Monday, August 10, 2026

Dog bite incident in Kalyan : कल्याणमध्ये एकाच पिसाळलेल्या भटक्या श्वानाचा धुमाकूळ; अवघ्या सात तासांत तब्बल १३० जणांना घेतला चावा

Dog bite incident in Kalyan : कल्याणमध्ये एकाच पिसाळलेल्या भटक्या श्वानाचा धुमाकूळ; अवघ्या सात तासांत तब्बल १३० जणांना घेतला चावा

कल्याण : कल्याण पश्चिमेतील बिर्ला महाविद्यालय परिसरातील संदीप हाॅटेल भागात रविवारी दुपारपासून एका पिसाळलेल्या भटक्या श्वानाने प्रचंड दहशत निर्माण केली आहे. केवळ सात ते आठ तासांच्या कालावधीत या एकाच श्वानाने रस्त्यावरील पादचारी, नागरिक, दुचाकी आणि रिक्षाचालकांवर अचानक हल्ले करत तब्बल १३० हून अधिक जणांना चावा घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या भीषण प्रकारामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. प्राप्त माहितीनुसार, रविवारी दुपारी दोन वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंतच्या काळात या पिसाळलेल्या श्वानाने संदीप हाॅटेल परिसर, बिर्ला महाविद्यालय रस्ता, जुने आरटीओ कार्यालय आणि भोईरवाडी परिसरात अक्षरशः धुमाकूळ घातला. हा श्वान पाठीमागून येऊन नागरिकांना अचानक चावत होता. रस्त्यावरून चालणारे पादचारी, दुचाकीस्वार तसेच रिक्षांमागे धावून प्रवाशांवर हल्ले केल्यामुळे नागरिकांमध्ये एकच पळापळ उडाली.

गंभीर जखमींना रुग्णालयात दाखल

अचानक झालेल्या या हल्ल्यांमध्ये जखमी झालेल्या नागरिकांना तातडीने पालिकेच्या कल्याणमधील शास्त्रीनगर आणि रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल करण्यात आले. आतापर्यंत सुमारे ११० ते १३० श्वान दंशाची नोंद रुग्णालयांमध्ये झाली असून, त्यापैकी २५ गंभीर रुग्णांवर रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, एका ११ वर्षांच्या मुलीवर या श्वानाने अत्यंत आक्रमकपणे हल्ला केल्यामुळे ती गंभीर जखमी झाली आहे. तिच्या जखमेची तीव्रता पाहता तिला पुढील उपचारासाठी मुंबईच्या शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात तातडीने पाठवण्यात आले आहे. इतर काही किरकोळ जखमी रुग्णांना प्राथमिक उपचार देऊन घरी सोडण्यात आले आहे, तर काहींना सोमवारी पुन्हा उपचारासाठी बोलावण्यात आले आहे.

स्थानिकांमध्ये संताप आणि प्रशासकीय अनास्था

रविवारची सुट्टी असल्याने अनेक नागरिकांनी घराबाहेर पडणे पसंत केले होते. मात्र, या भटक्या श्वानाच्या प्रचंड दहशतीमुळे नागरिकांनी स्वतःला घरांमध्येच कोंडून घेतले. पालकांनी आपल्या मुलांना सोसायट्यांच्या आवारात किंवा मैदानांवर खेळण्यासाठी सोडणे पूर्णपणे टाळले. या संकटाच्या काळात नागरिकांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु रविवारची सुट्टी असल्याने पालिकेकडून कोणताही तत्पर प्रतिसाद मिळाला नाही, असा गंभीर आरोप स्थानिकांनी केला आहे. एकाच श्वानाने शेकडो नागरिकांना चावा घेतला असतानाही स्थानिक प्रशासन आणि नगरसेवकांनी तातडीने दखल न घेतल्याबद्दल नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. स्थानिक रहिवासी राम तिवारी यांनी सांगितले की, पालिकेने याप्रकरणी वेळीच कडक आणि तत्पर कारवाई करणे आवश्यक होते, परंतु प्रशासनाच्या दिरंगाईमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला.

श्वान निर्बिजीकरण केंद्राच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

या संपूर्ण प्रकरणामुळे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे श्वान निर्बिजीकरण केंद्र पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. हे केंद्र मागील अनेक वर्षांपासून भ्रष्टाचाराने आणि गैरव्यवहाराने बरबटलेले असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. गेल्या वर्षी याच गैरव्यवहाराप्रकरणी आयुक्तांनी एका कर्मचाऱ्याला निलंबितही केले होते. या ताज्या घटनेच्या पार्श्वभूमीवर, श्वान निर्बिजीकरण केंद्राच्या मागील १० वर्षांच्या संपूर्ण कारभाराची सखोल उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. पालिकेने या पिसाळलेल्या श्वानाचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी आर्त हाक नागरिकांकडून दिली जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >