नक्षत्रांचे देणे-डॉ. विजया वाड
त्या शाळेत प्रवेश मिळावा, म्हणून पाठक खूप धडपडत असत. शिक्षकवर्ग चुनचुनके निवडला जाई. पण हेडसरांच्या मर्जीत राहिला तरच तो टिके. आशू त्या शाळेत शिक्षिका म्हणून लागली, पण ती हेडसरांच्या मर्जीतली शिक्षिका नव्हती. आसावरी बीएड्ला पहिल्या वर्गात पहिली आली असल्याने तिला नाकारणे हेडसरांना शक्यच नव्हते. शिवाय तिचा पाठ, जो तिने शाळेत येण्यापूर्वी घेतला, तो इतका उत्कृष्ट झाला की शालाधिकारी जामेजाम खूश झाले. हेडसरांचा मग हेका टिकला नाही.
“ती फार कडक आहे” त्यांनी
म्हणून पाहिले.
“अहो क्लास कंट्रोल चांगला राहील” निरीक्षकांनी म्हटले.
“मुले फारशी खूश नाहीत.”
“अधिकार गाजवणे या पिढीला आवडत नाही.”
“बघा बुवा!” हेडसरांचा नाईलाज झाला. मोठ्या मुष्किलीने
आसावरीला शिक्षिका म्हणून त्या शाळेत प्रवेश मिळाला.
“आशू... “ शिक्षक हाकारीत.
“माझे नाव आसावरी बाळकृष्ण गोखले असे आहे. पण शाळेत मला आसावरीबाई असेच हाकारा.”
ती सरळ सांगे.
कोणाला खांद्यावर हात ठेवू देत नसे.
“हात खाली” अशी आज्ञा कडक शब्दात ती सोडी.
ही तर हेडसरांच्या भाषेत आज्ञामोडी होती. शिक्षक हेडसरांच्या आज्ञेत असत.
“पपाज पॅट” म्हणून त्याची प्रसिद्धी होती.
“शिक्षकाच्या खांद्यावर थोपटणे यात गैर ते काय? तो विचारी.
“मी शुद्ध हेतूने शाबासकी देतो.” ते उत्तर देत. “पण माझा खांदा त्यासाठी नाही. ती कडक विरोध करी.
हेडसर आपला हेका सोडीत नसत. एकदा ती सरळ हेडसरांच्या ऑफिसात गेली. “मला थोडे बोलायचे
आहे सर.”
“बोल, बोल ना आसावरी.”
“ते तुम्हांला सुखावणारे नाहीये फारसे.”
“बोल”
“तुम्ही येता जाता खांद्यावर हात ठेवता सर.”
“बरं! मग ?”
“मला ते आवडत नाही.”
“माझ्या मनात कुठले पाप नाही गं आसावरी.”
“ती सवय मोडा सर.”
“अगं तू तर माझ्या मुलीसारखी आहेस.”
“पण सर, वयात आलेल्या मुलीस स्पर्श करताना, पिता सुद्धा दहा वेळा विचार करतो.”
“मी सांगितले ना आशू!”
“बाकी कोणी बोलत नाही... पण एक सांगू का?”
“बोल. मोकळेपणी सांग.”
“सारे शिक्षक तुमच्या या अशोभनीय कृतीला ‘पपाज पॅट’ असे नावाजतात. हे कृत्य त्यांना सहन होत नाही; पण नोकरी जाईल या भीतीने ते ‘पपाज पॅट” सहन करतात.”
“अरे बापरे!”
“घाबरलात ना सर?”
“तुला?”
“हो मलाच. मी मॅनेजमेंटकडे जाईन.”
“खरंच”
“मी खोटं बोलत नाही.”
“मग ? मॅनेजमेंट मला काढून टाकेल?”
“मला परिणाम ठाऊक नाहीत.”
“वेडे पोरी! पपाज पॅट ही कौतुकाची थाप आहे.”
माझे नाव आसावरी बाळकृष्ण गोखले आहे सर.”
“मला ते चांगले ठाऊक आहे.”
“मी सर्व शिक्षकांची एक विरुद्ध भिंत तयार करीन.”
“तुला असं वाटतं का की शिक्षक तुला
साथ देतील?”
“एकीचे बळ आजमावून बघायचे आहे का सर?”
“प्रयोग करून बघ. आपली शाळा खासगी आहे.”
“तुम्ही मला दम देताय?”
“तुला जे समजायचं ते समज गं बाई.”