जेन-झींचं प्रतिनिधीत्व अधिक पाहायला मिळणार
नवी दिल्ली : सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण मानला जाणाऱ्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावर दाखल होतात व तिरंग्याचे ध्वजारोहण करतात. परंतु या वर्षी प्रथमच किल्ल्याच्या तटबंदीवरून राष्ट्रीय गीत म्हणजेच ' वंदे मातरम' गायले जाणार आहे. तसेच, या सोहळ्यात तरुण विद्यार्थी आणि 'जनरेशन झेड' सदस्यांना अधिक प्रतिनिधित्व मिळेल, ज्यामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांना तटबंदीवर बसवले जाईल. सर्व मिळून हे राष्ट्रीय गाणं समूहगीत पद्धतीने गातील.
संरक्षण सचिव 'राजेश कुमार सिंह' यांनी सोमवारी (१० ऑगस्ट, २०२६) रोजी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी घेतलेल्या या राष्ट्रीय गीत गायनाच्या निर्णयाला विशेष महत्त्व आहे. कारण २०२६ मध्ये राष्ट्रीय गीताला १५० वर्षे पूर्ण होत आहेत. राष्ट्रीय गीताने स्वातंत्र्य लढ्यादरम्यान लोकांना संघटित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. राष्ट्रप्रेम व राष्ट्रभक्ती निर्माण केली. त्यामुळे त्याचा सन्मान करणे अनिवार्य आहे. म्हणूनच १५ ऑगस्ट रोजी हे राष्ट्रीय गीत गायन केले जाईल. पंतप्रधानांच्या आगमनानंतर हे गीत सादर करण्यात येईल व त्यानंतर ते राष्ट्रध्वज फडकवतील आणि देशाला उद्देशून आपले भाषण करतील. (Vande Mataram)
नवी दिल्ली : भारत आपल्या संरक्षण क्षमतेत सातत्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करत आहे. ब्रह्मोस आणि अग्नी मालिकेतील क्षेपणास्त्रांनंतर आता अग्नी-5 Mk2 ...
या सोहळ्यात 'युवाशक्ती'वर विशेष लक्ष केंद्रित केले जाईल आणि २०४७ पर्यंत 'विकसित भारत' घडवण्याच्या सरकारच्या दूरदृष्टीमध्ये तरुण भारतीयांच्या योगदानावर भर दिला जाईल. वंदे मातरमच्या १५० व्या वर्षपूर्तीनिमित्त, २,५०० एनसीसी कॅडेट्स आणि एमवाय भारत स्वयंसेवक लाल किल्ल्याच्या तटबंदीसमोरील ज्ञानपथावर 'वंदे मातरम' गीताच्या गायनासाठी हजार राहतील. भारतीय हवाई दलाचे एमआय-१७ हेलिकॉप्टर राष्ट्रीय गीताच्या १५० वर्षांची आठवण करून देणारा बॅनर घेऊन कार्यक्रमाच्या ठिकाणावरून उड्डाण करेल आणि उपस्थितांवर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करेल, असेही ते म्हणाले.
संरक्षण सचिवांनी सांगितले की, २०२६ च्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि गणित ऑलिम्पियाडमधील १९ भारतीय पदक विजेत्यांच्या सहभागातूनही युवा-केंद्रित संकल्पना दिसून येते. समारंभादरम्यान यांना तटबंदीवर बसण्याचा बहुमान देण्यात येईल. तरुण नवोन्मेषक, उद्योजक, स्टार्टअपचे संस्थापक, कुशल कामगार, शेतकरी, कारागीर, स्वच्छता कर्मचारी आणि विविध सरकारी योजनांचे लाभार्थी यांच्यासह सुमारे ५,००० विशेष पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून आलेले, पारंपरिक वेशभूषेत असलेले दिल्लीस्थित १,५०० हून अधिक पाहुणे देशाच्या सांस्कृतिक विविधतेचे दर्शन घडवतील. (Vande Mataram)
त्यांनी पुढे सांगितले की, स्वतंत्रदिन साजरा करण्यासाठी ८ ते १५ ऑगस्ट दरम्यान देशभरातील ३४३ ठिकाणी लष्करी आणि सुरक्षा दलांचे बँड कार्यक्रम सादर करत आहेत. यामध्ये लष्कर, नौदल, हवाई दल, तटरक्षक दल, एनसीसी, सीआरपीएफ, बीएसएफ, आयटीबीपी, सीआयएसएफ, एसएसबी, आसाम रायफल्स, इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ आणि रेल्वे संरक्षण दलाचे बँड सहभागी होत आहेत. एकूणच यंदाचा स्वतंत्रदिन सोहळा विशेष लक्ष्यवेधी असणार आहे हे नक्की!