नालासोपारा : नालासोपारा पूर्वेकडील लक्ष्मी नगर परिसरातील निळकंठ अपार्टमेंटमध्ये वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान अन्नातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत तब्बल 11 जणांना त्रास झाल्याने त्यांना तातडीने स्थानिक विजय लक्ष्मी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी 4 जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. उर्वरित 7 जणांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. (Mumbai News)
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी निळकंठ अपार्टमेंटमध्ये एका मुलीच्या वाढदिवसानिमित्त पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला इमारतीतील तसेच परिसरातील काही जण उपस्थित होते. वाढदिवसाचा केक कापल्यानंतर उपस्थितांनी तो खाल्ला. मात्र, काही वेळातच काही जणांना मळमळ, उलट्या आणि चक्कर येण्यास सुरुवात झाली. एकाच वेळी अनेकांची प्रकृती बिघडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. (Nalasopara News)
जनतेच्या दारात दर्जेदार उपचार पोहोचवण्याचा निर्धार मुंबई : “हे सरकार फक्त आदेश देणारे नाही, तर जनतेच्या दारात जाऊन प्रश्न सोडवणारे सरकार आहे. आरोग्य ...
केकमध्ये आढळली पाल
दरम्यान, कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या काही मुलांनी केकमध्ये पाल पडल्याचा आरोप केला आहे. केक खाल्ल्यानंतरच सर्वांना त्रास सुरू झाल्याने दूषित केकमुळे विषबाधा झाल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र, केकमध्ये नेमके काय आढळले आणि विषबाधेचे कारण काय आहे, हे अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही. (Cake)
घटनेची माहिती मिळताच सर्व बाधितांना तातडीने विजय लक्ष्मी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील 4 जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर ICUमध्ये उपचार सुरू आहेत, तर 7 जणांवर जनरल वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतली. केकमुळेच विषबाधा झाली का, केकमध्ये पाल असल्याचा दावा खरा आहे का, तसेच अन्नाचे नमुने तपासल्यानंतर नेमके कारण काय समोर येते, याचा तपास सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणातील अधिकृत माहिती तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. (Food Poisoning)