नॉस्टॅल्जिया; श्रीनिवास बेलसरे
कालच देशाचा ८०वा स्वातंत्र्य दिन देशभर आणि जगातील सर्व भारतीय वकिलातीत साजरा करण्यात आला. त्यावेळी काही ठिकाणी, विशेषत: उपक्रमशील चांगल्या शाळात, नक्कीच “हम होंगे कामयाब, एकदिन” हे गीत सामूहिकपणे गायले गेले असणार. जेव्हा निरागस शाळकरी मुले हे गीत गातात तेव्हा मनात एक सात्त्विक समूहभावना, देशभक्ती जागृत होते. संवेदनशील मनांना हे गीत भावुक करून टाकते. मात्र फार थोड्या लोकांना हे माहीत असेल की ते अमेरिकी कृष्णवर्णीयांच्या ‘नागरी हक्क चळवळी’तून निर्माण झाले आहे. मुळात ते न्यू जर्सीतील मेथडीस्ट चर्चच्या रेव्ह. चार्ल्स अल्बर्ट टिंडली यांनी रचलेले एक भक्तिगीत होते! त्याचे मूळ शब्द होते, ‘आय विल ओव्हरकम सम डे.’ अध्यात्मिक मार्गावर पुढे जाताना मी ईश्वरकृपेने विकारांवर, माझा मनाच्या दुर्बलतेवर कसा विजय मिळवेन त्याचे वर्णन रेव्हरंडसाहेबांनी केले होते.
आज जरी इतिहासाचा फारसा अभ्यास नसलेले लोक अमेरिकेकडे ‘लोकशाहीचा मानदंड’ म्हणून बघत असले तरी वास्तव अगदी वेगळे आहे! जवळजवळ ४०० वर्षे अमेरिकेत गुलामगिरीची पद्धत बिनबोभाट सुरू होती हा त्या देशाचा काळाकुट्ट इतिहास आहे! आफ्रिकेतील गरीब असहाय्य माणसांना जनावरांसारखे पकडून अमेरिकेत आणले जायचे. अमेरिकेत आधीपासून स्थायिक असलेल्या आदिवासींना हाकलून, गोळ्या घालून, स्थापन झालेल्या युरोपीय, विशेषत: इंग्लंडच्या वसाहतीसाठी, गुमान ढोर मेहनत करणाऱ्या मजुरांची गरज असायची. अमेरिकी लोक कष्ट करायला तयार नसल्याने तंबाखू आणि ऊस मळ्यात काम करायला कृष्णवर्णीयांना जनावरासारखे पकडून आणले जाई. जहाजात गुराढोरांसारखे कोंबून बसवल्याने काही जण गुदमरून मरत. काही प्रदीर्घ समुद्रप्रवासात नाना रोग होऊन तर काही उपासमारीने मरत. पण अमेरिकी मळेमालकांना त्याने काहीही फरक पडत नसे. हा होता अमेरिकेचा मानवी हक्कांबाबतचा खरा इतिहास!
मात्र अतिशय उदात्त भावना आणि धार्मिक श्रद्धा व्यक्त करणारे मेथडीस्ट चर्चच्या रेव्ह. चार्ल्स अल्बर्ट टिंडली यांनी रचलेल्या भक्तिगीताचे शब्द, पुढे अमेरिकेच्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या खासदार झालेल्या, ल्युसील सिमन्स यांना प्रेरणादायी वाटले. त्यांनी ते दक्षिण कॅरोलीना राज्यातील ‘चार्ल्सस्टन सिगार फॅक्टरी’त १९४५ साली झालेल्या कामगारांच्या संपात गायले.
मूळ गीतातील ‘आय’ (I) या शब्दाच्या जागी मग स्वाभाविकत:च ‘वी’ (We) हा शब्द आला. कामगार संघटनेच्या श्रीमती झिल्फिया हॉर्टन यांनी मग ते टेनेसीमधील हायलँडर फोक स्कूलमधल्या कामगार आणि नागरी हक्क चळवळीच्या कार्यकर्त्यांना शिकवले. नंतर पीटर सिगर यांनी संगीत दिलेले हे गाणे गाय कॅरॅव्हान यांनी १९५९ मध्ये ‘धरणे आंदोलनात’ आणि तुरुंगातील कैद्यांच्या विरोध निदर्शनात गायले.
वॉशिंग्टनला १९६३ साली निघालेल्या मोर्चामध्ये जॉन बाएझ यांनी सामूहिकपणे गायलेले हे गीत मग आंतरराष्ट्रीय मानवी हक्क चळवळींचे मुक्तिगीतच होऊन बसले! राष्ट्रपती लिंडन बी. जॉनसन यांनी तर त्यांच्या १९६५ सालच्या ‘मतदान हक्क सुधारणा कायद्या’बद्दल बोलतानाच्या सिनेटमधील भाषणात या ओळी उद्धृत केल्या होत्या!
