Nashik : ढगफुटीचा धोका टळला, पाऊस मात्र कायम; गोदावरीच्या पाणी पातळीतही वाढ

Nashik : नाशिक जिल्ह्यावर घोंघावणारा ढगफुटीसदृश पावसाचा धोका अखेर टळला आहे. मात्र मुसळधार पावसाची संततधार कायम असून जिल्ह्यातील नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. प्रशासनाच्या सतर्कतेमुळे कोणतीही मोठी दुर्घटना घडलेली नसली तरी घाटमाथ्यावर अजूनही अतिवृष्टी सुरू आहे. गोदावरी नदीच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली असून अनेक ठिकाणी प्रशासनाने सतर्कतेचा इशारा कायम ठेवला आहे.


नाशिक जिल्ह्यावर निर्माण झालेला ढगफुटीसदृश पावसाचा धोका अखेर टळला आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानंतर प्रशासनाने युद्धपातळीवर तयारी केली होती. मात्र जिल्ह्यावर जमा झालेले ढग दोन भागांमध्ये विखुरल्याने संभाव्य मोठे संकट टळल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.



जिल्ह्यात मुसळधार पाऊस कायम


हवामान विभागाच्या माहितीनुसार, जिल्ह्यावर निर्माण झालेले ढगांचे एक समूह अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले परिसराकडे तर दुसरा समूह गुजरातमधील सुरतच्या दिशेने सरकला. त्यामुळे नाशिक शहर आणि त्र्यंबकेश्वर परिसराला अपेक्षित असलेली ढगफुटीसदृश परिस्थिती निर्माण झाली नाही. मात्र याचा अर्थ धोका पूर्णपणे संपला आहे, असे नसून जिल्ह्यात मुसळधार पाऊस कायम असल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.


हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर जिल्हा प्रशासन, महापालिका, पोलीस प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा पूर्ण क्षमतेने सज्ज झाली होती. आपत्ती व्यवस्थापन मंत्री आणि कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी स्वतः नाशिकमध्ये तळ ठोकून मध्यरात्री वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत परिस्थितीचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने तसेच विविध विभागांचे अधिकारी जिल्ह्यातील संवेदनशील भागांमध्ये तैनात होते. संभाव्य आपत्ती लक्षात घेऊन बचाव पथकेही सज्ज ठेवण्यात आली होती.



नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन


प्रशासनाने नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आणि पर्यटनस्थळांपासून दूर राहण्याचे आवाहन केले होते. त्याला नाशिककरांनी मोठा प्रतिसाद दिला. त्यामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवर सकाळपासूनच शुकशुकाट पाहायला मिळाला. वाहतुकीची वर्दळ अत्यंत कमी होती, अनेक बाजारपेठा बंद किंवा अंशतः सुरू होत्या. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन केल्यामुळे आपत्कालीन परिस्थिती हाताळणे अधिक सोपे झाल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.


दरम्यान, जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. मागील चोवीस तासांत जिल्ह्यात सुमारे ८३.६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर एक जुलै ते सात जुलै या कालावधीत जिल्ह्यात एकूण २१४ मिलीमीटर पाऊस झाला आहे. सर्वाधिक पाऊस इगतपुरी तालुक्यात २०० मिलीमीटर नोंदविण्यात आला आहे. त्यापाठोपाठ सुरगाणा येथे १४९, त्र्यंबकेश्वर येथे १२५, पेठ येथे ६१, दिंडोरी येथे ५८, पिंपळगाव बसवंत येथे ५१.५, सटाणा येथे ४७, निफाड येथे ४५.२, देवळा येथे ४०, कळवण येथे ४०, येवला येथे १५ आणि नांदगाव येथे केवळ १ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.



नद्यांमधील पाणीपातळीत झपाट्याने वाढत


सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणे आणि नद्यांमधील पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे. नांदूर मधमेश्वर धरणातून सुमारे १,२८६ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नाशिक शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या पाणीपातळीतही मोठी वाढ झाली आहे. रामकुंड परिसरातील दुतोंड्या मारुतीच्या पायाला पाणी लागले असून नदी दुथडी भरून वाहत आहे. शहरातील वाघाडीसह इतर नद्यांमध्येही पाण्याचा प्रवाह वाढला आहे. त्यामुळे नदीपात्रात उतरणे किंवा सेल्फी काढण्यासाठी गर्दी करणे टाळावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.



भाबडबरी घाट वाहतुकीसाठी बंद


जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील भाबडबरी घाटात दरड कोसळल्याने हा घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तर संभाव्य आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन इगतपुरी येथे एनडीआरएफचे पथक तैनात करण्यात आले आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर तसेच नांदुरी येथील सप्तशृंगी देवी मंदिर परिसरातही प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. भाविक आणि पर्यटकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, धबधबे, नदीकाठ आणि घाट परिसरात जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


जिल्हा प्रशासनाच्या मते, सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी पुढील काही तास अतिशय महत्त्वाचे आहेत. त्यामुळे सर्व यंत्रणा सतर्क असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीकडेच लक्ष द्यावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन पुन्हा एकदा करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Amit Shah : ' तुमचे हे पाप देशातील जनता कधीच माफ करणार नाही'

नवी दिल्ली : नवी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात (इंदिरा भवन) स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमादरम्यान

Kiren Rijiju : "विरोधी नेत्यांना 'दिमागी नक्षलवादी' म्हटले नाही"

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्यदिनाच्या भाषणातील 'दिमागी नक्षलवादी'

Nashik Firing : नाशिकमध्ये पानटपरीवर उभ्या असलेल्या तरुणावर गोळीबार

नाशिक : अध्यात्मिक शहर अशी ओळख मिरवणाऱ्या नाशिकमध्ये रविवारी गोळीबाराची घटना घडली. नाशिक रोडच्या गोसावी

Sunetra Pawar : 'दादांचे प्रगत, पुरोगामी महाराष्ट्राचे स्वप्न सर्वांच्या साथीने पूर्ण करायचे आहे'

पुणे : दादांनी (अजित पवार) तुम्हाला आणि मला दिलेला हा जो विकासाचा वारसा आहे तो वारसा अर्ध्यावर सोडून देणे हे

Meghna Sakore Bordikar : 'परभणी गुंतवणूक परिषदेतून १,६०० कोटींची गुंतवणूक; स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी'

परभणी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात परभणी जिल्ह्यात उद्योगवाढीसाठी पोषक वातावरण निर्माण

Chakan-Talegaon Industrial Belt : चाकण-तळेगाव औद्योगिक पट्ट्याचा कायापालट होणार? खड्ड्यांसाठी प्री-कास्ट, जिओ पॉलिमर टेक्नो पॅचचा वापर

मुंबई : चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील उद्योग आणि स्थानिक नागरिकांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना