स्मृतीगंध - लता गुठे
मन हा अवघ्या दोन अक्षरांचा शब्द! पण या दोन अक्षरांत माणसाचं संपूर्ण जग सामावलेलं आहे. मन हे प्रत्येकाकडे असतं; परंतु दिसत मात्र नाही. त्याला शोधायला गेलं तर ते नेमके कुठे आहे, कसे आहे याचा पत्ता लागत नाही. म्हणूनच मी माझ्या कवितेत म्हटलं आहे...
मन सापडत नाही, नाही त्याचा थांगपत्ता
त्याला जाते शोधायला, साऱ्या देहावर त्याची सत्ता
असे हे मन. जेव्हा आपल्याला कोणी वाईट बोलतो तेव्हा आपण म्हणतो, माझ्या मनाला खूप लागलं. मनात काहीतरी टोचतंय, बोचतंय. आज मला खूप आनंद झाला. हे कळत नकळत आपल्या तोंडून निघून जाते. मला वाटतं ज्या ठिकाणी आपल्याला संवेदनाची जाणीव होते ते ठिकाण म्हणजे आपले मन. इतर अवयव दिसतात, जाणवतात; परंतु मन हे शोधण्यासाठी आजवर कोणतेच उपकरण बाजारात नाही आले. त्यामुळे त्याचा कसा आकार आहे हे कोणीही सांगू शकत नाही. शरीराला आकार असतो, चेहरा असतो पण मनाला कोणताही आकार नसतो. तरीही आपल्या प्रत्येक विचाराला, भावनेला, स्वप्नाला आणि निर्णयाला दिशा देण्याचं सामर्थ्य मनातच असते. मन दिसत नाही, पण जाणवतं. जेव्हा आपण आत्मपरीक्षण करतो त्यावेळेला मानाचा आवाज ऐकू येतो, तो कधी अस्वस्थ करणारा असतो. तर कधी सुख देणारा असतो. मन हे आपल्या प्रत्येक कृतीला साक्षी असते. मनात येणारे विचार कधी सकारात्मक तर कधी नकारात्मक असतात ते कधी आशेची किरणे दाखवतात, तर कधी निराशेच्या अंधारात घेऊन जातात. विचारांना दिशा देण्याचे काम आपणच करत असतो.
संतांनीही मनाचे अस्तित्व मान्य केले आहे.
संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगात असे म्हटले आहे, ‘मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण’ मन प्रसन्न का ठेवणे आवश्यक आहे? तर ते आपले सर्व यश, मोक्ष, बंधन आणि सुख-समाधानाचे मूळ कारण आहे. आपले मनच देव मूर्तिरूपात स्थापन करते, मन प्रसन्न आणि शुद्ध असेल तर सर्व सिद्धी प्राप्त होतात. म्हणून मन प्रसन्न ठेवायला पाहिजे. मन दुखी असेल तर तिथे सुखाची अनुभूती होणार नाही.
माणसाचा सतत स्वतःच्या मनाशी संवाद सुरू असतो. जीवनात येणाऱ्या अनेक समस्या प्रश्न तो स्वतःलाच विचारत असतो ‘काय करावं, काय करू नये? हे का घडले? आज मला असं का वाटतंय? उद्याचं काय? असे असंख्य प्रश्न सुप्त मनाच्या पडद्यावर उमटत असतात. मन म्हणजे जणू अथांग गुहाच आहे. ही गुहा कशी आहे याविषयी मानसशास्त्रज्ञांनी केलेल्या व्याख्या मानसशास्त्रज्ञांच्या मते, मन (Mind) म्हणजे मानवी बुद्धिमत्ता, भावना, जाणिवा आणि विचारांचा समुच्चय होय. हे केवळ मेंदूचे कार्य नसून त्याद्वारे व्यक्तीचे वर्तन आणि पर्यावरणाशी होणारी आंतरक्रिया नियंत्रित होते. आधुनिक मानसशास्त्रात मनाचे स्वरूप समजून घेण्यासाठी विविध विचारप्रवाहांच्या आधारे व्याख्या केल्या गेल्या आहेत.
सिग्मंड फ्रॉइड या सुप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञाने मनाचे प्रामुख्याने तीन भागांत वर्गीकरण केले आहे : जागृत मन : जागृत मनात वर्तमानात आपण ज्या गोष्टींचा विचार करत आहोत किंवा ज्या जाणिवा आपल्याला आहेत त्याचा विचार करणे.
अर्ध-जागृत मन ज्या गोष्टी आपण सहजपणे आठवू शकतो, पण सध्या त्या विचारांमध्ये नसतात.
अजागृत मन : खोलवर दडलेल्या इच्छा, भीती आणि वेदनादायक आठवणी, ज्यांचा आपल्या नकळत आपल्या वर्तनावर मोठा प्रभाव पडतो. या विचारसरणीनुसार मन म्हणजे माहितीवर प्रक्रिया करणारी एक प्रणाली आहे. मनाला भूतकाळाची ओढ असते आणि भविष्याची चिंता. वर्तमान मात्र त्याच्या हातातून अनेकदा निसटून जातो. काल घडून गेलेल्या एखाद्या छोट्याशा प्रसंगाची आठवण मन पुन्हा पुन्हा उलगडत राहतं. एखादं गोड वाक्य, एखादी भेट, एखादा स्पर्श, एखादं गाणं किंवा एखादा सुगंध - इतकंसं निमित्त पुरेसं असतं आणि मन क्षणार्धात अनेक वर्षे मागे जातं. बालपणाच्या अंगणात उभं राहतं. जुन्या घराच्या ओसरीवर बसतं. आईच्या हाकेचा आवाज ऐकतं. मित्रमैत्रिणींच्या सहवासात हरवून जातं.
बहिणाबाई चौधरी यांनी त्यांच्या कवितेत मनाचे काही वैशिष्ट्ये अधोरेखित केली आहेत त्यांच्याच कवितेतील खालील ओळी...
मन एवढ एवढं, जसा खाकसाचा दाणा
मन केवढ केवढं, अभयात बी माहिना
असं हे मन कधी खाकसाच्या दाण्याएवढं लहान तर कधी आभाळातही मावणार नाही एवढं विशाल आहे.
मन म्हणजे मंदिरासारखं आहे. त्यात आपण कोणाला स्थान देतो, कोणत्या विचारांना प्रवेश देतो आणि कोणत्या आठवणी जपतो, हे आपल्या हातात असतं. म्हणून मनात द्वेषापेक्षा प्रेम, संशयापेक्षा विश्वास, निराशेपेक्षा आशा आणि तक्रारींपेक्षा कृतज्ञता वाढवायला हवी.
किती विलक्षण आहे ना मन! शरीर वर्तमानात असतं आणि मन मात्र क्षणात भूतकाळात पोहोचतं आणि क्षणात भविष्याची स्वप्न दाखवते. त्या स्वप्नांना आकार द्यायचं मात्र आपल्या विचारांच्या हातात असते. ते स्वातंत्र्य मात्र आपल्याकडे असते आपल्या वाट्याला यश येते की अपयश हे आपल्या विचारांवर अवलंबून असते. मनाला आपण जशा सूचना देतो तसे फीडबॅक मिळतात.
मानसशास्त्रज्ञाने मनाचा अभ्यास करताना मनाचे दोन भाग वर्णन केले आहेत. एक म्हणजे प्रकट मन व दुसरे सुक्त मन. जे आपण पाहतो, अवलोकन करतो ते सर्व प्रकट मन साठवत असते. लहानपणी काही वाईट घटना घडल्या किंवा आपण ज्या सूचना देतो त्या सुक्त मनात स्टोअर होतात. भूतकाळातील अनेक आठवणी मनाच्या कोपऱ्यात दडून बसलेल्या असतात. वेळ आली की त्या सतावू लागतात. काही आठवणी गंधासारख्या असतात-हळूच येतात आणि तनमन सुगंधी करून टाकतात. काही आठवणी डोळ्यांत पाणी आणतात. काही आठवणी ओठांवर हसू आणतात. काही आठवणी मात्र मनाच्या एखाद्या कोपऱ्यात कायमची वेदना बनून राहतात. काळ पुढे जातो, परिस्थिती बदलते, माणसं दूर जातात; पण मनाच्या पानावर लिहिलेली काही पानं कधीच पुसली जात नाहीत.
आपण घराची स्वच्छता करतो, कपड्यांची काळजी घेतो, शरीराची निगा राखतो; तसेच मनाची स्वच्छता करणे गरजेचे असते. विकाराचा कचरा मनात साचलेला असतो तो म्हणजे, राग, लोभ, मोह, मत्सर, दुःख, अपराधीपणा हा कचरा साफ करण्यासाठी जप, तप, ध्यानधारणा याचा वापर करून तो दूर करता येतो असे पतंजलीची योग साधना व संतांनी सांगितले आहे. मनात नकारात्मक विचार साचले तर मन अस्वस्थ होते. म्हणून मनालाही अधूनमधून स्वच्छ करणं गरजेचं असतं.
कधी एखाद्याशी मनमोकळं बोलावं. कधी शांत बसावं. कधी निसर्गाकडे पाहावं. कधी एखादं पुस्तक वाचावं. कधी संगीत ऐकावं, तर कधी स्वतःलाच स्वतःची सोबत द्यावी. एकटेपणा आणि एकांत यातही मोठा फरक आहे. एकटेपणात माणूस स्वतःपासून दूर जातो; एकांतात तो स्वतःच्या अधिक जवळ येतो. बाहेरच्या गोंगाटापासून थोडं दूर झालं की, मनातील अनेक आवाज स्पष्ट ऐकू येतात. आपण स्वतःला प्रश्न विचारू लागतो आणि काही प्रश्नांची उत्तरंही आतूनच मिळतात.
