Monday, August 10, 2026

US and Canada Murders : रक्ताने माखले परदेशातील पाय; अमेरिकेत आणि कॅनडात भारतीय तरुणांचे खूनी खेळ उघड

US and Canada Murders : रक्ताने माखले परदेशातील पाय; अमेरिकेत आणि कॅनडात भारतीय तरुणांचे खूनी खेळ उघड

परदेशात उच्च शिक्षणासाठी किंवा नोकरीनिमित्त गेलेल्या भारतीयांशी संबंधित दोन अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आल्या आहेत. अमेरिकेत आणि कॅनडात घडलेल्या या स्वतंत्र हत्याकांडांमध्ये दोन भारतीय तरुणांनी आपल्याच प्रेयसीचे प्राण घेतल्याचे उघडकीस आले असून, दोन्ही आरोपींना आंतरराष्ट्रीय पोलिसांच्या सतर्कतेमुळे अखेर जेरबंद करण्यात आले आहे.

पहिली घटना: अमेरिकेतील ॲरिझोना हत्याकांड

अमेरिकेतील ॲरिझोना येथे शिकणारा २० वर्षांचा भारतीय विद्यार्थी वरुण बाचीगारी याने त्याची १९ वर्षांची अमेरिकन प्रेयसी जुलिसा रूबी सालाझार हिची अत्यंत निर्घृणपणे गळा आवळून हत्या केली. वरुणच्या हिंसक आणि त्रासाला कंटाळून जुलिसा त्याच्यासोबतचे नाते संपुष्टात आणणार होती. मात्र, हे ब्रेकअप मान्य नसलेल्या वरुणने रागाच्या भरात तिचा काटा काढला.

हत्या केल्यानंतर आरोपी वरुणने जुलिसाचा फोन आणि बँक कार्ड चोरले. याच कार्डचा वापर करून तो जर्मनीमार्गे भारतात पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. दरम्यान, जुलिसाच्या कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर अमेरिकन पोलिसांनी कसून तपास केला. 'एफबीआय' (FBI) आणि जर्मन पोलिसांच्या संयुक्त व सतर्क कारवाईमुळे वरुणला बर्लिन विमानतळावर उतरताच बेड्या ठोकण्यात आल्या. आता त्याला अमेरिकेत परत आणून त्याच्यावर 'फर्स्ट-डिग्री मर्डर'चा गंभीर खटला चालवला जाणार आहे.

दुसरी घटना: कॅनडातील हिमांशी खुराना हत्या प्रकरण

दुसऱ्या एका घटनेत, कॅनडातील टोरंटो येथे गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात ३० वर्षीय भारतीय तरुणी हिमांशी खुराना हिची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि तिचा ३२ वर्षांचा प्रियकर अब्दुल गफूरी हत्येनंतर तातडीने देशाबाहेर पळून गेला होता. कॅनडा प्रशासनाने त्याच्याविरोधात देशभरात वॉरंट जारी केले होते. टोरंटो पोलीस फ्युजिटिव्ह स्क्वॉड आणि होमिसाईड युनिटने तब्बल सात महिन्यांच्या अथक तपासानंतर आंतरराष्ट्रीय पोलिसांच्या मदतीने गफूरीचा शोध घेतला आणि त्याला अटक केली. त्याच्यावरही 'फर्स्ट-डिग्री मर्डर'चा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

परदेशात घडलेल्या या दोन्ही अत्यंत घृणास्पद गुन्ह्यांमुळे भारतीय विद्यार्थ्यांच्या वर्तनावर आणि परदेशातील सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, दोन्ही आरोपी आता परदेशी तुरुंगात आपले आयुष्य सडवणार हे निश्चित झाले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >