भारतीय संत-डॉ. अनुराधा कुलकर्णी
अरुणोदय होण्यापूर्वीच सेना उठले. आज महाराजांना सकाळी प्रवासाला निघायचे होते. त्यामुळे सेना न्हावींनी पहाटे लवकर येऊन राजांची श्मश्रू करावी, असे राजफर्मान होते. बांधवगड संस्थानाच्या राजांचे सेना हे खास न्हावी होते.आपले प्रातर्विधी आटोपून, हातात धोपटी घेऊन सेना घराबाहेर पडले. सर्वत्र अजूनही अंधाराचे साम्राज्य होते. रात्रीचा रत्नसंभार आकाशात चमचमत होता, पक्षीही अजून झोपलेले होते.रस्त्याने जाता जाता वाटेत कृष्णमंदिर लागले. स्वतःच्याही नकळत सेना मंदिराच्या पायऱ्या चढून गेले. आदल्या दिवशी उत्तररात्रीपर्यंत सेना श्रीहरीच्या गुणसंकीर्तनात दंग झाले होते. त्यावेळी स्फुरलेला अभंग अजूनही हृदयात गुंजत होता.
चित्ती पाय रूप डोळा । मुखी नाम वेळोवेळा । हेचि मागे तुजपाशी । भाव खरा की जाणसी।। नको देऊ अंतर । सेना लोळे पायावर ।।
मुखाने हरिनाम घेत असताना, चित्तात हरिचरणाचे चिंतन असावे, डोळ्यांसमोर त्याचे रूप असावे, तरच खऱ्या अर्थाने नामःस्मरण होईल, असे अंतःकरणापासून आलेले हरिभजन माझ्याकडून व्हावे हेच मागणे सेना
श्रीहरीपाशी मागत होते.मंदिरातल्या कृष्णमूर्तीसमोर हात जोडून, डोळे मिटून सेना उभे होते. त्यांनी डोळे उघडले, तर समोर कृष्णाचे अत्यंत विलोभनीय सुहास्य वदन त्यांना दिसले. ते कृष्णरूप डोळ्यांत साठवीत सेनांनी पुनश्च डोळे मिटले आणि तत्क्षणी त्यांची समाधीच लागली!सेनांनी डोळे उघडले तेव्हा सूर्य चांगलाच वर आला होता. रस्त्यावर माणसांची वर्दळ सुरू झाली होती. बाजारातला कोलाहल रंगात येऊ लागला होता. सेना लगबगीने उठले. राजमहालाकडे त्वरेने जाऊ लागले. महाराज आता चांगलेच कोपणार, या विचाराने सेना धडधडत्या हृदयाने राजांसमोर गेले. राजे बाहेर पडण्याच्या तयारीत होते. सेनांना पाहताच ते म्हणाले, ’अरे, तू परत कसा आलास? पहाटे खूप चांगली श्मश्रू केलीस हं माझी! खरेच तुझ्या हातात जादू आहे!’’
सेनांना काही कळेना, “मी तर मंदिरात होतो. मग महाराजांची दाढी मी केव्हा केली? की देवाने माझी लाज राखली! देवा, देवा, माझ्यासाठी तुम्ही शीणलात?” असा विचार करता करता सेनांच्या मनात आले, ‘मी, माझे’ म्हणणारा ‘मी’ खरेच आहे का? भगवंताविना दुसरे काही नाहीच ना,म्हणूनच तर कर्म करवून घेणारा तो, तसेच कर्म करणाराही तोच! सेनांने डोळे भक्तिप्रेमाने डबडबून गेले. राजमहालातून घरी परत येताना त्यांच्या हृदयात, अभंगबोल उमटत होते.आम्हा एकविध
भाविकांची जाती ।। न जाणे निश्चिती दुजे काही ।। डोळा मुख पाहू मुखी नाम गाऊ ।। सेना म्हणे पाहू जळी स्थळी ।।
या घटनेनंतर काही दिवस गेले. एका शुभ प्रभाती तनामनाने हरिमय झालेले सेना राजांची हजामत करीत होते. तेव्हा राजांना समोरच्या आरशात, तेलाच्या वाटीत सेनांचे प्रतिबिंब न दिसता देवाची मनोहर चतुर्भूज मूर्तीच दिसली! राजांनी मागे वळून पाहिले. तर त्यांना सेनाच तेथे उभे असलेले दिसले. पुनश्च आरशातले, वाटीतले प्रतिबिंब पाहता, त्यात हातात कात्री धरलेले भगवंत दिसले ! राजे म्हणाले, “सेना, मला तुझ्याजागी देवच दिसतोय रे! किती विलक्षण गोष्ट ही!”सेना उद्गारले, “महाराज, फक्त माझ्यातच नव्हे, तुमच्यात, या महालातील सर्व सेवकांत, भगवंतच भरला आहे. एवढेच नव्हे तर सजीव, निर्जीव सर्वांमध्ये तो आहे.” सेनांच्या उद्गारांनी राजे भारावले अन् म्हणाले, “सर्वत्र भगवंत आहे हे खरे, पण तुझ्या विशुद्ध अंतःकरणामुळे तो तुझ्यात सुस्पष्टपणे प्रतीत होतोय. सेना तू धन्य आहेस !”
सेनांचे कुटुंब पिढीजात राजपरिवाराचे सेवक होते. त्यांचे वडील देविदास आणि आई प्रेमकुंवर हे दोन्ही आध्यात्मिक प्रवृत्तीचे होते. देविदास तर ज्ञानेश्वरांच्या वडिलांचे गुरुबंधूच होते. अशा शुद्ध संतप्रवृत्तीच्या बीजापोटी जन्मलेल्या सेनांना बालपणापासूनच हरिभक्तीची आवड होती.आपली सांसारिक कर्तव्ये पार पाडून, योग्य समय येताच सेनांनी सर्वसंगपरित्याग केला आणि ते भक्तिमार्गावरील पूर्णवेळ वाटसरू बनले. त्यांनी मध्य भारतातील अनेक तीर्थयात्रा केल्या. पण त्यांच्या जीवाला खरी ओढ होती. पंढरपूरच्या विठोबाच्या दर्शनाची! त्याकाळी पंढरीला जमलेल्या संतमेळ्यांची कीर्ती सेनांच्या कानी आली होती. त्या सर्वांना भेटण्याची आर्त त्यांच्या अंतरी निर्माण झाली. नामदेव, ज्ञानदेव, निवृत्तिनाथ, सोपानदेव,
मुक्ताई, जनाई, गोराकुंभार, सावता माळी, या सर्व संताना मी केव्हा भेटीन, अशी आंस सेनांना लागली.
म्हणवितो विठोबाचा दास ।
शरण जाईन संतास ।।
सदा सुकाळ प्रेमाचा । नासे दुष्टमळ बुद्धीचा ।।
सेना म्हणे हेचि सुख । नाही ब्रह्मयासी देख ।।
संत समागमासारखे आणि विठ्ठल दर्शनासारखे सुख दुसरे नाही, हे जाणून सेना महाराष्ट्रात यायला निघाले. वाटेत त्यांचे मन आनंदाने उचंबळून येत होते. जाता पंढरीसी सुख वाटे जीवा । आनंदे केशवा भेटताची ।। या सुखाची उपमा नाही त्रिभुवनी । पाहिली शोधुनी अवघी तीर्थे ।। ऐसा नामघोष ऐसा पुंडलीक । ऐसा वेणुनादी काला दावा ।। सेना म्हणे खूण सांगितली संती । यापरती विश्रांती न मिळे जीवा ।।
अशा उत्कट भावानंदात सेना पंढरीला येऊन पोचले. विटेवर उभ्या असलेल्या सावळ्या विठ्ठलाला पाहून कृतार्थ जाले. ते म्हणतात, “या पंढरीनाथे माझे मन असे वेधून घेतले की ते आता काही केल्या तेथून उठतच नाही!”सेना पंढरीला येऊन, पांडुरंगाचे दर्शन घेऊन तृप्त झाले. त्यांना नामदेव गोराकुंभारादी संत भेटले पण तोवर ज्ञानेश्वर व त्यांच्या भावंडांनी समाधी घेतली होती! परंतु आता सेनांची दृष्टी आदिअंतात अडकणारी राहिली नव्हती. आत्म्याचे अविनाशीपण सेना जाणून होते. ते या चारही भावंडांच्या समाधीस्थळी त्यांचे दर्शन घेण्यास गेले. जसे पंढरीला पंढरीनाथाची पाषाणमूर्ती असूनही तिच्यात अवघ्या विश्वातील चैतन्याचा गाभा अनुभवता आला. तसेच त्रंबकेश्वरी निवृत्तीनाथांच्या समाधीचे, आळंदीला ज्ञानराजांच्या समाधीचे, सासवडला सोपानदेवांच्या समाधीचे तर मुक्ताईनगरला मुक्ताईच्या समाधीचे दर्शन घडल्यावर प्रत्यक्ष ही सर्व मंडळी भेटल्याचीच सेनांना अनुभूती आली ! ते म्हणतात,
निवृत्ति निवृत्ति । म्हणता पाप नुरेचि ।।
ध्यान धरिता निवृत्ती । आनंदामय राहे वृत्ति ।।
येऊनी नरदेहासी । वाचे उच्चारी ज्ञानेश्वर ।।
तयाचा संसार । सुफळ झाला गे माये ।।
वाचे सोपान म्हणता । चुके जन्ममरण चिंता ।
मूळ आदिमाया साचार धरी अवतार मुक्ताई ।।
असे चारही अलौकिक भावंडाचे माहात्म्य सेनांच्या अभंग गाथेत आहे. अतिशय प्रासादिक, गोड भाषेत त्यांनी अभंग रचना केली आहे. हे सर्व अभंग आत्मानुभवाने संपन्न आहेत. विशेष म्हणजे सेना मध्य प्रदेशातील असूनही त्यांचे सर्व अभंग मराठीत आहेत. त्यांचे एकूण १६५ अभंग उपलब्ध आहेत. आपल्या व्यवसायावरील त्यांचा अभंग प्रसिद्ध आहे.
आम्ही वारीक वारीक । करू हजामत बारीक ।।
विवेक दर्पण आयना दाऊ ।
वैराग्य चिमटा हालवू ।।
उदक शांती घेई घोळू ।
अहंकाराची शेंडी पिळू ।।
भावार्थाच्या बगला झाडू ।
कामक्रोध नखे काढू ।।
चौवर्णा देऊनी हात । सेना राहिला निवांत ।।
आपल्या सर्व संतमंडळींचे वैशिष्ट्य हेच की त्यांनी आपापला व्यवसाय निष्ठेने सांभाळला. आपल्या प्राप्त कर्मांना भगवंताचे अधिष्ठान दिले. भक्तिपूर्ण कर्मयोगाचा उत्कृष्ट आदर्श उभा केला ! सेना आपणास आवाहन करतात,
असाल तेथे नामाचे चिंतन ।
याहुनि साधन आणिक नाही ।।
सोडवील माझा भक्तांचा कैवारी ।
प्रतिज्ञा निर्धारी केली आम्ही ।।
गुण दोष याती न विचारी काही ।
धावे लवलाही भक्तकाजा ।।
अवघे काळी वाचे म्हणा नारायण ।
सेना म्हणे क्षण जाऊ न द्या ।।
याच हरिनामस्मरणाच्या आधारे भगवंताशी पूर्ण तादात्म्य पावून सेना श्रावण वद्य द्वादशीला समाधीस्थ झाले! त्यांच्या पवित्र दैवी स्मृतीला नमन..!!