Monday, July 13, 2026

Airoli Murder Mystery : ११ महिने पचवला मर्डर, पण 'त्या' एका चुकीने खेळ खल्लास! ऐरोलीतील थरारक हत्याकांडाचा पर्दाफाश

Airoli Murder Mystery : ११ महिने पचवला मर्डर, पण 'त्या' एका चुकीने खेळ खल्लास! ऐरोलीतील थरारक हत्याकांडाचा पर्दाफाश

नवी मुंबई : सिया आणि केतन या बहुचर्चित हत्याकांडाची चर्चा अद्याप ताजी असतानाच, नवी मुंबईतील ऐरोली (Navi Mumbai) परिसरातून एक अंगावर काटा आणणारी घटना उघडकीस आली आहे. एका विवाहित महिलेने आपल्या रिक्षाचालक प्रियकरासोबत मिळून जन्मोजन्मीची साथ देणाऱ्या पतीचा अत्यंत निर्घृणपणे काटा काढला. केवळ हत्याच नाही, तर मृतदेहाचे तीन तुकडे करून त्यांनी तब्बल ११ महिने पोलिसांच्या डोळ्यात धूळफेक केली. अखेर या भयानक मर्डर मिस्ट्रीचा उलगडा झाला असून पोलिसांनी आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकराला गजाआड केले आहे.

असा रचला हत्येचा कट

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, बलीराम सूर्यनाथ कुशवाह (वय ५०) हे ऐरोलीच्या यादव नगरमध्ये आपली पत्नी आणि दोन मुलांसह राहत होते. दरम्यान, त्यांची पत्नी सुनिता कुशवाह (४०) हिचे घणसोली येथील राहुल दशरथ प्रजापती (३०) या रिक्षाचालकासोबत अनैतिक संबंध निर्माण झाले. या गुप्त प्रेमप्रकरणाची कुणकुण बलीराम यांना लागली होती. त्यांनी या प्रकाराला तीव्र विरोध दर्शवल्याने घरात वारंवार खटके उडत होते. पतीचा हा विरोध कायमचा मोडून काढण्यासाठी आणि आपल्या मार्गातील काटा दूर करण्यासाठी सुनिताने राहुलच्या साथीने बलीराम यांच्या हत्येचा भयंकर कट रचला.

झोपेतच संपवले आणि मृतदेहाचे केले तीन तुकडे

ठरलेल्या प्लॅननुसार, सुनिताने आधी आपल्या दोन्ही मुलांना दोन दिवसांसाठी मावशीच्या घरी पाठवून दिले. त्यानंतर ९ ऑगस्ट २०२५ रोजी मध्यरात्री बलीराम गाढ झोपेत असताना सुनिता आणि राहुलने प्रथम त्यांचा गळा आवळला आणि त्यानंतर धारदार चाकूने गळ्यावर सपासप वार करून त्यांची निर्घृण हत्या केली. पुरावे नष्ट करण्यासाठी या क्रूरकर्मांनी घरातच बलीराम यांच्या मृतदेहाचे मुंडके, धड आणि पाय असे तीन तुकडे केले. हे तुकडे वेगवेगळ्या गोण्या आणि चादरीत गुंडाळून, राहुलच्या रिक्षातून नेऊन रात्रीच्या अंधारात गवळी देव परिसरातील घनदाट जंगलात वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले.

भावाच्या एका तक्रारीने फुटले बिंग

कोणताही पुरावा मागे न ठेवता हत्या पचवल्यानंतर, सुनिताने अतिशय शिताफीने यादव नगरमधील आपले घर भाड्याने दिले आणि ती दोन्ही मुलांसह थेट राहुलसोबत घणसोलीत वास्तव्याला गेली. तब्बल आठ महिने हा प्रकार कोणाच्याच लक्षात आला नाही. मात्र, बलीराम यांचा भाऊ गावाहून आल्यावर त्याने भावाची चौकशी केली. तेव्हा 'ते भांडण करून घर सोडून निघून गेलेत' अशी खोटी कहाणी सुनिताने रचली. भावाचा संशय बळावल्याने त्याने अखेर एप्रिल २०२६ मध्ये रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेत बलीराम बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली.

मोबाईलची चालाखी आणि पोलिसांचा तपास

बेपत्ता असल्याची तक्रार दाखल होताच पोलिसांचा तपास सुरू झाला. पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी सुनिता आणि राहुलने आपले जुने मोबाईल आणि सिमकार्ड नष्ट करून नवीन नंबर वापरण्यास सुरुवात केली. परंतु, पोलिसांच्या तांत्रिक तपासात (Call Detail Record - CDR) राहुलचे वेगवेगळ्या नंबरवरून फक्त सुनितासोबतच सातत्याने बोलणे होत असल्याचे निष्पन्न झाले. चौकशीदरम्यान सुनिताने पतीबाबत पोलिसांना दिलेली उडवाउडवीची आणि विसंगत उत्तरे तिच्याच अंगलट आली. अखेर पोलिसांनी दोघांना गुप्तपणे ताब्यात घेतले. पोलिसांनी खाक्या दाखवताच आणि दोघांचीही वेगवेगळी कसून चौकशी करताच त्यांनी आपला गुन्हा कबूल केला.

११ महिन्यांनंतर अवशेषांचा शोध सुरू

आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी आता गवळी देव डोंगर परिसरात बलीराम यांच्या मृतदेहाचे अवशेष शोधण्यासाठी मोठी मोहीम हाती घेतली आहे. मात्र, हत्येला जवळपास ११ महिने उलटून गेल्यामुळे हे अवशेष शोधण्याचे मोठे आणि कठीण आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास रबाळे एमआयडीसी पोलीस करत आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >