- नॉस्टॅल्जिया; श्रीनिवास बेलसरे
उर्दूतील शेरोशायरी अनेकदा रोमांसमधील अगदी तरल भावनांच्या सूक्ष्म छटाही सहज कवेत घेणारी असते. त्यात प्रेयसी/प्रियकराचा अनुनय, रुसणे-फुगणे, रुसवा काढणे, विरहातील वेदना, कधी कुणी केलेल्या प्रतारणेचा धिक्कार, नियतीने अपरिहार्य ठरवलेला निरोप, जुदाई, तर कधी आजच्या भाषेत संमतीने केलेला ब्रेकअप, पुनर्भेट अशा सगळ्याच प्रसंगावर हृदयस्पर्शी कविता आढळतात.
मुळात उर्दू कवितेचा पिंड हा शांत, संयमी, प्रत्येक अभिव्यक्ती निगुतीने करणारा आहे. यामुळेच एखादा विषय सविस्तर खुलविणाऱ्या कव्वाल्या प्रामुख्याने उर्दूतच आढळतात. एक मराठी सोडली, तर इतर भाषात गझला, कव्वाल्या अभावानेच आढळतील. उर्दू तशी अवघड भाषा पण संपूर्ण भारतात ती लोकप्रिय आहे ती एका कारणामुळे - प्रेमातील वेगवेगळ्या प्रसंगावरचे चपखल शेर!
ज्यांची उर्दू साहित्याची आवड थोडी स्थिरावते त्यांना पुढे गझला आवडणे अटळ होऊन जाते. काही गझला केवळ दोन दोन ओळीत एक भावना खुलवून पूर्ण करणाऱ्या तर काही अक्षरश: संमोहित करून एकाच मूडमध्ये नेऊन सोडणाऱ्या, मनाला सवयीच्या भावविश्वात रमवणाऱ्या असतात. नुकत्याच प्रेमात पडलेल्या प्रेमिकांना समजायला सोपे असलेले शेर आवडतात, तर प्रेमातल्या किंवा जीवनातल्या विविध प्रसंगातून गेलेल्या संवेदनशील मनांना गझला भावतात. असेच एक प्रसिद्ध पाकिस्तानी गझलकार होते ‘अहमद फराज’. भारत आणि पाकिस्तानात सारखाच मान मिळणाऱ्या ‘फैझ अहमद फैझ’ यांना फराजसाहेब गुरुस्थानी मानत. रेडिओ पाकिस्तानच्या पेशावर केंद्रावर कवितांच्या कार्यक्रमांमुळे प्रसिद्ध झाल्यावर त्यांना कराची केंद्रात ‘निर्माता’ म्हणून संधी मिळाली. त्यानंतर त्यांची ‘पाकिस्तान साहित्य अकादमी’च्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली.
आपल्या सुरेश भटांप्रमाणे अतिशय रोमँटिक गझला लिहिणारा हा कवी तितकाच विद्रोही होता. जशी आपल्या मजरूह सुलतानपुरी साहेबांना नेहरूंबद्दल प्रतिकूल लिहिल्याने १९४९ साली अटक झाली होती तशी लष्करशहा ‘झिया-उल-हक’ सरकारच्या भ्रष्टाचाराबद्दल लिहिल्यामुळे फराजसाहेबांनाही अटक झाली होती. तुरुंगावासानंतर काही वर्षे ते कॅनडा आणि युरोपमध्ये अज्ञातवासात गेले होते. मात्र दोन्ही देशांतील गुणग्राहक साहित्यप्रेमींनी त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविले. पाकिस्तानात त्यांना ‘सितारा-ई-इम्तियाझ’, नंतर मुशर्रफ यांच्या काळात ‘हिलाल-ई-इम्तियाझ’ पुरस्कार देण्यात आला. (मात्र त्यांनी दोनच वर्षांनी तो लष्करी राजवटीतील दडपशाहीच्या निषेधार्थ परत केला.) पाकिस्तान सरकारने त्यांना साहित्यातील अद्वितीय योगदानाबद्दल मरणोत्तर ‘हिलाल-ई-पाकिस्तान’ हा किताब दिला. हरियाणा सरकारने ‘कालिदास सुवर्णपदक’ आणि ई टीव्हीने ‘कमाल-ए-फन’ पुरस्कार दिला. आग्र्याचे ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त उर्दू कवी पद्मभूषण रघुपती सहाय उर्फ ‘फिराक’ यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा ‘फिराक’ आंतरराष्ट्रीय पुरस्कारही फराज यांना देण्यात आला.
भारत, पाकिस्तान, बंगलादेश या तिन्ही देशांत लोकप्रिय असलेल्या त्यांच्या गझला कै. पंकज उधास, कै. जगजीत सिंग, रुना लैला, पै. नूरजहां, पै. मेहंदी हसन, गुलाम अली, अशा दिग्गज गायकांनी गायल्या आहेत. त्यांची त्यांना कायमचे सोडून गेलेल्या प्रियेला उद्देशून लिहिलेली एक अतिशय लाघवी गझल खूप प्रसिद्ध आहे -
“रंजिशही सही, दिलही दुखाने के लिये आ,
आ फिरसे मुझे छोड जाने के लिये आ.”
ही गझल जीवनातून प्रेयसी कायमची गेल्यानंतरची आहे. अशीच एक रोमँटिक गझल त्यांनी ताटातूट होण्याच्या प्रसंगासाठी लिहिली होती. आता पुन्हा आपली भेट शक्य होणार नाही, भेटलो तर फक्त स्वप्नातच भेटू शकू, असे कवी प्रेमिकेला सूचित करतो. तो म्हणतो, जशी कधीतरी पुस्तकात ठेवलेली फुले सुकून जातात तसे आपण परस्परांसाठी एक आठवण बनून जाऊ.
“अबके हम बिछड़े तो शायद कभी ख़्वाबोंमें मिलें, जिस तरह सुखे हुए फूल किताबोंमें मिलें.”
कवी म्हणतो, खरे प्रामाणिक प्रेम करणारे सहसा तेच असतात ज्यांना जगाने खूप छळलेले असते, जे आतून उद्ध्वस्त झालेले असतात. याउलट जे यशस्वी असतात, खुशीत असतात ते एकनिष्ठ असतीलच असे नाही! तुम्हाला जर खरे, प्रामाणिकपणे प्रेम, एकनिष्ठ साथीदार हवा असेल, तर ज्यांना जगाने बरबाद करून टाकले आहे, त्यांच्यात शोधा -
‘ढूँढ उजड़े हुए लोगोंमें वफ़ाके मोती,
ये ख़ज़ाने तुझे मुमकिन है
ख़राबोंमें मिलें’
हा कलंदर कवी मग स्वत:लाच एक अजब सल्ला देतो. तो म्हणतो, ‘जगाने दिलेले दु:ख तू तुझ्या जीवलगाने दिलेल्या दु:खात मिसळून टाक. म्हणजे तुझे दु:ख तुला जास्त नशा देईल. कारण असे म्हणतात की दोन मदिरा एकत्र केल्या तर ते मिश्रण (कॉकटेल) जास्त धुंदी चढवणारे असते.’
‘ग़म-ए-दुनिया भी ग़म-ए-यारमें शामिल कर लो, नशा बढ़ता है शराबें जो शराबोंमें मिलें.’
शेवटी जेव्हा ताटातूट अटळ आहे हे लक्षात येते तेव्हा कवी प्रियेला वास्तवाची प्रखर जाणीव करून देतो. तो म्हणतो, ‘माझे प्रेम कितीही सच्चे असले तरी तू काही ईश्वर नाहीस आणि माझे प्रेम ही देवदूतांसारखी ईशभक्तीही नाही. आपण दोघेही साधी माणसेच आहोत मग आपल्यात असे इतके पडदे कशाला?
‘तू ख़ुदा है न मेरा इश्क़ फ़रिश्तों जैसा,
दोनों इंसाँ हैं तो क्यूँ इतने
हिजाबोंमें मिलें’
जगाचा निष्ठूरपणा आणि सच्च्या प्रेमाच्या अंतिम विजयाबद्दल बोलताना तो म्हणतो, आज आपल्याला कठोरपणे ज्या कारणासाठी वेगळे केले जात आहे तेच प्रेम उद्या कदाचित लैला-मजनूच्या कथेसारखे जगाच्या इतिहासातही लिहिले जाईल.
‘आज हम दारपे खींचे गए जिन बातोंपर, क्या अजब कल वो ज़मानेको निसाबोंमें मिलें.’
शेवटी कवी आपला पराजय स्वीकारतो आणि म्हणतो, ‘आता सर्व संपले आहे. मीही तो पूर्वीचा उरलो नाही आणि तूही पूर्वीची राहिली नाहीस, आपला तो जुना काळही कायमचा सरला आहे. जसे वाळवंटात मृगजळामागे जीवाच्या आकांताने धावणारे तहानले जीव कुठेतरी हरवून जावेत, तसे आपणही प्रेमपूर्तीच्या मृगजळामागे धावताना संपलेलो आहोत हेच खरे!
‘अब न वो मैं, न वो तू है, न वो माज़ी है ‘फ़राज़’ जैसे दो शख़्स तमन्नाके सराबोंमें मिलें.’
जीवनातल्या आनंददायक आणि टोकाच्या वेदनादायी अनुभवांकडे सारख्याच कलंदरवृत्तीने पाहणाऱ्या अशा उन्नत कलाकारांची संगत आपल्यालाही जगण्याचे नवे बळ देत रहाते. म्हणून तर हा ‘नॉस्टॅल्जिया’!