प्रसिद्ध कवी आणि नाटककार गिरीजाकुमार माथुर यांनी दूरदर्शनमध्ये कार्यरत असताना या गाण्याचा सुंदर हिंदी अनुवाद करून त्याला सतीश भाटिया यांच्या मदतीने सुंदर अनुरूप संगीत दिले. दूरदर्शनच्या वाद्यवृंदाकडून गावून घेतल्यावर ते अनेकदा राष्ट्रीय महत्त्वाच्या दिवशी दूरदर्शनवर वाजवले गेले. त्यामुळे अनेक शाळात ते शिकवले गेले आणि खूप लोकप्रियही झाले. त्यानंतर प. बंगालमध्ये प्रसिद्ध बंगाली लोकगीत गायक हेमांगा बिस्वास यांनी त्याचा बंगाली अनुवाद ‘अमरा कोरबो जोय’ गायल्यावर ते प. बंगाल आणि शेजारच्या बंगला देशातही पसरले. पुढे ते भूपेन हजारिका यांच्या आवाजात ध्वनिमुद्रितही करण्यात आले. त्यानंतर १९७१च्या बंगलादेश मुक्तिसंग्रामातही ते गाजले होते.
सर्वांना परिचित असलेले त्या जबरदस्त गाण्याचे शब्द होते -
“हम होंगे कामयाब,
हम होंगे कामयाब,
हम होंगे कामयाब,
एक दिन!
हो हो मन में है विश्वास, पूरा है विश्वास,
हम होंगे कामयाब एक दिन...”
दूरदर्शनच्या वाद्यवृंदाने सगळा आशय अतिशय अनुरूप संगीत देऊन जिवंत केला होता! केवळ एखाद्या देशाच्याच नव्हे तर सर्व मानवजातीच्या अनेक समस्या कायमच्या सुटू शकतात असा आश्वासक संदेश देणारे हे गाणे एकंदर भारतीय समाजाच्या संवेदनहीनतेमुळे फक्त गाणेच बनून राहिले. त्याचा विचार एक सामूहिक निर्णय किंवा टिकाऊ निर्धार होऊ शकलाच नाही.
उलट आपली मागणी राज्यकर्त्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी हिंसाचार आवश्यक आहे, अत्यंत बेबंद वर्तन गरजेचे आहे, ही धारणा दृढ होत गेलेली दिसते आहे तेव्हा गाण्यातील सुंदर कवितेला, उदात्त विचारांत किती अर्थ शिल्लक आहे, माहीत नाही. पण आजही ते शांत सात्त्विक शब्द खूप महत्त्वाचे वाटतात.
सगळीकडे जाणीवपूर्वक पसरवण्यात येत असलेल्या अशांती, द्वेष, तिरस्काराच्या पार्श्वभूमीवर अमेरिकी चर्चेमध्ये शांत स्वरात घुमलेले ते रेव्ह. चार्ल्स अल्बर्ट टिंडली यांचे शब्द समाजाला अंतर्मुख करून नवा उदात्त मानवी संदेश देऊ शकतील असे उगाचच वाटत राहते -
“होगी शांति चारों ओर,
होगी शांति चारों ओर,
होगी शांति चारों ओर,
एक दिन.
हो हो मन में है विश्वास, पूरा है विश्वास,
होगी शांति चारों ओर, एक दिन.”
देशात जातीजातीत, धर्माधर्मात, वेगवेगळ्या भाषासमुदायात क्षुद्र स्वार्थासाठी रुजवल्या जाणाऱ्या परस्परद्वेषाच्या पार्श्वभूमीवर ‘लेके हाथोमे हाथ, हम चलेंगे साथ साथ’ या ओळी तर अस्वस्थ करतात -
“हम चलेंगे साथ-साथ,
डाले हाथोंमें हाथ,
हम चलेंगे साथ-साथ, एक दिन.
हो हो मनमें है विश्वास, पूरा है विश्वास,
हम चलेंगे साथ-साथ, एक दिन.”
जेव्हा कधी कुणालाही अटक होईल, तुरंगात टाकले जाईल अशी भीती वाटत असताना -
“नहीं डर किसीका आज,
नहीं भय किसीका आज,
नहीं डर किसीका, आजके दिन,
हो हो मन में है विश्वास, पूरा है विश्वास,
नहीं डर किसीका आजके दिन.”
हे शब्द काल्पनिक का होईना पण दिलासा देणारे वाटतात. अतिशय भावुकपणे निरागस शालेय मुले हे गीत गातात तेव्हा आपल्यालाही स्थिती सुधारेल असे पूर्वी वाटायचे! पण अलीकडची बिघडत चाललेली, किंबहुना जाणीवपूर्वक बिघडवण्यात येत असलेली राजकीय, सामाजिक परिस्थिती पाहिल्यावर गाण्याचे पहिले शब्द एक प्रश्नचिन्ह बनून आपल्यासमोर येतात –
“(क्या) हम होंगे कामयाब, किसी दिन?”