गोष्ट लहान, मोठा अर्थ-शिल्पा अष्टमकर
“माणसाच्या आयुष्यात ज्ञान, संपत्ती, पद किंवा प्रसिद्धी यांना महत्त्व आहे; पण या सर्वांपेक्षा मौल्यवान गोष्ट म्हणजे चरित्र. चरित्र एका दिवसात घडत नाही. ते आपल्या दैनंदिन वागण्या-बोलण्यातून, सवयींमधून आणि संस्कारांमधून हळूहळू घडत असते. म्हणूनच म्हटले जाते, “चांगल्या वागण्यातून चरित्र घडते.”
चांगले वागणे म्हणजे फक्त गोड बोलणे नव्हे. त्यामध्ये प्रामाणिकपणा, नम्रता, वेळेचे पालन, दुसऱ्यांचा आदर, सहकार्याची भावना, शिस्त, जबाबदारी आणि सत्याची साथ यांचा समावेश होतो. जो माणूस प्रत्येकाशी प्रेमाने व आदराने वागतो, तो नकळत इतरांच्या मनात आपले स्थान निर्माण करतो. त्याचे हेच वर्तन त्याच्या चारित्र्याची खरी ओळख बनते.लहान-लहान कृतीदेखील चरित्र घडवतात. चूक झाली तर ती स्वीकारणे, दिलेला शब्द पाळणे, कोणाची फसवणूक न करणे, गरजूंना मदत करणे, मोठ्यांचा सन्मान करणे आणि लहानांशी प्रेमाने वागणे - या साध्या वाटणाऱ्या गोष्टीच व्यक्तिमत्त्वाला उंची देतात. चांगले विचार आणि चांगले आचरण यांचा संगम म्हणजे उत्तम चरित्र.आजच्या स्पर्धेच्या युगात यश मिळवण्यासाठी अनेकजण धडपड करतात; परंतु यशापेक्षा चरित्र मिळवण्याची पद्धत अधिक महत्त्वाची असते. प्रामाणिक मार्गाने मिळवलेले यश टिकाऊ असते, तर चुकीच्या मार्गाने मिळवलेले यश क्षणिक असते. म्हणून आपल्या वागण्यात नेहमी सचोटी आणि नैतिकता असणे आवश्यक आहे.विद्यार्थ्यांनी विशेषतः लहानपणापासून चांगल्या सवयी अंगीकारल्या पाहिजेत. शिक्षकांचा आदर, पालकांचे ऐकणे, नियमित अभ्यास, स्वच्छता, वेळेचे नियोजन आणि इतरांना मदत करण्याची वृत्ती यांमुळे उत्तम चारित्र्याची पायाभरणी होते. भविष्यात हेच विद्यार्थी जबाबदार आणि आदर्श नागरिक बनतात.शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते की, माणसाचे रूप नव्हे, तर त्याचे चरित्र त्याला खऱ्या अर्थाने सुंदर बनवते. म्हणून प्रत्येकाने आपल्या वागण्यात प्रेम, नम्रता, प्रामाणिकपणा आणि शिस्त यांचा स्वीकार करावा. कारण चांगल्या वागण्यातूनच चांगले चरित्र घडते आणि चांगल्या चरित्रातूनच यशस्वी, सन्माननीय आणि आनंदी जीवनाची निर्मिती होते.
मना सज्जना भक्तिपंथेचि जावे ।
तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे ।
जनी निंद्य ते सर्व सोडोनि द्यावे ।
जनी वंद्य ते सर्व भावे करावे ॥
- मनाचे श्लोक
जगामध्ये वागताना आपल्याला कुणी नावे ठेवणार नाही याची काळजी घ्यावी लागते. योग्य काय, अयोग्य काय, याचा निवाडा होणे आवश्यक असते. आपल्या वागण्यातून आपले चारित्र्य तयार होते व त्यातून आपली सामाजिक प्रतिमा निर्माण होते. आपल्या हातून चुका घडू नयेत यासाठी आपण भक्तिमार्गाने जावे. मनोभावे भगवंताची पूजा करणे, भगवंताचे नामस्मरण करणे, भगवंताची कथा ऐकणे, भगवंताची सेवा करणे, याला भगवंताची भक्ती म्हणतात. भगवंत आपल्या भक्ताला चांगले वागण्याची बुद्धी देतो म्हणून भगवंताला प्रार्थना करताना ‘बुद्धी दे रघुनायका’ असे समर्थ म्हणतात. त्यासाठी भक्तिमार्गाची कास धरावी.- शबरी भक्ती -शबरी ही भिल्ल समाजातील एक कातकरी मुलगी होती. ती दहा वर्षांची असताना तिच्या वडिलांनी तिचे लग्न ठरवले. लग्नाच्या दिवशी लोकांना जेवताना मांसाहार द्यायचा म्हणून त्यांनी सुमारे ३०० शेळ्या आणल्या होत्या. आपल्या लग्नात या शेळ्या कापल्या जाणार हे कळताच शबरी खूप कळवळली. तिने आपल्या वडिलांना खूप विनवण्या केल्या. पण वडिलांनी तिची समजूत घालण्याऐवजी तिला वेड्यात काढले. लग्नाच्या आदल्या रात्री शबरीला झोपच येईना. रात्रभर ती बैचेन होती. पहाटे ३ वाजता ती गुपचूप उठली आणि घरातून पळून गेली. तिने मातंग ऋषींचा आश्रम गाठला. तिचा भक्तिभाव पाहून मातंग ऋषींनी तिला आश्रमात प्रवेश दिला. तिने मनोभावे मातंग ऋषींची सेवा केली. प्रसन्न होऊन मातंग ऋषी म्हणाले -योग्य वेळी प्रभुरामचंद्र येतील आणि तुला दर्शन देतील.’
शबरी रोज रामाची वाट पाहू लागली. तिने मनाने सतत रामाचे चिंतन करावे. राम कोणत्याही रस्त्याने येऊ शकतील म्हणून आश्रमाभोवतालचे सगळे रस्ते तिने रोज झाडावेत. राम आले आणि आपण झोपलेलो असलो तर ते तसेच निघून जातील म्हणून तिने २४ तास जागे राहावे. रामासाठी रोज फळे तोडून ठेवावीत.रामाच्या प्रतीक्षेत, रामाच्या चिंतनात, रामाच्या नामस्मरणात तिची अनेक वर्षे निघून गेली. आता शबरी वृद्ध झाली होती. तिला रामाच्या दर्शनाची तीव्र ओढ लागली होती. अखेर एक दिवस प्रभुरामचंद्र आले. त्यांनी शबरीला दर्शन दिले. शबरीने रामाचे पूजन केले. त्या आनंदातच शबरीने त्या दिवशी रामाच्या चरणांवर देह ठेवला.भक्तिमार्गातील शबरी ही देवता ठरली. भिल्ल समाजातील एक सामान्य स्त्री रामचरित्रात अमर ठरली. भक्तीने माणसाच्या जीवनाचे सार्थक होते म्हणून समर्थांनी ‘भक्तिपंथेची जावे’ असा सल्ला सर्वांना दिला. स्वतः समर्थ रामाची भक्ती करून धन्यता पावले.