Nashik : पत्रकारांच्या , छायाचित्रकारांच्या रोजच्या धकाधकीच्या जीवनात आज अनोखा प्रसंग घडला. आज जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त नाशिकमध्ये पालकमंत्री गिरीश महाजन यांनी शहरातील पत्रकार आणि छायाचित्रकारांसोबत संवाद साधत अनोख्या पद्धतीने हा दिवस साजरा केला. यावेळी महाजन यांनी नाशिकच्या पत्रकार व छायाचित्रकारांसोबत सामूहिक छायाचित्र काढून आठवणीचा क्षण टिपला.
विशेष म्हणजे, केवळ कॅमेऱ्यासमोर उभे न राहता पालकमंत्री गिरीश महाजन (Guardian Minister Girish Mahajan) यांनी स्वतः कॅमेरा हातात घेतला आणि उपस्थित छायाचित्रकारांचेही छायाचित्र काढले. त्यामुळे यावेळी उपस्थित पत्रकार आणि छायाचित्रकारांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
पत्रकारिता आणि छायाचित्रणाच्या माध्यमातून समाजातील घडामोडी जनतेपर्यंत पोहोचविणाऱ्या छायाचित्रकारांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी हा दिवस महत्त्वाचा मानला जातो. बातमीला दृश्यरूप देत एखादा क्षण कायमचा जतन करण्याचे काम छायाचित्रकार करत असतात. याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री महाजन यांनी छायाचित्रकारांसोबत साधलेला हा संवाद आणि स्वतः त्यांच्या कॅमेऱ्यातून क्षण टिपण्याचा केलेला प्रयत्न चर्चेचा विषय ठरला.
यावेळी नाशिकमधील अनेक पत्रकार, छायाचित्रकार आणि माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते. पालकमंत्री महाजन यांच्यासोबत काढलेले सामूहिक छायाचित्र आणि त्यांनी स्वतः काढलेली छायाचित्रे हा दिवस उपस्थितांसाठी विशेष आठवण ठरली.






