दुपारचं उन्हाळ्यातलं कडक ऊन. खरं तर जून महिन्यातला हा दिवस. पण पावसाळा लांबल्यामुळे आता जून महिनाही उन्हाळ्याच्या ऋतूतला...याची सवय आपल्याला करावी लागेल. तर जून महिन्यातील उन्हाळ्यात घामाघूम होत विरारहून ट्रेन पकडली. फर्स्ट क्लासचा डबा. दुपारी तसा रिकामाच. खिडकीजवळची जागा पकडून बसले. घटाघटा पाणी प्यायले. विरार ते वांद्रे एक तासाचा प्रवास. तसा खूप वेळाचा नाही पण फार कमी वेळाचाही नाही. कानाला हेडफोन लावला आणि गाणी ऐकत डोळे मिटून घेतले. अभिमान चित्रपटातलं ‘तेरे मेरे मिलन कि ये रैना’ हे गाणं सुरू झालं. मनातल्यामनात म्हटलं-
‘वॉव, मस्त गाणं लागलंय.’ काय ते सुंदर शब्द आणि लतादीदी नि किशोरदांचा स्वर... अप्रतिम गाणं. या गाण्यावर अगदी गुणी, सालस, प्रतिभावान गायिकेची व्यक्तिरेखा हुबेहूब वठवणारी जया भादुरी आणि प्रसिद्धीच्या शिखरावर असणाऱ्या गायकाची भूमिका करणारा अमिताभ बच्चन डोळ्यांसमोर आले. नवदाम्पत्याने एकत्र गायलेलं गाणं इथपासून...बायकोची प्रगती, तिचा गुणगौरव पाहून ‘इगो’ दुखावलेला नवरा हा त्यांचा जीवनप्रवास झरझर डोळ्यांसमोरून गेला. मनात म्हटलं की, माणसाचा इगो किती महत्त्वाचा नाही, एक सुंदर नात संपवायलाही मागे-पुढे पाहत नाही. क्षुल्लक गोष्टी प्रसंगानुरूप कधी कधी एवढ्या मोठ्या वाटतात की, तिथून वादाला, रुसव्याफुगव्यांना सुरुवात होते. काही काळाने राग निवळल्यावर आपण ज्या गोष्टीवरून भांडलो, ती गोष्ट किती छोटी होती हे कळून चुकतं. पण पहिला फोन कोणी करायचा, कोणी नमतं घ्यायचं इथपासून इगो आड यायला लागतो. नातं हळूहळू दुरावायला लागतं.
नात्याची वीण घट्ट ठेवायची असेल तर इगोला ‘गो’ सांगता आलं पाहिजे. मग ते नातं नवरा-बायकोचं असू दे की आई-वडील आणि मुलाचं असू दे की मैत्रीचं असू दे... आपल्या काळजाचं कोणतंही नात जपायचं असेल तर इगो म्हणजेच अहंपणा बाजूला ठेवता आला पाहिजे. हल्लीच मी ओटीटी प्लॅटफॉर्मवरील ‘गुल्लक’ ही गोड वेबसिरीज पाहिली. आठवणींचा संचय या प्रतिकात्मक अर्थाने ‘गुल्लक’ असे या सिरीजचे नाव आहे. उत्तर भारतातील आईवडील आणि दोन मुलगे असं एक कुटुंब. या कुटुंबाच्या आयुष्यात घडणारे अनेक छोटे-मोठे प्रसंग ज्याला ते ‘किस्से’ म्हणतात, जे तुमच्या माझ्या आयुष्यातही घडत असतात. अनेकदा मूल्यांचा कस लागावा असेही प्रसंग त्यांच्या आयुष्यात घडतात. पण अखेर मूल्यव्यवस्थेला प्राधान्य देणारे हे मध्यमवर्गीय कुटुंब अशा पेचप्रसंगांमधून कसा मार्ग काढतं आणि मग त्यात कोणत्या गंमती जमती घडतात, साधारणतः
अशा आशयाचे एपिसोड या सिरीजमध्ये आहेत, तर सांगायची गोष्ट अशी की इगोवरून या सिरीजमध्ये एक अतिशय सुंदरप्रसंग आहे.
मोठा भाऊ अन्नू आणि लहान भाऊ अमन या दोघांमधला हा संवाद आहे. एका कारणावरून अमन आणि त्याच्या वडिलांमध्ये वादविवाद होतात. हा मुलगा रागाने घर सोडून जातो. मोठा भाऊ रात्री उशिरा आपल्या भावाला शोधून घरी आणतो. मुलगा सापडत नाही म्हणून वडीलही इथे बैचेन असतात. दारात स्टूलवर बसून मुलाची वाट पाहत असतात. मुलावर नितांत प्रेम करणारे वडील मुलगा घरी परत आल्यावर त्याच्याशी काहीही बोलत नाहीत. चुपचाप घरात निघून जातात. मुलगाही वडिलांशी काहीही न बोलता आपल्या खोलीत निघून जातो. अशाप्रसंगी अमनला समजवताना मोठा भाऊ अन्नू पतंग कापण्याचं अतिशय चपखल बसणार उदाहरण देतो. तो त्याला सांगतो की पतंग दोन प्रकारे कापले जातात. काही जण ढील देऊन देऊन पतंग कापतात, तर काही जण खेचून पतंग कापतात. यावर अमन म्हणतो की माहिती आहे मला. यात काय नवीन आहे? यावर उत्तर देताना अन्नू त्याला सांगतो की तुझं म्हणणं बरोबर आहे. खरं सांगू तर पतंग कशाप्रकारे कापला गेला हे महत्त्वाचं नाहीच. तर महत्त्वाचं हे आहे की,‘दोनोमे पेंच क्यू लगती है?’ अमनला उत्तर देता येत नाही. यावर तो स्वतःच उत्तर देतो,’ दोनोमे पेंच लगती है, क्यूकी दोनो का इगो’ एवढं सांगून तो अमनला सांगतो की आपल्या माणसामध्ये कसला आलाय इगो... आपणच आपल्या माणसांशी पेंच लावायची का? मोठ्या भावाचे म्हणणे लहान भावाला पटते नि त्याच्या डोळ्यांतून पश्चातापाचे अश्रू घळाघळा वाहू लागतात. मनाला स्पर्शून जाणारा हा प्रसंग साध्यासोप्या भाषेत नाती जपण्याच मर्म नेमकेपणाने सांगून जातो. कानात हेडफोन घालून बराच वेळ झाल्यावर मी कोणतं स्टेशन आलं आहे हे पाहण्यासाठी मिटलेले डोळे उघडले. अंधेरी स्टेशन येत होतं. फास्ट ट्रेन असल्यामुळे आता त्यानंतर वांद्रे स्टेशन. त्यामुळे कानातले हेडफोन काढून बॅगेत ठेवले. तेवढ्यात समोरच्याच सीटवर बसलेल्या बाईकडे माझं लक्ष गेलं.
साधारणतः पन्नाशीची असेल. छान टापटीप होती. नोकरी करणारी वाटत होती. तिच्या मांडीवर ऑफिस बॅग होती. कानाला फोन लावून कोणाशी तरी मराठीतून जोरजोरात बोलत होती. बोलण्यात एकदम स्पष्टता होती. ती कोणाला तरी काहीतरी पटवून देण्याचा प्रयत्न करत होती. तिच्या बोलण्याचा काही संदर्भ लागत नव्हता. पण ‘बात दिल को लगी है!’ हे तिच्या बोलण्यावरून जाणवत होतं. तिचं टेचात बोललेलं शेवटचं वाक्य अगदी थेट कानावर येऊन आदळलं, ‘अरे माहिती आहे तू करोडपती आहेस. शंभर रुपयाची तुला काय किंमत? शंभर रुपयासाठी माझ्यासाठी वाद घालतोस. नको मला तुझे शंभर रुपये आणि तुझं कामही नको.’ एवढं बोलून तिने फोन कट केला. रणरागिणीप्रमाणे ताडताड बोलणाऱ्या तिच्या अश्रूंचा बांध फुटला. दारात जाऊन ती उभी राहिली. झरझर मागे पडणारी स्टेशन बहुधा तिला धूसर दिसत असावीत. तिचं नेमकं भांडण काय होतं, चूक कोण, बरोबर कोण माहीत नव्हतं. फक्त एवढं कळत होतं की, बराच वेळ आपलं म्हणणं पटवू पाहणाऱ्या तिचा स्वाभिमान दुखावला गेला होता आणि नाईलाजास्तव एक काम सोडण्यापेक्षा त्या कामाशी तुटलेल्या नात्याचं दुःख तिच्या डोळ्यांतून वाहत होतं. इगो आणि स्वाभिमान याच्या धूसर असणाऱ्या सीमारेषा ज्याला कळतात तो सांडणारं नातं इगो बाजूला ठेवून सांभाळतो आणि जगण्याचा कणा असलेला स्वाभिमान दुखावला गेल्यावर ताणणारं नातं अधिक न ताणता तिथेच संपवतो.
कवी गुलजार यांची मानवी नातेसंबंधांवर एक अतिशय सुंदर कविता आहे. त्या कवितेत ते म्हणतात की, विणकर ज्याप्रमाणे गाठी – निरगाठींना सामावून घेत एकसंध वस्त्र विणतो, त्याप्रमाणे नात्यांमधील गाठी – निरगाठी म्हणजेच रुसवेफुगवे, राग, अपमान या सगळ्यांना सामावून घेत एक सुंदर नाते विणायला मला शिकायचे आहे. कवी गुलाजारांच्या उर्दू मिश्रित हिंदी कवितेचा भावानुवाद मी केला होता. नातेसंबंधांवर लिहिताना ज्यातील चार ओळी आवर्जून उद्धृत कराव्याशा वाटतात –
नात सांधताना कानि वस्त्र सांधताना काय गाठी या पडणारच. पण हे विणकरा, मला शिकायचंय तुझ्याकडून या गाठी – निरगाठींना बेमालूमपणे सामावून घेत एक स्वच्छ सुंदर नातं विणायला एक स्वच्छ सुंदर नातं विणायला. नात्यात येणाऱ्या ‘इगो’ला गो म्हणूया आणि विणकराप्रमाणे एक स्वच्छ सुंदर नात विणूया.
Ashwinibhoir23@gmail.com