Thursday, July 9, 2026

POK : पीओकेमध्ये आंदोलन चिघळले! मृत आंदोलनकर्त्यांनाही 'दहशतवादी' ठरवण्याचा पाकिस्तानवर आरोप

POK : पीओकेमध्ये आंदोलन चिघळले! मृत आंदोलनकर्त्यांनाही 'दहशतवादी' ठरवण्याचा पाकिस्तानवर आरोप

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीर (पीओके)मध्ये राजकीय प्रतिनिधित्व आणि घटनात्मक अधिकारांच्या मागणीसाठी सुरू असलेले आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत आहे. या आंदोलनादरम्यान मृत्यूमुखी पडलेल्या आंदोलनकर्त्यांना पाकिस्तान सरकारने 'दहशतवादी' घोषित करण्यास सुरुवात केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे पीओकेतील परिस्थिती अधिकच तणावपूर्ण बनली आहे. (POK)

आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, रावळकोट, मुजफ्फराबाद, मीरपूर, कोटली, बाग, हट्टियान बाला, सुधनोती, ढेरकोट आणि डड्याल या भागांत आंदोलन दडपण्यासाठी सुरक्षा दलांकडून कठोर कारवाई केली जात आहे. तसेच महिलांवरील अत्याचार आणि अनेक तरुणी बेपत्ता असल्याचेही आरोप करण्यात आले आहेत. या दाव्यांची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही. (POK)

आंदोलनाचे नेतृत्व करणारे शौकत नवाज मीर, मेहरान अरशद ख्वाजा, अमन खान आणि अमजद अली यांना पाकिस्तानने दहशतवादी घोषित केल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. रावळकोट हे आंदोलनाचे प्रमुख केंद्र बनले असून, गेल्या महिनाभरात आंदोलनकर्ते आणि पोलिस यांच्यात झालेल्या संघर्षात २५ युवकांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे. संयुक्त अवामी ॲक्शन कमिटी (JAAC)च्या म्हणण्यानुसार, इस्लामाबाद सरकार पीओकेतील जनतेच्या मतांना आणि हितांना डावलणारे निर्णय घेत आहे. (POK)

समितीने आरोप केला की, "आम्ही शांततेच्या मार्गाने आमच्या हक्कांसाठी लढत आहोत, मात्र त्याला गोळीबाराने उत्तर दिले जात आहे."

आंदोलन दडपण्यासाठी पाकिस्तान सरकारने प्रथम संयुक्त अवामी ॲक्शन कमिटीवर बंदी घातली, अनेक वरिष्ठ नेत्यांना अटक केली आणि अतिरिक्त सुरक्षा दलांची तैनाती केली. त्यानंतर आता मृत आंदोलनकर्त्यांनाही दहशतवादी ठरवले जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. दुसरीकडे, पाकिस्तान सरकारचा दावा आहे की संयुक्त अवामी ॲक्शन कमिटीचा संबंध तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) आणि बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (BLA)सारख्या संघटनांशी असून, या संघटना देशात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. (POK)

मात्र आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे की, त्यांचा संघर्ष हा केवळ राजकीय अधिकार, स्थानिक ओळख आणि लोकशाही प्रक्रियेत समान सहभाग मिळवण्यासाठी असून, त्यांनी या प्रश्नावर भारत सरकारने लक्ष द्यावे, अशीही मागणी केली आहे. सध्या रावळकोट, मुजफ्फराबाद, मीरपूर, कोटली, बाग, हट्टियान बाला, सुधनोती, ढेरकोट आणि डड्याल या भागांत मोर्चे, धरणे, रस्ता रोको आणि निदर्शने सुरू असून, पीओकेतील परिस्थिती तणावपूर्ण असल्याचे वृत्त आहे. (POK)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >