Saturday, July 4, 2026

Uday Samant : नाशिक रिंग रोड आंदोलन स्थगित; मंत्री उदय सामंत यांच्या मध्यस्थीनंतर शेतकऱ्यांची बैठक निश्चित

Uday Samant : नाशिक रिंग रोड आंदोलन स्थगित; मंत्री उदय सामंत यांच्या मध्यस्थीनंतर शेतकऱ्यांची बैठक निश्चित

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रस्तावित रिंग रोड (Ring Road) प्रकल्पासाठी सुरू असलेल्या भूसंपादनामुळे (Land Acquisition) बाधित झालेल्या शेतकऱ्यांनी योग्य मोबदला (Compensation) आणि जुन्या अलाइनमेंट (Alignment) नुसार रिंग रोड व्हावा, अशी मागणी केली होती. या मागण्यांसाठी मुंबईत मुख्यमंत्री यांच्या भेटीसाठी निघालेल्या शेतकऱ्यांना नाशिक पोलिसांनी अडवून पोलीस मुख्यालयात (Police Headquarters) थांबवले होते. त्यानंतर शेतकऱ्यांनी तेथेच आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

दरम्यान, नाशिक दौऱ्यावर असलेले राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा केली. पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या मागण्यांवर बैठक घेऊन जमिनींना योग्य मोबदला देण्याबाबत प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले.

यावेळी नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनीही अधिकाऱ्यांशी समन्वय (Coordination) साधला. मंत्री उदय सामंत यांनी शेतकऱ्यांसमोर मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याशी दूरध्वनीवर (Phone Call) चर्चा केली. त्यानंतर मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सकारात्मक निर्णयासाठी बैठक घेण्याचे आश्वासन दिले. तसेच संबंधित बैठक होईपर्यंत कोणतीही पुढील कार्यवाही (Action) केली जाणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले. या घडामोडीनंतर रिंग रोड बाधित शेतकऱ्यांनी आपले आंदोलन (Protest) तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांच्या बैठकीची जबाबदारी मंत्री उदय सामंत यांनी स्वीकारली आहे.

नाशिकमधील रिंग रोड प्रकल्पासाठी बाधित झालेल्या शेतकऱ्यांनी अयोग्य अलाइनमेंट (Alignment) आणि अपुऱ्या मोबदल्याविरोधात आंदोलन सुरू केले होते. यापूर्वी त्यांनी मंत्र्यांच्या निवासस्थानांवर जाऊन आंदोलन, रास्ता रोको (Rasta Roko) आणि आमरण उपोषण (Hunger Strike) केले होते. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असताना शेतकऱ्यांनी अलाइनमेंटमध्ये बदल आणि योग्य मोबदल्याची मागणी केली आहे. या विषयावर तोडगा काढण्यासाठी मंत्री गिरीश महाजन यांनीही शेतकऱ्यांना मध्यम मार्ग काढून न्याय देण्याचे आश्वासन दिले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >