Saturday, July 18, 2026

दृढ करा निश्चय

दृढ करा निश्चय

मनस्विनी-पूर्णिमा शिंदे प्रत्येक माणूस हा जीवनात निश्चय करत असतो. तो निश्चय कोणत्याही गोष्टीचा असू शकतो - ध्येय, कला, पद, नोकरी, पैसा, प्रतिष्ठा, नावलौकिक किंवा एखादी गोष्ट घेण्याचा. असे छोटे-मोठे निश्चय आपण करत असतो. मनाशी गाठ बांधणे म्हणजे निश्चय करणे. सगळ्या बाबतीत आपला निश्चय असतो. आपल्या रोजच्या वागण्यातही, जगण्यातही निश्चय अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो करावाच. निश्चय नसेल तर काम होत नाही. काहीच निश्चय न करणाऱ्या माणसाला कोणीही थांबवायची गरज पडत नाही, कारण तो जागेवरचा हलतच नाही.

प्रण करा. प्रण म्हणजे निश्चय. गरुडासारखी झेप घ्यायची असेल, तर तुम्ही निर्धारपूर्वक राहिले पाहिजे. गरुडाची कौशल्ये आत्मसात करा. कौशल्ये आत्मसात करण्यासाठी सौजन्य, नम्रता, चिकाटी, सहकार्य, वक्तशीरपणा, कष्टाळू वृत्ती, प्रयत्न इत्यादींची तयारी हवी. हा निश्चय ठाम हवा आणि त्यात सातत्य असावे. कारण तुमचा निर्णय पक्का झालेला असेल, तर त्या उद्दिष्टापर्यंतही तुम्हाला पोहोचायचे आहे. अनेक अडचणी येतील. तरीही ध्येयापर्यंत पोहोचण्याचा निर्णय, निश्चय ठाम ठेवा, तोच प्रेरणा देतो. तुम्ही एकदा निश्चय केला, ठाम झालात की मग तुम्हाला कोणी थांबवू शकत नाही. निश्चय करणाऱ्याला कोणी थांबवू शकत नाही. निश्चय करा आणि इतिहास बदला. सर्वात महत्त्वाचे उदाहरण म्हणजे—“निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू ऐसा श्रीमंत योगी” छत्रपतींना पाहिलेच आहे आपण! निश्चय केला, संकल्प केला आणि स्वराज्य उभे केले! सातत्य, कर्तव्यदक्षता, प्रज्ञा, संयम, चिकाटी, जिद्द, सचोटी असेल, तर आपण आपला निश्चय पूर्णत्वास नेऊ शकतो.

पहिल्यांदा चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव नील आर्मस्ट्राँग! हे आपल्याला माहीतच आहे. “प्रयत्नांती परमेश्वर”प्रमाणे परिस्थितीशी संघर्ष करायचा, सामना करायचा. प्रतिकूलतेकडून अनुकूल वातावरण निर्माण कसे करायचे? की शरणागती पत्करायची? परिस्थितीसमोर गुडघे टेकायचे? अपयश स्वीकारून हार मानायची? हे आपले आपण ठरवायचे! त्यातच आपल्या व्यक्तिमत्त्वाची खरी कसोटी असते. प्रयत्नांची चिकाटी कधीही सोडू नये. जिद्दीने माणूस निश्चयापर्यंत नक्की पोहोचतो. पण तो निर्धार महत्त्वाचा आहे.

जगामध्ये सर्वश्रेष्ठ ठरलेले, लोकप्रिय ठरलेले लोकसुद्धा पहिली पायरी अपयशाची चढलेले असतात. लतादीदी असतील, अमिताभ बच्चन असतील किंवा सचिन तेंडुलकर असतील. यश काही आकाशातून आपोआप येत नाही. त्या यशासाठी खूप काही करावे लागते. वाटेत अनेक संकटे येतात. पण आपला निश्चय, इच्छा, प्रार्थना आणि संकटांना धैर्याने सामोरे जाण्याचा निर्धार पक्का असावा. हे सामर्थ्य प्रत्येकामध्ये असले पाहिजे.

जर प्रभावी व्यक्तिमत्त्वाची छाप इतरांवर कोरायची असेल तर नेहमी वेगळ्या वैशिष्ट्याने स्वतःचा वेगळा ठसा उमटवण्यासाठी निश्चय हा करायलाच हवा. तो निश्चय आपल्याला एक दिवस यशापर्यंत पोहोचवतो. प्रत्येक व्यक्तीला आयुष्य असते आणि प्रभावी व्यक्तिमत्त्वामुळे आपण त्या आयुष्याचे उज्ज्वल भविष्य करू शकतो.सकारात्मक दृष्टिकोन, आत्मविश्वास आणि तीव्र इच्छाशक्ती हे आपल्या निश्चयात असले पाहिजे. म्हणून अंधाराकडून प्रकाशाकडे जाता येते. परिस्थितीशी दोन हात करता येतात. आजच निश्चय करा आणि तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचा. जगातील कोणतेही काम कोणीही करू शकत असेल, तर तुम्ही सुद्धा करा. करून दाखवा. प्रभावी व्यक्तिमत्त्वासाठी प्रयत्नपूर्वक कौशल्य प्रस्थापित करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हा निर्धार आणि निश्चय आपल्याला नेहमीच मनापासून बाळगावा लागेल. आपल्या निर्धारापासून, निश्चयापासून कोणी आपल्याला विचलित करणार नाही, इतका तो पक्का असावा. समृद्ध होण्याचा असावा. कोणत्याही कठोर स्पर्धेमध्ये आपण घेतलेला निर्णय, निश्चय हा आपले व्यक्तिमत्त्व संपन्न व जीवन समृद्ध करू शकतो. अशी इतिहासातील अनेक उदाहरणे आपल्याला माहीतच आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा