Biomining Project : राज्यातील १० शहरांमधील कचऱ्याचे डोंगर हटणार; बायोमायनिंग प्रकल्पांसाठी ५२ कोटी

ठाणे, कल्याण-डोंबिवली, पिंपरी-चिंचवडसह १० नागरी संस्थांचा समावेश



मुंबई : राज्यातील प्रमुख शहरांमध्ये वर्षांनुवर्षे साचून राहिलेल्या कचऱ्याच्या डोंगरांचा (लेगसी वेस्ट) शास्त्रोक्त पद्धतीने निपटारा करण्यासाठी राज्य शासनाने विशेष नियोजन केले आहे. 'स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.०' मधील 'डंपसाईट रिमेडिएशन ॲक्सिलेटर प्रोग्राम' (डीआरएपी) अंतर्गत राज्यातील १० नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ९ लाख ५१ हजार १५० मेट्रिक टन साठलेल्या कचऱ्यावर 'बायोमायनिंग' प्रक्रिया करण्यासाठी ५२ कोटी ३१ लाख ८२ हजार ५०० रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय (जीआर) नगर विकास विभागाने सोमवारी जारी केला.



शहरे पूर्णपणे कचरामुक्त करणे आणि जुन्या डंपिंग ग्राऊंडवर साचलेला कचरा हटवून जमिनी मोकळ्या करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. नगरविकास विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय तांत्रिक समिती आणि केंद्र सरकारच्या 'राष्ट्रीय सल्लागार व पुनरावलोकन समिती'च्या मंजुरीनंतर ही प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. या प्रकल्पाच्या एकूण ५२.३१ कोटी खर्चापैकी १४ कोटी ७९ लाख रुपये केंद्र सरकार, १९ कोटी १० लाख रुपये राज्य शासन आणि उर्वरित १८ कोटी ४१ लाख रुपये संबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्था उचलणार आहेत.





शासन निर्णयानुसार सर्व संबंधित महापालिका आणि नगरपरिषदांना येत्या १५ दिवसांच्या आत या कामाची ई-निविदा प्रक्रिया प्रसिद्ध करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पारदर्शकता राखण्यासाठी प्रकल्प सुरू होण्यापूर्वीच्या आणि काम पूर्ण झाल्यानंतरच्या जागेचे जीपीएस फोटो तसेच सीसीटीव्ही चित्रण अभिलेखात ठेवावे लागणार आहे. बायोमायनिंग प्रक्रियेनंतर तयार होणाऱ्या 'रिफ्युज डिराईव्हड फ्युएल' (आरडीएफ) आणि इतर दुय्यम उत्पादनांची योग्य विल्हेवाट लावण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदार आणि पालिकेची असेल. या कामाचा मासिक प्रगती अहवाल शासनाला सादर करावा लागणार असून मुदतीत काम पूर्ण करण्याची वैयक्तिक जबाबदारी महापालिका आयुक्त आणि मुख्याधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे.




कुठल्या शहरात किती कचरा?


या निर्णयानुसार सर्वाधिक कचरा प्रक्रिया ही ठाणे महानगरपालिकेत होणार असून, तेथील ४ लाख २५ हजार मेट्रिक टन कचऱ्यासाठी २३.४२ कोटींचा प्रकल्प खर्च मंजूर करण्यात आला आहे. त्याखालोखाल भिवंडी-निझामपूर पालिकेतील २ लाख ६० हजार मेट्रिक टन कचऱ्यासाठी १४.३० कोटी, नांदेड-वाघाळा पालिकेतील ७६ हजार मेट्रिक टन कचऱ्यासाठी ४.१८ कोटी, पिंपरी-चिंचवडमधील ७५ हजार मेट्रिक टन कचऱ्यासाठी ४.१३ कोटी आणि वसई-विरार पालिकेतील ५७ हजार मेट्रिक टन कचऱ्यासाठी ३.१४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. याशिवाय उल्हासनगर पालिकेसाठी २.२० कोटी (४० हजार मेट्रिक टन), कल्याण-डोंबिवलीसाठी ५२ लाख (१० हजार मेट्रिक टन), मीरा-भाईंदरसाठी २५ लाख (५ हजार मेट्रिक टन), मनमाड नगरपरिषदेसाठी १७ लाख (३ हजार मेट्रिक टन) आणि ओझर नगरपरिषदेसाठी ८२ हजार ५०० रुपयांचा (१५० मेट्रिक टन) निधी मंजूर करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

CM Devendra Fadnavis : धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष यांच्यात सामजंस्य करार करणार

मुंबई : राज्यभरातील मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची सोय व्हावी

Prakash Abitkar : गावापासून जिल्हा रुग्णालयापर्यंत ‘मानकांनुसार आरोग्यसेवा’

मुंबई : राज्यातील नागरिकांना त्यांच्या गरजेनुसार दर्जेदार, सुलभ आणि वेळेत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी

Rain In Maharashtra : महाराष्ट्रात पाऊस पुन्हा फॉर्मात येणार, कोणत्या जिल्ह्यांमध्ये जोरात बरसणार ?

मुंबई : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पावसाने पुन्हा एकदा महाराष्ट्राकडे मोर्चा वळवल्याचे चित्र आहे.

Ashish Shelar : गणेशमूर्ती आगमन मार्गांची २४ तासांत पाहणी; प्रशासकीय कसूर आढळल्यास कारवाई - आशिष शेलार

मुंबई : भुलेश्वरचा राजा गणेश मंडळाच्या गणेशमूर्ती आगमन सोहळ्यात झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील

Weather Update : महाराष्ट्रात सोमवारी कोण कोणत्या भागात पावसाची शक्यता ?

मुंबई : हवामान खात्याच्या अंदाजानुसार सोमवार २४ ऑगस्ट २०२६ रोजी महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे.

Indian Railway : भारतीय रेल्वेचा नवा विक्रम; पहिल्या डबल-स्टॅक लाँग-हॉल कंटेनर ट्रेनची यशस्वी धाव

मुंबई : भारतीय रेल्वेने मालवाहतुकीच्या क्षेत्रात महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट (JNPT) येथून