Monday, August 3, 2026

COVID-19 : साथीच्या आजारांसोबत कोविड आणि एन१एन१च्या रुग्णांतही झालीय वाढ

COVID-19 : साथीच्या आजारांसोबत कोविड आणि एन१एन१च्या रुग्णांतही झालीय वाढ
मुंबई (विशेष प्रतिनिधी) :मुंबईत साथीच्या आजारांनी पुन्हा डोके वर काढले असून मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरेसीस, गॅस्ट्रो याबरोबरच कोविड आणि एन१ एन १ या आजारांच्या रुग्णांतही दुप्पट वाढ दियून येत आहे. मागील महिन्यात कोविडचे जिथे २७ रुग्ण होते, तिथे जुलै महिन्यांत या रुग्णांची संख्या ५८ आढळून आली आहे, तर एच१ एन१चे जिथे मागील महिन्यात ५८ रुग्ण होते, तिथे या जुलै महिन्यातील या आजारांचे एकूण रुग्ण १०५ असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे साथीच्या आजारांबरोबरच कोविड आणि एच१एन१च्या रुग्णांमध्ये होणारी वाढही मुंबईकरांना आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचा संदेश देणारी ठरत आहे. ( COVID-19) मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत पावसाळाजन्य आजारांची आणि रुग्णांची माहिती जाहीर केली जाते. या आजारांच्या रुग्णांच्या आकडेवारीनुसार मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरेसीस या आजारांमध्ये मागील महिन्याच्या तुलनेत दुप्पट वाढ झालेली पाहायला मिळत आहे. महापालिका आरोग्य विभागाने ही या आजाराची वाढती संख्या पाहता चिंता व्यक्त केली असली तरी आरोग्य विभागामार्फत सर्व पालिका रुग्णालये आणि आरोग्य केंद्रांच्या परिसरात मलेरिया, डेंग्यूच्या प्रतिबंधासाठी नियमित सवेक्षण, अळीनाशक फवारणी, आणि पाणी साचणाऱ्या ठिकाणांचा नायनाट करून शून्य डास प्रजनन मोहिम प्रभावीपणे राबवली जात आहे. रुग्णालयाच्या परिसरात डासांची उत्पत्ती रोखून तिचे येणारे रुग्ण आणि त्याचे नातेवाईक आणि डॉक्टरांना मलेरिया व डेंग्यूच्या आजारांपासून वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार १ ते ३१ जुलै २०२६ या एक महिन्याच्या कालावधीत ६ लाख ५९ हजार ३९६ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले, तर १२३ आरोग्य शिबिर घेण्यात आले.
गैस्ट्रोचे सांताक्रुझ, घाटकोपर, वांद्रे परिसरात रुग्ण मुंबईमध्ये जून महिन्यात गॅस्ट्रोचे ६०३ रुग्ण होते, तर त्यातुलने जुलै महिन्यांत ८५१ रुग्ण आढळून आले आहेत. हे सर्व रुग्ण प्रामुख्याने एल विभाग (कुरेशी नगर, इंदिरा नगर, नेहरू नगर), एच-पश्चिम विभाग (दत्त नगर, महाराष्ट्र नगर, शिवाजी नगर), के-पश्चिम विभाग (इंदिरा नगर, नेहरू नगर, जुनेद नगर), एन-विभाग (रमाबाई नगर, कामराज नगर, आझाद नगर) आणि एच-पूर्व विभाग (बहराम नगर, शास्त्री नगर, गरीब नगर) या विभागामध्ये गॅस्ट्रोच्या रुग्णसंख्येत वाढ दिसून येत आहे. तरी नागरिकांनी खबरदारी व प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. जेवण्यापूर्वी हात धुवा किंवा हँड सॅनिटायझर वापरा. पाणी उकळून प्या. असे आवाहन करण्यात येत आहे.   लेप्टोस्पायरोसिसच्या रुग्णांतही वाढ लेप्टोस्पायरेसीसच्या रुग्णांची मागील महिन्यात ३३ एवढी संख्या होती, ही संख्या जुलै महिन्यात ७८ एवढी झाली आहे. साचलेल्या पाण्यातून चालणे आणि जर त्यांच्या पायाला जखम किंवा लागले असल्यास त्यांना याची बाधा होते. एफ-उत्तर विभाग (भारतीय कमला नगर, संगम नगर, जीटीबी नगर), एम-पूर्व विभाग (भारत नगर, शास्त्री नगर, शिवाजी नगर), टी विभाग (गौतम नगर, दर्गा रोड, अंबिका नगर), के पूर्व-विभाग (नाणी मामू चाळ, साकी नाका, चकाला एमआयडीसी) आणि जी-उत्तर विभाग (धारावी) या विभागामध्ये लेप्टोस्पायरोसिसच्या रुग्णसंख्येत वाढ दिसून आली आहे साचलेल्या पावसाच्या पाण्यात चालणे टाळा. मुसळधार पावसात उघड्या पायाने चालणे टाळा. जेव्हा शक्य असेल तेव्हा गम बूटचा वापर करा. साचलेल्या पावसाच्या संपर्कात आल्यास वैद्यकीय सल्ल्यानुसार रोगप्रतिबंधक उपचार घ्यावेत, असे आवाहन करण्यात येत आहे.   साथीच्या आजारांसोबत कोविड आणि एन१एन१च्या रुग्णांतही झालीय वाढ कोविड १९च्या रुग्णांमध्ये मागील महिन्याच्या तुलनेत दुप्पट वाढ झाली आहे, मागील महिन्यात जिथे २७ रुग्ण होते, तिथे आता ५८ रुग्ण आहेत. तर एच१एन१चे जिथे मागील महिन्यांत ५८ रुग्ण होते, तिथे १०५ रुग्ण होते. त्यामुळे खोकला असल्यास काळजी घ्या, साबण आणि पाण्याने वारंवार हाथ धुवा,योग्य आहार व आराम करा, अति जोखमीच्या व्यक्ती विशेषतः कमी प्रतिकार शक्ती असलेले रुग्ण उदाः कॅन्सर, वृद्ध नागरिक, मधुमेह, उच्य रक्तदाब, किडनी आजार, इत्यादी रुग्णांनी योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन महापालिका सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे. तसेच नागरिकांनी ताप असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या, स्वतः औषधे घेणे टाळा आणि घराजवळच्या महापालिका आरोग्यकेंद्र/दवाखाना /रुग्णालयात जाऊन त्वरित सल्ला घ्या असेही आवाहन केले आहे.   आजार आणि कंसात महिना तसेच रुग्ण संख्या मलेरिया (जून २०२६: ६५५, जुलै २०२६ : १३८०) डेंग्यू (जून २०२६ : २६६, जुलै २०२६ : ४६६) चिकुन गुनिया (जून २०२६ : ०७, जुलै २०२६ : ०७) लेप्टोस्पायरेसी(जून २०२६: ३३, जुलै २०२६ : ७८) गॅस्ट्रो (जून २०२६ : ६०३, जुलै २०२६ : ८५१) कोविड १९ (जून २०२६: २७, जुलै २०२६ : १०५) एच१ एन१ (जून २०२६: ५८, जुलै २०२६ : १०५)
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >