आत्मज्ञान-प्राची परचुरे-वैद्य
काही जणांना सवय असते आजचे काम उद्या किंवा नंतर करण्याची, त्याचवेळेला ते काम संपवले जात नाही. बरेचदा ते काम संपेपर्यंत तितका वेळ नसतो किंवा ते आजच करण्याची इच्छा नसते. माणसाचं आयुष्य म्हणजे काळ, काम आणि वेग यांचा मेळ असतो. हा मेळ ज्याचा त्याचा वेगळा असतो; परंतु आपल्या साऱ्यांची सुरुवात आणि अखेर सारखीच असते. फक्त त्यामधलं जगणं आपापल्या कर्माचं, प्रयासाचं असतं. इथंच प्रत्येकाचं जगणं दुसऱ्याहून वेगळं वाटू शकतं, वाटतंही. पण, संतांच्या दृष्टीनं पाहिलं तर ते सारखंच असतं.
कबीर काळाविषयी, कर्मभोगाविषयी आणि जीवनगतीविषयी मूलभूत चिंतन करतात आणि आपल्या जगण्याच्या दिशेला उजळ करतात. हे चिंतन आपल्याला भौतिक काळाची सार्थ जाणीव देतं आणि आपण निर्माण केलेल्या आठवणी, संकल्प, स्वप्नं आणि कल्पना या मानसिक काळापासून मोकळं करतं.
कबीर म्हणतात...
रात गंवाई सोयकर
दिवस गंवायो खाय।
हिरा जनम अमोल था
कौडी बदले जाय।।
आपण दिवसभर कष्ट करत असतो, त्यात दिवस कसा निघून जातो काहीच कळत नाही. पुन्हा दुसऱ्या दिवशी तेच जीवनकार्य सुरू होते. या सर्वांमध्ये आपण आपले खरे जगणेच विसरतो. देहाची तहान-भूक भागवणं एवढंच आपलं जगणं असतं का? आणि मग आपण असेच जगत आहोत तर मग चिंतन-मनन कधी करणार? असे म्हणतात, आपल्याला हा एकदाच मनुष्य जन्म मिळाला आहे मग या जन्माचे मूल्य आपण कधी ओळखणार? आपल्याला लाभलेला माणसाचा जन्म एखाद्या अनमोल हिऱ्यासारखा आहे. त्याचं मूल्य वेळीच न जाणल्यानं आपण आपल्या जगण्याची दिशा हरवतो; चुकीच्या वाटेवरून चालत राहतो. अशी दिशा आणि वाट चुकण्यानं आपल्याला लाभलेल्या माणसाच्या जन्माचा हा अनमोल हिरा मातीमोल होतो. वरील दोह्यातून कबीर आपल्याला सावधपणे जगण्याची रीत देतात. हे सावधपण आपल्याला खाणं, पिणं, झोपणं, सुखात हरवणं यांतला यथार्थ दाखवणारं आहे. तो कळणं हीच आपल्या जगण्याची स्थिती आहे. ती ध्यानात आली की वाट्याला आलेला काळ फक्त सुखाचं माध्यम होणार नाही, तर तो आत्महित साधण्याचं साधन होईल.
माणसाला काळाचे भानही असावे. प्रत्येकाला आपला काळ कधी येईल काहीच माहीत नाही. हे जगणं बेभरवशाचं आहे. काही सेकंदात होत्याचं नव्हतं होऊ शकतं. हे जाणून जे उद्याचे कार्य ते आजच करावे, या क्षणीच करावे. गेलेला क्षण परतून येत नाही. त्यामुळे भूतकाळ विसरून वर्तमानात जगावे आणि प्रत्येक क्षण आत्महितासाठी व्यतित करावा. सुखदु:ख हे येणारच आहेत त्यावेळेस आपल्याला कुठलं कर्म करायला आवडतं आणि कुठलं कर्म केल्यानं आपल्याला अखेरीस समाधान, शांतता लाभते, सुखाचे दिवस येतात आणि जातातही. आयुष्याची नौका जर व्यवस्थित किनाऱ्यावर पोचायला हवी असेल तर या सुखाच्या दिवसांत एखादा गुरू करावा. त्यांच्या सान्निध्यात आपल्या जीवनाचा काही काळ व्यतीत करावा. आपले मूलभूत प्रश्न त्यांना विचारावेत नि समाधान करून घ्यावं, त्यांच्या सहवासात उरलेल्या आयुष्याचं सार्थक करावं. त्यानंतर दु:ख आले तरी जीवनाचे गमक कळलेले असल्याने आपण पूर्वीसारखे दु:खी होणार नाही कारण ही वेळही निघून जाणार आहे. काळ पुढे सरकणार आहे. त्यामुळे गुरूच्या मार्गदर्शनाने जीवनाचे सार्थक करून घ्यावे काळ पुढं निघून गेल्यावर पश्चात्ताप करून काय उपयोग? जीवनात कायम सावध राहावे, कोण चांगले वा कोण वाईट हे समजणे आवश्यक आहे. आपल्या विहित कर्मांच्या बाबत आपली तत्परता, जाणिवेची तीव्रता आणि सावधानता आणि आपले आत्महित अतिशय महत्त्वाचे आहे. त्यामुळे कोणतेही चांगले कर्म करताना त्यात वेळ न दवडता जितक्या लवकर करणे शक्य असेल तितक्या लवकर करावे.