माणसांप्रमाणेच मनालाही प्रेमाची भूक असते. कितीही संपत्ती मिळाली, कितीही यश मिळालं, कितीही प्रसिद्धी मिळाली, तरी आपल्याला कोणीतरी समजून घ्यावं, आपल्या आनंदात सहभागी व्हावं, आपल्या दुःखाच्या वेळी शांतपणे जवळ बसावं, अशी मनाची एक साधी अपेक्षा असते. माणसाला नेहमी मोठ्या गोष्टींची गरज नसते. कधी प्रेमाने विचारलेलं ‘काय झालं?’ हे एक वाक्यही मनाला आधार देऊन जातं. मनाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते अपेक्षा करते समोरच्याने आपल्याला समजून घ्यावं, आपल्या मनाप्रमाणे वागावं, आपल्याला महत्त्व द्यावं, अशी अपेक्षा करतो. पण प्रत्येक माणसाचं मन वेगळं असतं. प्रत्येकाच्या अनुभवांची शिदोरी वेगळी असते. म्हणून प्रत्येकाकडून आपल्या मनाप्रमाणे वागण्याची अपेक्षा करणं म्हणजे स्वतःच्या मनावरच ओझं ठेवणं होय.
कधी कधी मनाला सोडून देणंही शिकावं लागतं.
काही माणसं आयुष्यात येतात आणि कायमची मनात राहतात. काही जण थोडा काळ सोबत करतात आणि निघून जातात. काही नाती काळाच्या ओघात बदलतात. काही स्वप्नं अपूर्ण राहतात. काही इच्छा पूर्ण होत नाहीत. पण प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी घडली पाहिजे, हा हट्ट सोडला की जीवन अधिक सुंदर वाटू लागतं. कारण जीवन हे आपल्या मनाप्रमाणे चालणारं नाटक नाही, तर ते सतत बदलणाऱ्या प्रसंगांचं वास्तव आहे.
मनाला स्वप्नं पाहायला फार आवडतात. डोळे मिटले की मन स्वतःचं एक जग निर्माण करतं. तिथे अशक्यही शक्य होतं. दूर गेलेली माणसं पुन्हा भेटतात. अपूर्ण राहिलेल्या इच्छा पूर्ण होतात. हरवलेले क्षण परत येतात. म्हणूनच स्वप्नं मनाला जगण्याची नवी उमेद देतात. प्रत्येक स्वप्न पूर्ण होईलच असं नाही; पण स्वप्न पाहण्याची क्षमता जिवंत ठेवणं आवश्यक आहे.
दुसरं वैशिष्ट्य म्हणजे मन हरतही आणि पुन्हा उभंही राहतं. आयुष्यातील संकटं माणसाला बाहेरून जितकी तोडतात, त्यापेक्षा जास्त ती आतून हलवतात. पण मनाची खरी ताकद संकटाच्या वेळीच दिसते. मन दुःखानंतर पुन्हा सुखाची अनुभूती करून देते.
एखाद्या व्यक्तीच्या शांततेतही असंख्य प्रश्न दडलेले असतात. म्हणूनच माणसाचा चेहरा वाचण्यापेक्षा त्याचं मन समजून घेणं अधिक महत्त्वाचं असतं. आपण दुसऱ्याच्या मनाचा अंदाज अनेकदा बाह्य वर्तनावरून घेतो. पण प्रत्येक हसऱ्या चेहऱ्यामागे आनंद असेलच असं नाही. प्रत्येक शांत माणूस समाधानी असेलच असं नाही. प्रत्येक बोलका माणूस मनाने मोकळा असेलच असं नाही. म्हणून कोणाच्याही मनाचा निर्णय घाईने घेऊ नये. मन दिसत नाही. त्याला समजून घ्यावं लागतं. ध्येयाच्या वाटेवर धावताना आपण मनाचा विचार अनेकदा करत नाही. माझं काय चुकलं? मला काय हवं आहे. मला कुठे जायचं आहे? हे प्रश्न स्वतःलाच विचारा म्हणजे याची उत्तरे मनाकडून तुम्हाला मिळतील. या प्रश्नाचं उत्तर शोधणं म्हणजेच स्वतःला शोधणं.
मनाला समजून घेतलं की आयुष्य समजायला लागतं. मनाला स्वीकारलं की स्वतःचा स्वीकार करता येतो. मनाला शांत केलं की जगाकडे पाहण्याची दृष्टी बदलते आणि मनात प्रेम जिवंत ठेवलं की, आयुष्य कितीही कठीण असलं तरी त्यात जगण्यासारखं काहीतरी नक्की सापडतं. अशाप्रकारे मनाचा शोध आणि बोध माझ्या माहितीप्रमाणे घेतला आहे.