झाड आणि रस्ता

कथा-रमेश तांबे

रस्त्याच्या कडेला आंब्याचं एक झाड होतं. खूप मोठं डेरेदार. त्याला भरपूर फळं यायची. त्या झाडाच्या थंडगार सावलीत गाई-गुरं बसायची. झाडाखाली भर दुपारी मुलं खेळत. पक्षी आपापसात किलबिलत. वाऱ्याच्या झोतावर झाडाची पाने सळसळत. त्याचा आवाज सगळीकडे पसरे. आंब्याचं झाड म्हणजे ठिकाण होतं आनंदाचं! एकमेकांशी गप्पा मारण्याचं. सारे जमायचे तेव्हा झाडाला खूप आनंद व्हायचा. त्या आनंदात फांदीवरून आंबे गळून पडायचे. पडलेले आंबे मिळून सारे खायचे. सारे कसे छान, गुण्यागोविंदाने सुरू होते.एके दिवशी तिथं काही माणसं आली. काहीतरी मोजमाप करण्यासाठी! ते आपापसात बोलू लागले. मग झाडावरच्या पक्ष्यांची किलबिल थांबली. सावलीत बसलेल्या गाई-गुरांनी आपले रवंथ करणे थांबवले. मुले खेळ सोडून त्या लोकांकडे बघत राहिली. मुलांच्या लगेच लक्षात आले ही तर सरकारची माणसं! त्यांना इथला रस्ता मोठा करायचा. नवा रस्ता बांधायचाय. ते म्हणत होते, “हे झाड रस्त्याच्यामध्ये येत आहे.” मुलं ओरडली काय झाड तोडणार? मुलांचं बोलणं पक्ष्यांनी ऐकलं. पक्षी चिवचिवले, “झाड तोडणार झाड तोडणार.” पक्ष्यांची भाषा गुरांना कळाली. ती मोठ्याने हंबरू लागली, “झाड तोडणार, झाड तोडणार.” शांत वातावरण एकदम बदलून गेलं. पक्ष्यांच्या किलबिलाटांनी, गाई-गुरांच्या हंबरण्याने, मुलांच्या ओरडण्याने वातावरण गंभीर बनलं. त्या सरकारी माणसांना काहीच कळेना हे काय चाललंय.



आंब्याचं झाड मात्र शांत आणि गंभीर बनलं. त्याला कळलं, इथून रस्ता जाणार म्हणजे जाणारच! त्यात माझा बळी जाणार. माझ्या बदल्यात ते अजून शंभर झाडं लावणार. पण त्यातली किती जगली आणि किती सुकून गेली याचा हिशोब कोणीच ठेवणार नाही.मग एके दिवशी चार-पाच ट्रक भरून माणसं आली. कुऱ्हाडी, करवती घेऊन. ट्रकमधून पटापटा खाली उतरली. प्रथम झाडाच्या सावलीत आरामात बसली. त्यांनी भाकर तुकडा खाल्ला, पोटभर पाणी प्यायले, झाडावर चढून दोन-चार आंबे काढले. ते मिटक्यामारीत खाल्ले आणि मग ताज्या दमाने हात झटकून कामाला लागले. झाडाच्या पायावर करवती चालू लागल्या, त्याच्या छाती-पोटात कुऱ्हाडीचे घाव बसू लागले. गाई-गुरं, पक्षी, मुले सुन्न होऊन झाडाचे मरण पाहू लागली. कामगार कपाळाचा घाम पुसत काम करू लागले. चार तासांतच शंभर वर्षे जुने झाड धाराशाही पडले. पाने, फांद्या आणि रसाळ आंब्याच्या दोन गोणी गोळा करून मोठ्या आनंदाने आणि समाधानाने सगळे कामगार निघूनसुद्धा गेले. नंतर एके दिवशी तोडलेल्या झाडापासून दहा मीटर अंतरावर एका मोठ्या नेत्याने एक रोपटे लावले. त्याला पाणी घातले. जमलेल्या लोकांसोबत फोटो काढले. अन् तो निघून गेला. दुसऱ्याच दिवशी वृक्षारोपणाच्या जंगी कार्यक्रमाचे फोटो वृत्तपत्रांतून झळकले. पण... आता मुलं कुठं खेळणार, गाई-गुरं दुपारच्या उन्हात कुठं बसणार आणि पक्षी आपली घरटी कुठं बांधणार याचा विचार कुणीच केला नाही!

Comments
Add Comment

शहराचा विकास, माणसांची कोंडी

- संवाद; निशा वर्तक शहर वाढत आहे. उंच इमारती उभ्या राहत आहेत. रस्ते रुंद होत आहेत. मेट्रो, पूल, मॉल्स आणि आधुनिक

हम होंगे कामयाब...

नॉस्टॅल्जिया; श्रीनिवास बेलसरे कालच देशाचा ८०वा स्वातंत्र्य दिन देशभर आणि जगातील सर्व भारतीय वकिलातीत साजरा

बहीण-भावाचे नाते आयुष्यभर जपले!

- स्मृतीपटल; अनिल रा. तोरणे रक्षाबंधन हा सण काळानुसार बदलला असला, तरी बहीण-भावाच्या प्रेमाचे आणि अतूट नात्याचे

श्रावण मास

-  निमित्त; संध्या काटदरे बालकवींनी श्रावण मासाचे सुंदर वर्णन केले आहे - ‘श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे

आला श्रावण...

-प्रासंगिक; मंजिरी ढेरे श्रावणात प्रत्येकाच्या मनात निळा घन बरसत असतो. परंपरारक्षणाचा संदेश देणारा हा मास

मुलांनो, विचार बदला… भविष्य बदलेल !

- आनंदी पालकत्व; डॉ. स्वाती गानू मुलांनो, आयुष्यात बदल घडवायचा असेल, तर नेहमी परिस्थिती बदलण्यापासून सुरुवात