पुणे : पुणे शहरातील ऐतिहासिक आणि वैशिष्ट्यपूर्ण मंदिरांमध्ये गणल्या जाणाऱ्या सोमवार पेठेतील त्रिशुंड गणपती मंदिरात (Temple) गुरुपौर्णिमेनिमित्त एक अनोखी परंपरा आजही जपली जाते. या मंदिराचे तळघर वर्षभर बंद असते आणि ते केवळ गुरुपौर्णिमेच्या दिवशीच भाविकांसाठी दर्शनासाठी खुले केले जाते. त्यामुळे दरवर्षी या दिवशी पुण्यासह राज्यभरातून हजारो भाविक येथे दर्शनासाठी गर्दी करतात.मंदिराच्या गर्भगृहाखाली गोसावी परंपरेतील दलपतगिरी(गणपतगिरी) गोसावी यांची समाधी आहे. या समाधी परिसरात नैसर्गिक जिवंत झरा असल्याने वर्षभर अडीच ते तीन फूट पाणी साचलेले असते. गुरुपौर्णिमेपूर्वी तळघरातील पाणी काढून संपूर्ण स्वच्छता केली जाते आणि केवळ एका दिवसासाठी समाधी दर्शनाची संधी भाविकांना दिली जाते. गुरुंच्या स्मरणाला विशेष महत्त्व असल्याने ही परंपरा अनेक वर्षांपासून अखंडपणे सुरू आहे. (Gurupaurnima)
कोल्हापूर : कोल्हापूरच्या गडहिंग्लज तालुक्यातील भादगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या बैलजोडी सौंदर्य आणि ताकद परीक्षण स्पर्धेत अचानक भीतीदायक ...
सुमारे 270 वर्षांचा इतिहास लाभलेल्या या मंदिराची उभारणी गोसावी समाजातील भीमगिरी गोसावी यांनी केली. 1754 ते 1770 या कालावधीत पूर्णपणे दगडात कोरलेल्या या मंदिराच्या बांधकामात कुठेही लाकडाचा वापर करण्यात आलेला नाही. वेरूळच्या लेण्यांची (Ajintha verul)आठवण करून देणारी कोरीव रचना आणि सूक्ष्म शिल्पकला हे या मंदिराचे मोठे आकर्षण आहे.या मंदिरातील सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तीन सोंडा, सहा हात आणि एकमुख असलेली दुर्मिळ त्रिशुंड गणेशमूर्ती. काळ्या पाषाणात साकारलेली ही मूर्ती मोरावर आरूढ असून गणेशाच्या मांडीवर शक्तीदेवता, बाजूला रिद्धी-सिद्धी आणि मागील बाजूस शेषशायी विष्णूचे शिल्प कोरलेले आहे. त्यामुळे या गणेशाला'मयुरेश्वर त्रिशुंड गणपती' म्हणूनही ओळखले जाते. अशा स्वरूपाची गणेशमूर्ती आशिया खंडात अत्यंत दुर्मिळ मानली जाते. (Gurupaurnima)
मंदिराच्या वास्तूमध्ये राजस्थानी, माळवा आणि दक्षिणात्य शैलीचा सुंदर संगम पाहायला मिळतो. प्रवेशद्वारावर द्वारपाल, दशावतार, लक्ष्मी, भैरव, यक्ष, किन्नर तसेच विविध धार्मिक प्रतीकांची अप्रतिम कोरीव शिल्पे आहेत. विशेष म्हणजे, इंग्रज सैनिक गेंड्याला साखळदंडाने बांधत असल्याचे अनोखे शिल्पही येथे पाहायला मिळते. इतिहास अभ्यासकांच्या मते, प्लासीच्या युद्धानंतरच्या बदलत्या राजकीय परिस्थितीचे ते प्रतीकात्मक चित्रण मानले जाते.प्रदक्षिणा मार्गावर नटराज, काळभैरव, विष्णू तसेच लिंगोद्भव स्वरूपातील शिवप्रतिमा कोरण्यात आल्या आहेत. धार्मिक परंपरा, अद्वितीय शिल्पकला आणि समृद्ध इतिहासाचा संगम असलेले त्रिशुंड गणपती मंदिर हे पुण्याच्या सांस्कृतिक वारशातील एक अमूल्य ठेवा मानले जाते. गुरुपौर्णिमेला वर्षातून एकदाच तळघर खुले होत असल्याने या अनोख्या परंपरेचे साक्षीदार होण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येथे उपस्थित राहतात. (Gurupaurnima)