येचे भासवण्याचा प्रयत्न केला. अभिनंदन यांनीच आधी स्वतःच्या मुलाला संपवले आणि नंतर स्वतः आत्महत्या केली, असा आभास निर्माण करण्यासाठी त्यांनी अभिनंदन यांचा मृतदेह मुलाच्या मृतदेहावर ठेवला. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि तांत्रिक तपासाच्या आधारे या निर्घृण हत्याकांडाचा अवघ्या काही तासांत पर्दाफाश झाला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >