राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या आणि अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी नागरिकांना अत्यंत महत्त्वाचा इशारा दिला आहे. सध्याची परिस्थिती पाहता, नागरिकांनी कोणत्याही अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. सतत कोसळणारा पाऊस आणि काही ठिकाणी घडलेल्या दरड कोसळण्याच्या दुर्घटनांमुळे वाहतुकीवर प्रचंड मोठा परिणाम झाला आहे. प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करून प्रशासन आणि सरकारने मोठा निर्णय घेतला असून, पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग (Expressway) तसेच जुना मुंबई-पुणे महामार्ग या दोन्ही प्रमुख मार्गांवरील वाहतूक दोन्ही दिशांनी पुढील आदेश येईपर्यंत पूर्णपणे थांबवण्यात आली आहे. या मार्गांवरून प्रवास न करण्याचे कडक निर्देश देण्यात आले आहेत.
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; दुपारनंतर परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता मुंबई : "गेल्या काही तासांपासून सातत्याने कोसळणाऱ्या पावसामुळे ...
मुंबई-पुणे एक्सप्रेस वे आणि जुना महामार्ग बंद
मुंबई आणि आसपासच्या परिसरातील बिघडत चाललेल्या हवामानावर बोलताना मंत्री महाजन यांनी पर्यटकांना सक्त ताकीद दिली आहे. मुंबईत सध्या ७० ते ९० किलोमीटर प्रतितास या वेगाने वादळी वारे वाहत असून ठिकठिकाणी झाडे कोलमडण्याच्या घटना घडत आहेत. अशा धोकादायक परिस्थितीत मुंबईत पर्यटनासाठी गर्दी करू नये, तसेच धबधब्यांच्या ठिकाणी हुल्लडबाजी करून स्वतःचा जीव धोक्यात घालू नये, असा इशारा त्यांनी दिला आहे. प्रशासनाच्या नियमांचे पालन न केल्यास सरकारला सक्तीची पावले उचलावी लागतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. या संकटसमयी मानखुर्द येथे ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती देत, विरोधकांनी या संवेदनशील परिस्थितीवर राजकारण न करता जनतेला धीर द्यावा आणि प्रशासनाला सहकार्य करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
मुंबई : राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यासह अनेक भागांतील रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी ...
दरम्यान, भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई महानगर क्षेत्रासाठी 'रेड अलर्ट' घोषित केल्यामुळे राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि मुंबई महानगरपालिकेने तातडीने काही महत्त्वाच्या उपाययोजना लागू केल्या आहेत. त्यानुसार, शहरातील सर्व खासगी कंपन्यांना आपल्या कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' म्हणजेच घरातून काम करण्याची परवानगी देण्याची सूचना करण्यात आली आहे. याशिवाय, अत्यावश्यक सेवा पुरवणारे विभाग वगळता इतर सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालये आज केवळ दुपारपर्यंतच सुरू राहतील आणि त्यानंतर कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्यात आली आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत सरकारी सूचनांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.





