नवी दिल्ली : जंतरमंतर येथे झालेल्या विद्यार्थी आंदोलनावर आणि नीट पेपर फुटीप्रकरणावरून संसदेत आक्रमक झालेल्या विरोधकांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी थेट प्रत्युत्तर दिले आहे. मोदी सरकार संसदेत कोणत्याही प्रकारच्या चर्चेसाठी पूर्णपणे तयार असून, आपण विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्यास सज्ज असल्याचे शाह यांनी स्पष्ट केले आहे. पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांसमोर या विषयावर थेट भाष्य करताना त्यांनी विरोधकांना चर्चेचा एक स्पष्ट प्रस्ताव दिला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधकांना आवाहन केले आहे की, त्यांनी आज दुपारी २ वाजेपर्यंत लोकसभेच्या अध्यक्षांना चर्चेची विनंती करणारे पत्र सादर करावे. त्यानुसार आज दुपारी ३ वाजल्यापासून या विषयावरील चर्चेला सुरुवात करावी, जी रात्री उशिरापर्यंत आणि उद्या दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू ठेवता येईल. लोकसभा अध्यक्षांनी परवानगी दिल्यास, सरकार प्रश्नोत्तराचा तास पुढे ढकलण्यासही तयार असल्याचे त्यांनी सांगितले. "मी स्वतः सभागृहात बसेन, सर्वांचे म्हणणे ऐकून घेईन आणि उद्या दुपारी ३ वाजता विरोधी पक्षाच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देईन. सरकारकडे लपवण्यासारखे काहीही नाही. या सविस्तर चर्चेमुळे देशासमक्ष संपूर्ण सत्य समोर येईल," असे शाह यांनी ठणकावून सांगितले. तसेच, आता विरोधकांनी सभागृहात गोंधळ घालायचा की चर्चा करायची, हे त्यांनीच ठरवावे, असा टोलाही त्यांनी लगावला. काही विरोधक केवळ निवेदन मागित असल्याचा संदर्भ देत शाह म्हणाले की, संसदेत चर्चेसाठी प्रस्थापित नियम आणि कार्यपद्धती आहेत. इतक्या गंभीर विषयावर अशा पद्धतीने घाईघाईने चर्चा होऊ शकत नाही. संसदीय कार्यपद्धतीनुसार सविस्तर चर्चा आणि परंपरेनुसार निवेदन दिले जाणे आवश्यक आहे. अधिवेशन सुरू झाल्यापासून सरकार प्रत्येक विषयावर चर्चेस तयार असल्याचे संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी आधीच स्पष्ट केले होते, अशी आठवणही त्यांनी करून दिली.
नवी दिल्ली : सोशल मीडिया, रील्स आणि इन्फ्लुएन्सर्सच्या या आधुनिक युगात तरुणांनी क्षणिक यशाच्या मागे न धावता मेहनत व संघर्षाचा मार्ग निवडायला हवा, असा ...
दुसरीकडे, संसदेत सत्ताधारी एनडीए आणि विरोधी 'इंडिया' आघाडीचे खासदार एकमेकांसमोर उभे ठाकल्याचे पाहायला मिळाले. झारखंडमधील आंदोलकांवर झालेली पोलीस कारवाई आणि अयोध्येतील राम मंदिर देणगीच्या मुद्द्यावरून दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी झाली. देशभरातील विद्यार्थी आंदोलनावरील चर्चेपासून काँग्रेस नेते राहुल गांधी पळ काढत आहेत, असा आरोप सत्ताधारी खासदारांनी केला. तर, २० जुलै रोजी जंतरमंतरजवळ नीट प्रश्नपत्रिका फुटीविरोधात शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेला लाठीमार, अश्रुधूर आणि पेलेट गनचा कथित वापर यावरून विरोधक गृहमंत्री अमित शाह यांच्या निवेदनाची आणि उत्तराची मागणी करत आहेत. काँग्रेस खासदार प्रियंका गांधी वाड्रा यांनी, "कमीतकमी आमच्या दबावामुळे सत्ताधारी पक्षाला चक्क आंदोलन करण्याची वेळ आली," असे म्हणत सरकारवर निशाणा साधला.





