Saturday, August 8, 2026

Nashik : भिवंडी दुर्घटनेनंतर नाशिक मनपा अ‍ॅक्शन मोडमध्ये ! ६०० अतिधोकादायक वाडे-घरांवर पडणार हातोडा

Nashik : भिवंडी दुर्घटनेनंतर नाशिक मनपा अ‍ॅक्शन मोडमध्ये ! ६०० अतिधोकादायक वाडे-घरांवर पडणार हातोडा

Nashik : भिवंडी येथे धोकादायक इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर नाशिक महानगरपालिका (Nashik Municipal Corporation) प्रशासन सतर्क झाले असून, शहरातील अतिधोकादायक वाडे आणि जुन्या घरांविरोधात कारवाईची मोहीम तीव्र करण्यात आली आहे. मुख्यमंत्री स्तरावरून धोकादायक इमारतींबाबत तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना मिळाल्यानंतर महापालिकेने (Nashik Municipal Corporation) शहरातील अतिधोकादायक बांधकामांची स्वतंत्र यादी तयार करून कारवाईला वेग दिला आहे.

१ हजार २५० धोकादायक घरांना नोटिसा

यंदाच्या पावसाळ्यापूर्वीच महापालिकेच्या नगररचना विभागाने (Town Planning Department) शहरातील सुमारे १ हजार २५० धोकादायक वाडे आणि घरांना नोटिसा बजावून संबंधित इमारती तातडीने रिकाम्या करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच धोकादायक बांधकामे मालकांनी स्वतःहून पाडावीत, असे आदेशही देण्यात आले होते. मात्र, नोटिसांनंतरही अनेक ठिकाणी अपेक्षित कारवाई न झाल्याने पावसाळ्यात विविध भागांत जुन्या वाड्यांचे आणि घरांचे काही भाग कोसळण्याच्या घटना घडल्या.

धोकादायक वाडे रिकामे करा

आता भिवंडी दुर्घटनेची गंभीर दखल घेत महापालिकेने पुन्हा सर्वेक्षण करून शहरातील सुमारे ६०० अतिधोकादायक वाडे आणि घरांची स्वतंत्र यादी तयार केली आहे. या मालमत्तांच्या मालकांना नव्याने नोटिसा बजावण्यात आल्या असून, तातडीने इमारती रिकाम्या करून स्वतःहून पाडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ नये, यासाठी या इमारतींमध्ये वास्तव्य करू न देण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. दरम्यान, महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने धोकादायक वाडे रिकामे करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

१५ अतिधोकादायक वाडे रिकामे

आतापर्यंत शहरातील १५ अतिधोकादायक वाडे आणि घरे रिकामी करण्यात आली आहेत. ज्या ठिकाणी मालकांनी स्वयंस्फूर्तीने कारवाई केली नाही, त्या ठिकाणी महापालिकेकडून यंत्रसामग्रीच्या सहाय्याने पाडकाम केले जात आहे. या कारवाईवर होणारा संपूर्ण खर्च संबंधित मालमत्ता मालकांकडून वसूल करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. गुरुवारी पंचवटी परिसरातील काळाराम मंदिर दक्षिण दरवाजा आणि सरदार चौक परिसरातील सात धोकादायक वाडे पाडण्यात आले. याशिवाय विकासकामांना अडथळा ठरणारी अतिक्रमणेही हटविण्यात आली. शहरात भिवंडीसारखी दुर्घटना घडू नये, यासाठी ही मोहीम पुढील काळात आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

धोकादायक इमारतींबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण करणाऱ्या वाड्यांवर नियमानुसार कारवाई सुरू आहे. संबंधित मालकांनी नोटिशींचे पालन करून इमारती स्वतःहून रिकाम्या कराव्यात. अन्यथा महापालिका कारवाई करून त्याचा खर्चही संबंधितांकडून वसूल करेल, असे मनपा उपआयुक्त सुवर्णा दखणे या म्हणाल्या.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >