बैलाविना शेतीला मजा नाही!

रासायनिक खतांने पर्यावरणाचे जे नुकसान होत आहे, ते पाहता पुन्हा एकदा बैलांच्या शेतीकडे वळण्याची गरज अधोरेखित होत आहे. सेंद्रिय शेतीचा पाया बैलांच्या सान्निध्यात टिकून राहणाऱ्या नैसर्गिक चक्रावर अवलंबून आहे.


कष्टाशिवाय मातीला आणि बैलाशिवाय शेतीला पर्याय नाही या लोकप्रिय सुवचनेप्रमाणे मातीशी जोडलेला आणि बैलाच्या कष्टावर आधारित असलेला शेतीचा पाया कधीही बदलू शकत नाही. त्यामुळे बैलाविना शेतीला मजा नाही हे अगदी खरे आहे. शेती आणि बैल यांचे नाते अतूट आहे. सध्या सर्रास ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेती केली जात आहे; परंतु बैलांच्या सहाय्याने शेती केली जात होती त्यामध्ये खरी मजा असायची. शेतात मशागत करून चालणार नाही तर प्रत्यक्षात शेतात घाम गाळावा लागतो. शेतातील मातीशी एकरूप व्हायचे असेल तर बैलांच्या सहाय्याने नांगरणी केल्याने खऱ्या अर्थाने मातीशी एकरूप होता येते. यातूनच कष्टाचे महत्त्व समजते. त्यामुळे ट्रॅक्टरने शेती जरी केली तरी आजही आणि उद्या शेतीशी बैलांचे योगदान अबाधित राहणार आहे. हीच खरी आपल्या शेतीप्रधान देशातील शेतीची संस्कृती आहे. थंडी, ऊन आणि पाऊस यांची पर्वा न करता शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून कष्टाची कामे करीत असतात. त्यामुळे बैल हा शेतकऱ्यांचा कष्टाचा साथीदार झाला आहे. आतापर्यंत बैलांच्या सहाय्याने शेतातील नांगरणी, कोळपणी, गुटा, मळणी आणि बैलगाडीने सामानाची वाहतूक करणे अशी विविध अवघड कष्टाची कामे केली जात होती. काही ठिकाणी अजूनही केली जातात. मात्र त्याचे प्रमाण कमी होत आहे. म्हणजे त्यावेळी शेतकऱ्यांचा खरा आधार बैल होता.



शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानामुळे बैलांची जागा ट्रॅक्टरने घेतली तरी बैलांची जागा कोणीही घेऊ शकत नाही. शेवटी बैल हे बैल असतात. शेतीचा विचार करता शेताच्या मातीशी जुळलेली त्यांची नाळ आणि शेतकरी राजाचे भावनिक नाते कमी झालेले नाही. शेतकऱ्यांच्या कुटुंबातील एक प्रमुख घटक असतो. बैल हे शेतीपुरते मर्यादित नसून बैलांमुळे ग्रामीण भागातील जीवनमान उंचावण्यास मदत झालेली आहे. त्यामुळे शेताच्या बांधावर गेल्यावर बैलांची आठवण येते.
आपल्या राज्यात शेती क्षेत्रात बैलांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे, उद्याही असणार आहे. शेतकरी बैलांच्या मदतीने शेतात काम करीत असताना माती आणि निसर्गाशी जिव्हाळा लागलेला आहे. नैसर्गिक संकटे आली तरी त्यांच्यामध्ये तडा गेलेला नाही किंवा जाणारही नाही. हा निसर्गाचा नियम आहे. शेतीची कामे झाल्यावर कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकरी बैलांचे पूजन करतात. तसे दरवर्षी बैलपोळा सण शेतकऱ्यांच्या वतीने उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी बैलांना पाण्याने धुतले जाते. त्यानंतर त्यांचे अंग टॉवेलने पुसले जाते. त्यांच्या शिंगांना शेतकरी आपल्या आवडीप्रमाणे रंग लावतात. गळ्यात रंगीबेरंगी फुलांची माळ घालण्यात येते. घरात गोडधोड जेवण केले जाते. गोठ्यात जाऊन त्यांच्या डोक्याला टिळा लावून त्यानंतर आरती ओवाळून त्यांचे पूजन केले जाते. पूजन झाल्यावर केळीच्या पानातून त्यांना सुद्धा जेवण दिले जाते. त्या दिवशी त्यांना गोठ्यातच आराम करण्यासाठी दाव्याने बांधून ठेवतात. वेळच्या वेळी चारा आणि पाणी दिले जाते. म्हणजे याचा अर्थ असा होतो की, आपल्यापेक्षा मुक्या प्राण्यांना अधिक समजते. शेवटी काय मौनाची भाषा मौनालाच समजते.




शेतीच्या कामासाठी बैलांचा वापर केला गेल्याने जमिनीची नांगरणी करीत असताना जमिनीची धूप कमी होते. त्यांच्या पायांनी माती बारीक होते. चिखलही शेतीलायक होतो. शेणाचा उपयोगही सेंद्रिय खत म्हणून वापर केला जातो. यामुळे जमिनीची सुपीकता दीर्घकाळ टिकून राहते तसेच प्रदूषण कमी होण्याला मदत होते. शेती उत्पादनाचा विचार करता पारंपरिक पद्धतीने शेती करत असल्याने आधुनिक पद्धतीपेक्षा कमी उत्पादन होऊ शकते. मात्र शेतीचा कस टिकून राहतो. जरी शेती उत्पादन कमी झाले तरी बैलांमुळे आपण पर्यावरणपूरक शेती करू शकतो. यात मानवी श्रमाचा वापर केला जात असून नैसर्गिक बी-बियाण्यांचा अर्थात स्थानिक बियाण्यांचा व शेण खताचा वापर केला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांचे हात-पाय सुद्धा सुरक्षित राहतात.




आता शेतीची कामे सुरू झालेली आहेत. शेतकरी जमिनीची नांगरणी ट्रॅक्टरने करू लागले आहेत. त्यामुळे शेतात शेतकऱ्यांचा आवाज एकदम बंद असल्याचा दिसतो. जेव्हा बैलांच्या सहाय्याने नांगरणी करीत होते तेव्हा जमीन नांगरताना शेतकरी ईरीरी..., पापारी... म्हणत असत. शेतकऱ्याच्या एका हातात रुमनी आणि एका हातात लिंगडीची काटी असायची. बैलांची नावे पण आकर्षक ठेवायची पाखऱ्या, पांढऱ्या, हौश्या, हरण्या, सोन्या, लाल्या अशी असायची. शेतकरी बैलाचे नाव घेऊन म्यार धर म्हटले की, तो आपोआप मेरे जवळ जायचा. त्यामुळे नांगरणी सुद्धा शेतीलायक व्हायची. कोपऱ्यात बैल उभे असले काय कोपरे फुलून दिसायचे. हीच खरी शेतकऱ्यांची शान आहे.
आता जरी ट्रॅक्टरने शेती केली तरी बैलांशिवाय शेतीची कामे केली अशी वाटत नाहीत. तसेच बैलांच्या सहाय्याने नांगरणी केली जात होती त्यावेळी शेतकरी राजाला त्यात खरा आनंद मिळत होता. त्यामुळे बैलाविना शेतीला मजा नाही हे मात्र खरे आहे. आजचे कृषी जग हे यांत्रिकीकरणाच्या प्रभावाखाली असले तरी, बैलांच्या परंपरेत जपलेले ते सौंदर्य आणि तो जिव्हाळा यांत्रिक ट्रॅक्टरमध्ये कधीही सापडणार नाही. आधुनिकतेच्या रेट्यात आपण कदाचित वेगवान शेती करत असू, परंतु त्या वेगाच्या नादात आपण मातीचा पोत आणि बैलांशी असलेला भावनिक संवाद हरवून बसलो आहोत का, असा प्रश्न पडतो.

Comments
Add Comment

नागपूर जागतिक सहकार्याचे केंद्र

जागतिक अर्थव्यवस्थेचा कणा मानल्या जाणाऱ्या ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांची तिसरी परिषद नुकतीच नागपुरात

इस्रोचा तोटा, स्टार्टअप्सचा फायदा

राजीनामे फेटाळून शास्त्रज्ञांना बांधून ठेवण्यापेक्षा, त्यांना संस्थेचा अभिमान वाटेल आणि भविष्यातील सर्व संधी

China Taiwan : तैवानची कोंडी

चीनच्या सततच्या गस्तीमुळे तैवानच्या लष्कराला २४ तास हाय-अलर्टवर राहावे लागते. परिणामी त्यांच्या सैनिकांमध्ये

मोशी : निष्काळजीपणाचे बळी

मोशी कचरा डेपोत घडलेली प्रशासकीय हलगर्जी आणि भ्रष्टाचाराची भीषण परिणती आठ निष्पाप कामगारांच्या मृत्यूच्या

Cricket Update : निराशाजनक पर्व

कर्णधार श्रेयस अय्यरसाठी हे अपयश एका अग्निपरीक्षेसारखे आहे. आगामी झिम्बाब्वे मालिकेपूर्वी भारतीय संघाला केवळ

Development vs Environment : विकास, की विकासाचा ऱ्हास?

‘प्रजा’ संस्थेच्या २०२६ च्या अहवालातून मुंबईतील कचरा, प्रदूषण, वाहतूक आणि इतर नागरी समस्यांचे गंभीर चित्र समोर