Thursday, August 13, 2026

Brihanmumbai Municipal Corporation : पादचारी प्रथम अभियान; मुंबई महानगरपालिकेच्या ‘एफ दक्षिण’ आणि ‘एच पूर्व’ विभागाकडून कारवाई

Brihanmumbai Municipal Corporation : पादचारी प्रथम अभियान; मुंबई महानगरपालिकेच्या ‘एफ दक्षिण’ आणि ‘एच पूर्व’ विभागाकडून कारवाई

मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : पदपथ अडथळामुक्त करुन पादचाऱ्यांसाठी चालण्यायोग्य करण्याच्या अनुषंगाने, बृहन्मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेल्या 'पादचारी प्रथम' अभियान अंतर्गत धडक कारवाई केली जात आहे. या अंतर्गत, ‘एफ दक्षिण’ विभागाकडून दादर आणि ‘एच पूर्व’ विभागाकडून सांताक्रूझ परिसरातील पदपथांवर अडथळा निर्माण करणाऱ्या १५ अनधिकृत दुकानांसह १५ अनधिकृत फेरीवाल्यांचे गुरुवारी १३ ऑगस्ट २०२६ रोजी करण्यात आले.

उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार, महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनात, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांच्या नेतृत्वात पदपथांवरील अनधिकृत फेरीवाले व अतिक्रमणे तत्काळ हटवून पदपथ अडथळामुक्त करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून 'पादचारी प्रथम' अभियान राबविण्यात येत आहे.

[caption id="attachment_1051191" align="alignnone" width="650"] Action taken by the 'F-South' and 'H-East' wards of the Mumbai Municipal Corporation[/caption]

उपायुक्त (परिमंडळ-२) प्रशांत सपकाळे यांच्या मार्गदर्शनात, सहायक आयुक्त (एफ दक्षिण विभाग) वृषाली इंगुले यांच्या नेतृत्वात ‘एफ दक्षिण’ विभागाकडून दादर (पूर्व) परिसरात कारवाई करण्यात आली. या अंतर्गत, दादर (पूर्व) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गालगतच्या पदपथावर अडथळा निर्माण करणारी ०४ अनधिकृत दुकाने, १२ तात्पुरते ताडपत्रीचे शेड, ०६ अनधिकृत कट्टे आणि १५ फेरीवाल्यांवर आज निष्कासनाची कारवाई करण्यात आली.

उपायुक्त (परिमंडळ-३) विश्वास मोटे यांच्या मार्गदर्शनात, सहायक आयुक्त (एच पूर्व) मृदुला अंडे यांच्या नेतृत्वात ‘एच पूर्व’ विभागाकडून सांताक्रूझ (पूर्व) परिसरात आज कारवाई करण्यात आली. यामध्ये टीपीएस-३ परिसरातील मार्ग क्रमांक ६, ७ आणि ११ येथील ०६ अनधिकृत दुकानांचे तसेच नानासाहेब धर्माधिकारी मार्गालगतच्या पदपथांवरील ०५ अनधिकृत दुकानांवर कारवाई करण्यात आली. यात एका फुड व्हॅनचाही समावेश आहे. या कारवाईमुळे सुमारे ५०० मीटरचे पदपथ मोकळे झाले असून पादचाऱ्यांना त्यावरुन मार्गक्रमण करणे सुलभ होत आहे.

दरम्यान, पादचाऱ्यांसाठी सुलभ पदपथ उपलब्ध करुन देण्यासाठी महानगरपालिकेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामुळे, पदपथांवर अडथळा निर्माण होईल, असे अनधिकृत बांधकाम करू नये अथवा पदपथांवर कोणतेही साहित्य ठेवू नयेत. असे निदर्शनास आल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असे महानगरपालिका प्रशासनाकडून कळविण्यात येत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >