युद्धामुळे अरबी तेलसंपन्न राष्ट्रांचे भवितव्य धोक्यात आले आहे आणि जे बिझिनेस मॉडेल वर्षानुवर्षे स्थैर्याचे उदाहरण होते ते आता संपूर्ण विस्कळीत झाले आहे. ते पुन्हा रुळांवर येण्यास वर्षे लागतील. आधीच या युद्धामुळे पश्चिम आशियाचे प्रचंड नुकसान झाले आहे आणि हजारो लोक ठार, तर व्यवसाय उद्ध्वस्त झाले आहेत.
पश्चिम आशिया पुन्हा युद्धाच्या आगीत होरपळत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या शस्त्रसंधीचा कालावधी जसा संपला तसे लगेच हे क्षेत्र पुन्हा युद्धाच्या आगीत होरपळत आहे. इराणने होर्मुझचा खाडी मार्ग बंद केला आणि जगाला पुन्हा तेलाच्या आणि नैसर्गिक वायूच्या संकटात ढकलले. तीन जहाजांवर इराणने हल्ले केले आणि त्यात एका खलाशाचा मृत्यू झाला. तीन तेलवाहू जहाजांवर हल्ले करण्यात आले. पण यात एकटा इराण दोषी नाही. कारण अमेरिकेनेही तेलवाहू जहाजांवर हल्ले केले आहेत आणि होर्मुझची सामुद्रधुनी आता युद्धबिंदू ठरली आहे. गेली अनेक दशके होर्मुझची खाडी ही चिंचोळा मार्ग असून भू-राजकीय महत्त्वाची आहे. पण अलीकडच्या प्रादेशिक शॉक्सने तिला एक वेगळेच स्वरूप प्राप्त झाले आहे. गेली अनेक दशके होर्मुझची खाडी ही चिंचोळी पाण्याचा मार्ग होती आणि तिला भू-राजकीय अहत्व अपरंपार होते. ती नुसता तेलाचा चेकपॉइंट नाही तर त्यावर एक पाया आहे ज्यावर अर्थकारण अवलंबून आहे. आखाती नेत्यांना माहीत आहे की त्यांची भरभराट याच खाडीमार्गावर अवलंबून आहे. कोणाचीही महासत्ता डावपेचात्मक चेक पॉइंट्सवरील अवलंबित्व कमी करू पहाते. ब्रिटनने सुवेझ कालव्यावरील आपले अवलंबित्व कमी करू पाहिले. अमेरिकेनेही पनामा कालव्यातील आपली गुंतवणूक कमी करू पाहिली. पण होर्मुझचा अपवाद आहे. लष्करी हल्ले करण्यात आल्यावर मात्र जागतिक सप्लाय साखळ्यांवर त्यांचा व्यापक परिणाम झाला आहे. भारतीय जहाजाच्या वाहतुकीवर विपरित परिणाम झाला आहे. आता हे युद्ध पुन्हा भडकल्याने तेल आणि इंधनाची टंचाई, खतांच्या आयातीवर संकट आणि परिणामी भारताच्या शेती क्षेत्रावरील संकट हे धोके पुन्हा आ वासून समोर उभे राहिले आहेत. इराणी सैन्याने सायप्रसचा ध्वज असलेल्या जीएफएस गॅलक्सी या जहाजावर हल्ला केला आणि त्यात ११ भारतीय खलाशी होते. या जहाजाने लगेच पेट घेतला. मात्र हा हल्ला अमेरिका-इराण संघर्षाचा परिपाक होता. अमेरिकेच्या मध्यवर्ती कमांडने अनेक हल्ले लागोपाठ केले आणि ड्रोनचा वापर केला. याचा अर्थ अमेरिका आणि इराण हे दोघेही सारखेच गुन्हेगार आहेत आणि युद्ध गुन्ह्यांसाठी दोघांनाही सारखेच जबाबदार धरले पाहिजे.
होर्मुझची खाडी हा महत्त्वपूर्ण ऊर्जेचा महामार्ग आहे आणि तोच बंद झाल्याने सर्वात जास्त फटका भारताला बसला आहे. आता पुन्हा एकदा तो बंद झाल्याने भारतासमोर नव्याने तेल आणि खतांच्या पुरवठ्याविषयक संकटाला सामोरे जावे लागणार आहे. दुसरा एक मोठा धोका आहे तो म्हणजे सध्या आखातात जे भारतीय खलाशी आहेत त्यांचे प्राण संकटात आहेत. भारताने अमेरिकन हल्ल्यात तीन भारतीय खलाशी ठार झाल्याप्रकरणी अमेरिकेकडे तीव्र निषेध व्यक्त केला आहे. या घटनेनंतर अमेरिकेने आरोप केला, की अमेरिकेने इराणच्या जहाजांसाठी ब्लॉकेड केला होता त्याचा भंग करून हे जहाज तेथून जात होते. हे युद्ध सुरू झाल्यापासून ३० भारताकडे जाणारी जहाजे होर्मुझच्या खाडीच अडकली आहेत. होर्मुझचा मार्ग २८ फेब्रुवारी २०२६ पासूनच संकटात आहे आणि तेलाच्या आयातीचा हाच मार्ग असल्याने भारतावर त्याचा परिणाम होत आहे. होर्मुझच्या खाडीतून २० दशलक्ष तेल आयात केले जाते आणि त्यापैकी भारतात ७० टक्के तेल आयात होते. म्हणजे उर्वरित जगासाठी तर आहेच आहे पण भारतासाठी हा मार्ग किती महत्त्वाचा आहे हे लक्षात येईल. अमेरिकेने जाहीर केलेली युद्धबंदी ही नाजूक अवस्थेत होती आणि ती आता मोडीत निघाल्यामुळे अर्थातच ब्रेंट क्रूड तेलाचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे भारताला त्याचा विशेषत्वाने फटका बसला आहे. भारतासारख्या प्रमुख तेल आयातदार देशासाठी या उठावाने देशांतर्गत कृषी क्षेत्राला जोरदार फटका बसला आहे. कारण तेलासोबत खताची आयातही होर्मुझच्या मार्गाने होत असते आणि युद्धाचा एक परिणाम असाही आहे की शेतमालाच्या किमती तर वाढतातच; परंतु विमानांना लागणारे इंधन महाग होऊन त्याचाही फटका देशाला बसतो. भारतीयांच्या युद्ध आता आवाक्याबाहेर गेले आहे हे निश्चित.
युद्ध पुन्हा का भडकले याची कारणे सोपी आहेत. अमेरिका आणि इराण यांच्यातील वाद सोडवलाच गेला नाही आणि इराणचे होर्मुझच्या खाडीवर असलेले नियंत्रण यामुळे युद्ध आणखी कितीही काळ चालू राहील. अचानक पुन्हा अमेरिका आणि इराण यांच्यात वैर भावनेमुळे जागतिक आर्थिक चिंता उत्पन्न झाल्या आहेत. शस्त्रसंधी समाप्त झाल्यानंतर आता अमेरिका आणि इराणसाठी आणि साऱ्या जगासाठीही सत्त्व परीक्षेचा काळ सुरू झाला आहे. अमेरिकेने पुन्हा इराणी लक्ष्यावर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे आणि होर्मुझचा मार्ग पुन्हा बंद करण्यात आला आहे. चीनने स्वाक्षांकित केलेल्या सामंजस्य करार अमलात आणला आणि त्यावर दोन्ही बाजू शहाणपणाने वागल्या तर युद्ध थांबू शकते. कारण युद्ध आजच्या काळात कुणालाच परवडणार नाही आणि दुसरा परिणामकारक उपाय म्हणजे अमेरिकेने आणि इस्रायलने सुरू केलेले हल्ले आणि वैरभाव कायमचा थांबवला तर युद्ध थांबू शकते. एक मान्य करायला हवे की अमेरिकेच्या युद्ध चालू ठेवण्याच्या मर्यादा सीमित आहेत. हे युद्ध म्हणजे एका माणसाच्या लहरी वागण्याच्या आणि इराणला धडा शिकवण्याच्या इर्ष्येने पछाडलेल्या वृत्तीचा परिणाम आहे. त्यामुळे साऱ्या जगाला फटका बसला आहे आणि सारे जग त्या आगीत होरपळत आहे.