एखाद्या तरुणाच्या मनात असा कोणता विचार जन्म घेतो, की तो शांतपणे दुसऱ्या माणसाचा जीव घेण्याचा विचार करतो... आणि तो प्रत्यक्षात कृतीतही उतरवतो? हा प्रश्न फक्त गुन्हेगारांचा नाही. हा प्रश्न प्रत्येक घराचा आहे. प्रत्येक पालकाचा आहे. प्रत्येक शिक्षकाचा आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे... हा प्रश्न आपल्या समाजाचा आहे. कारण कोणतंही मूल जन्मतः क्रूर नसतं. कोणतंही मूल दुसऱ्याचा जीव घ्यायचा विचार घेऊन जन्माला येत नाही. प्रत्येक मूल प्रेम, विश्वास आणि निरागसपणा घेऊन जन्माला येतं. मग मोठं होताना काही मनं इतकी कठोर कशी होतात? राग इतका वाढतो कसा? आणि माणुसकी इतकी कमी कशी होते? याचं उत्तर एका घटनेत नाही. ते आपल्या घरात, संगोपनात, शिक्षणात, समाजात आणि बदललेल्या जीवनशैलीत दडलेलं आहे. आज आपण मुलांना जग जिंकायला शिकवतो; पण स्वतःचं मन जिंकायला शिकवत नाही. आपण त्यांना यश मिळवायला शिकवतो; पण अपयश पचवायला शिकवत नाही. आपण त्यांना स्पर्धा शिकवतो; पण सहजीवन शिकवत नाही. आपण त्यांना करिअर घडवायला शिकवतो; पण माणूसपण जपायला शिकवत नाही. आज अनेक तरुणांना स्वतःच्या भावना ओळखताच येत नाहीत. त्यांना राग येतो, पण त्या रागामागे दडलेलं दुःख दिसत नाही. त्यांना अपमान सहन होत नाही. नकार स्वीकारता येत नाही. अपेक्षा पूर्ण होत नाहीत तेव्हा जगच चुकीचं वाटायला लागतं.
ज्या भावना समजल्या जात नाहीत, त्या अनेकदा चुकीच्या कृतीतून बाहेर पडतात. म्हणूनच मुलांना लहानपणापासून स्वतःच्या भावना ओळखायला आणि त्या योग्य पद्धतीने व्यक्त करायला शिकवणं आवश्यक आहे. राग येणं चुकीचं नाही. दुःख होणं चुकीचं नाही. पण त्या भावनांचं व्यवस्थापन न शिकणं धोकादायक ठरू शकतं. आज आयक्यू वाढवण्यासाठी आपण लाखो रुपये खर्च करतो. पण आयुष्य फक्त बुद्धिमत्तेवर चालत नाही. भावनिक बुद्धिमत्ता (इमोशनल कोशन) आयक्यू - म्हणजे स्वतःच्या आणि इतरांच्या भावना समजून घेण्याची क्षमता - अनेकदा पदवीपेक्षाही मोठी ठरते. कारण हुशार माणूस यशस्वी होऊ शकतो. पण भावनिकदृष्ट्या परिपक्व माणूस स्वतःलाही वाचवतो आणि दुसऱ्यालाही दुखावत नाही. आजची आणखी एक मोठी समस्या म्हणजे ‘माझं सुख... माझी सोय... माझी इच्छा...’ हा विचार. हळूहळू ‘मी’ इतका मोठा होतो की ‘आपण’ हा शब्दच हरवून जातो. दुसऱ्याच्या भावना, अडचणी, वेदना यांच्याशी काही देणं-घेणं राहत नाही. सहानुभूती - दुसऱ्याच्या मनात डोकावून पाहण्याची क्षमता - कमी होत चालली आहे आणि जिथे सहानुभूती संपते, तिथे कठोरपणा वाढू लागतो.
आजच्या मुलांना एका क्लिकवर जवळजवळ सगळं मिळतं. अन्न, मनोरंजन, माहिती, खरेदी... सगळं क्षणात. पण आयुष्य वन क्लिक नसतं. आयुष्यात प्रतीक्षा असते. नकार असतो. अपयश असतं. मतभेद असतात आणि म्हणूनच मुलांना परिस्थितीशी जुळवून घेणं शिकवणं खूप गरजेचं आहे. आज अॅडजस्टमेंट (तडजोड) हा शब्द अनेकांना कमकुवतपणाचा वाटतो. पण खरं तर जुळवून घेणं हीच सर्वात मोठी ताकद आहे. प्रत्येक वेळी आपल्या मनासारखंच होणार नाही. प्रत्येक व्यक्ती आपल्याशी सहमत असणार नाही. प्रत्येक नात्यात कधी ना कधी माघार घ्यावी लागते. ती हार नसते; ती नातं टिकवण्याची किंमत असते. जो परिस्थितीशी जुळवून घेतो, तो तुटत नाही. जो नात्यांमध्ये जुळवून घेतो, तो एकटा पडत नाही. आज सोशल मीडियाने माहिती दिली, संधी दिल्या. पण त्याचबरोबर तुलना, प्रसिद्धीची भूक आणि तत्काळ प्रतिक्रिया देण्याची सवयही दिली. हजारो फॉलोअर्स असूनही मन मोकळं करायला एकही विश्वासाचं माणूस नसणं ही आजची शोकांतिका आहे.
एकुलतं एक मूल असणं चुकीचं नाही. पण जर प्रत्येक इच्छा लगेच पूर्ण झाली, प्रत्येक हट्ट मान्य झाला, प्रत्येक अडचण पालकांनी आधीच दूर केली, तर आयुष्याचा पहिला नकारच असह्य वाटू शकतो. संघर्ष हा शत्रू नाही; तो व्यक्तिमत्त्व घडवणारा शिक्षक आहे. आणि आता एक प्रश्न प्रत्येक पालकांसाठी... आपण आपल्या मुलाचं खरंच ऐकतो का? की आपण समाजाचंच जास्त ऐकतो? “लोक काय म्हणतील?” नातेवाईक काय म्हणतील?” या चार शब्दांनी मुलं किती एकटी पडली आहेत, याचा कधी विचार केला आहे का? लक्षात ठेवा... समाज तुमच्या मुलाचं आयुष्य जगणार नाही. समाज तुमच्या वेदना कमी करणार नाही. समाज तुमच्या घरचे निर्णय घेणार नाही. मग आपल्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल समाजाच्या हातात का द्यायचा? लोकांच्या मतांपेक्षा आपल्या मुलाचं मन महत्त्वाचं आहे. त्याचं ऐका. त्याला समजून घ्या. कधी कधी मुलांना उपाय नको असतो; फक्त निःपक्षपातीपणे ऐकणारं एक सुरक्षित मन हवं असतं. आज पालक मुलांच्या शिक्षणासाठी, करिअरसाठी, मोठ्या पगारासाठी दिवस-रात्र मेहनत घेत आहेत. हे आवश्यक आहे. पण त्याचबरोबर एक प्रश्न स्वतःला विचारायला हवा... आपण यशस्वी मुलं घडवत आहोत... की संवेदनशील माणसं? कारण मोठा पगार समाज सुरक्षित करत नाही. मोठं पद समाज सुरक्षित करत नाही. समाज सुरक्षित ठेवतात ती भावनांवर नियंत्रण ठेवणारी, सहानुभूती असलेली आणि माणुसकी जपणारी माणसं. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा... कोणताही खून एका क्षणात होत नाही.
तो आधी मनात घडतो. राग, अहंकार, सूड, असहिष्णुता, नकार न स्वीकारण्याची वृत्ती, भावनांवर नियंत्रण नसणं आणि सहानुभूतीचा अभाव... या सगळ्यांची बेरीज म्हणजे हिंसा. म्हणूनच आजची गरज फक्त चांगल्या शाळांची नाही. फक्त चांगल्या करिअरची नाही. फक्त मोठ्या पगाराची नाही. आजची सर्वात मोठी गरज आहे चांगल्या माणसांची. कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्स भविष्य घडवेल... पण समाज वाचवेल फक्त मानवी मन. शेवटचा प्रश्न... “आपण मुलांना करिअर घडवायला शिकवत आहोत... पण त्यांना माणूस राहायलाही शिकवत आहोत का?” कारण जीव घेण्यासाठी एका क्षणाचा राग पुरतो... पण जीव जपण्यासाठी आयुष्यभराची माणुसकी लागते.