BMC : पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्यासाठी ६८१ शोष खड्डे

तब्बल ५७६ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांवर उभारणी पाणी मुरवण्याची सोय


आतापर्यंत ७०० पैंकी ५७६ किलोमीटर रस्त्यांचे काम पूर्ण


मुंबई (विशेष प्रतिनिधी) : खड्डेमुक्त रस्ते उपक्रमांतर्गत मुंबई महानगरपालिकेने (BMC) रस्‍ते काँक्रिटीकरण प्रकल्‍प हाती घेतला आहे. काँक्रिटीकरण टप्पा १ आणि टप्पा २ अंतर्गत नियोजित ७०० किलोमीटर रस्त्यांपैकी आजपर्यंत ५७६ किलोमीटर रस्त्यांचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले असून, प्रकल्पांतर्गत सुमारे ८१ टक्के काम पूर्ण झाले आहे. काँक्रिटीकरण प्रकल्पाचा अविभाज्य घटक म्हणून पर्जन्यजलाचे प्रभावी व्यवस्थापन आणि भूजल पुनर्भरणाला चालना देण्यासाठी शोष खड्ड्यांची उभारणी करण्यात आली आहे. त्यानुसार मुंबई शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरे या तीनही विभागांमध्ये मिळून आतापर्यंत एकूण ६८१ शोष खड्ड्यांची निर्मिती पूर्ण करण्यात आली आहे. या शोष खड्ड्यांमुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास मदत होणार असून जलनि: स्सारण यंत्रणेवरील ताण कमी होण्यासही हातभार लागणार आहे.



आजपर्यंत ५७६ किलोमीटर रस्त्यांचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले असून हे सर्व रस्‍ते वाहतुकीस खुले करण्‍यात आले आहेत. निर्धारित कालमर्यादेत, गुणवत्ता निकषांचे काटेकोर पालन करुन प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. मुंबई महानगरपालिका आयुक्‍त आश्विनी भिडे यांच्‍या मार्गदर्शनात मुंबई महानगरपालिका प्रशासनाने मुंबई महानगरातील पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी व्यापक नियोजन करुन सिमेंट काँक्रिटीकरण प्रकल्प हाती घेतला आहे. त्‍यामुळे रस्ते प्रवास अधिक सुकर होत आहे. काँक्रिट रस्त्यावर पावसामुळे खड्डे पडण्याचे प्रमाण अत्यल्प असून पर्यायाने परिरक्षणाचा खर्च कमी झाला आहे. तसेच, काँक्रिट रस्ते दीर्घकाळ टिकतात. त्यामुळे, मुंबईतील नागरिकांना खड्डेमुक्त रस्ते उपलब्ध होत आहेत. त्‍याचे दूरगामी सकारात्‍मक परिणाम दिसून येत आहेत. काँक्रिटीकरणामुळे पावसाच्या पाण्याचा नैसर्गिक निचरा अबाधित राहावा आणि भूजल पुनर्भरणाला गती मिळावी, यासाठी प्रकल्प अंतर्गत शोष खड्डे विकसित करण्यात आले आहेत.



अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (प्रकल्‍प) अभिजीत बांगर म्‍हणाले की, रस्‍ते काँक्रिटीकरण प्रकल्प राबविताना पावसाच्या पाण्याचा नैसर्गिक निचरा आणि भूजल पुनर्भरण यांचा विशेष विचार करण्यात आला आहे. पावसाचे पाणी जमिनीत मुरण्‍यासाठी रस्‍ते कामामध्ये शोष खड्डे निर्माण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. हे शोष खड्डे पावसाचे पाणी साठवून ते हळूहळू जमिनीत झिरपण्यास मदत करतात, ज्यामुळे भूजल साठ्याचे पुनर्भरण होते. शोष खड्ड्यांमध्ये दगड, खडी आणि वाळू यांसारखे फिल्टर माध्यम वापरले जाते. रस्त्यांवर किंवा गटारांमध्ये साचलेले पावसाचे पाणी या खड्ड्यांमध्ये वळविले जाते आणि तेथून ते जमिनीच्या खोल स्तरांपर्यंत झिरपते. यामुळे पावसाचे पाणी वाया न जाता स्थानिक स्तरावर साठविले जाते आणि भूजल पातळी टिकवून ठेवण्यास मदत मिळते. तसेच अतिवृष्टीच्या काळात पाणी साचण्याचे प्रमाण कमी होऊन नागरी भागातील जलनि:स्सारण व्यवस्थेलाही हातभार लागतो. पूर्ण झालेल्या काँक्रिटीकरण कामात मार्च २०२६ पर्यंत मुंबई शहर, पूर्व उपनगरे व पश्चिम उपनगरे येथे एकूण ६८१ शोष खड्यांची निर्मिती पूर्ण झाली आहे. मुंबईतील उर्वरित सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण पूर्ण होत असताना, त्यासोबत आणखी शोष खड्ड्यांची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यामुळे संपूर्ण महानगरात पर्जन्यजल व्यवस्थापन प्रणाली विकसित होण्यास मदत होईल, असेही बांगर यांनी नमूद केले.



शोषखड्डे कसे तयार करतात


सिमेंट काँक्रीट रस्त्यांच्या बांधकामामध्ये रस्त्यावर साचणारे पावसाचे पाणी जलदगतीने जमिनीत मुरावे, भूजल पुनर्भरण व्हावे तसेच रस्त्याच्या पृष्ठभागावर पाणी साचून रस्त्याचे नुकसान होऊ नये या उद्देशाने आवश्यक त्या ठिकाणी शोषखड्डे ( सोक पीट) तयार करण्यात येतात. शोषखड्ड्यासाठी प्रथम निवडलेल्या जागेवर साधारणतः १.०० ते १.५० मीटर व्यासाचा (गोलाकार) किंवा १.०० × १.०० मीटर ते १.५० × १.५० मीटर (चौकोनी) आकाराचा आणि १.५० ते ३.०० मीटर खोलीचा खड्डा खोदला जातो. खोदकाम पूर्ण झाल्यानंतर खड्ड्याचा तळ काँक्रीट न करता नैसर्गिक मातीवरच ठेवला जातो, जेणेकरून पाणी जमिनीत सहज झिरपू शकेल.


शोषखड्ड्याच्या वरच्या भागावर सुमारे १०० ते १५० मि.मी. जाडीचा आरसीसी स्लॅब देऊन त्यामध्ये तपासणी व देखभालीसाठी मॅनहोल कव्हर बसविण्यात येते. शोषखड्ड्याचे स्थान निवडताना तो पिण्याच्या विहीर, बोअरवेल किंवा इतर पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांपासून सुरक्षित अंतरावर ठेवण्‍यात येतो. दोन शोषखड्डयांमध्‍ये ४०० ते ५०० मीटरचे अंतर ठेवण्‍यात येते. अशा प्रकारे तांत्रिक मानके, विभागीय विनिर्देश आणि गुणवत्तेच्या निकषांचे पालन करून तयार केलेले शोषखड्डे पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा करतात, भूजल पातळी वाढविण्यास मदत करतात, रस्त्यावर पाणी साचणे टाळतात आणि सिमेंट काँक्रीट रस्त्याचे आयुष्य व टिकाऊपणा वाढविण्यास महत्त्वपूर्ण योगदान देतात.

Comments
Add Comment

Chembur Bus Accident : चेंबूरमधील झाड दुघर्टनेेचे स्थायी समितीत तीव्र पडसाद

उद्यान अधिकारी, रस्ते अभियंता आणि सहायक आयुक्तांना निलंबित करा त्रयस्थ व्यक्ती मार्फत चौकशी करण्याचे स्थायी

जीएसटी' मध्ये महाराष्ट्र ही देशाची राजधानी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

९ वा वस्तू व सेवा कर दिवस समारंभ मुंबई: देशात सर्वात जास्त वस्तू व सेवा कर संकलन करण्यामध्ये महाराष्ट्र हे

Powai Lake Overflowing : आनंदवार्ता! मुंबईला पाणीपुरवठा करणारा पवई तलाव दुथडी भरून वाहू लागला; पावसामुळे जलसाठ्यात मोठी वाढ

मुंबई : मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे

Mumbai Rains Traffic : मुंबईकरांनो सावधान! मुसळधार पावसाने शहर ठप्प; वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर प्रचंड वाहतूक कोंडी

मुंबई : मुंबईत रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता वाहतुकीलाही बसू लागला आहे. पश्चिम उपनगरात

Walkeshwar Accident : वाळकेश्वरमध्ये भिंत कोसळून एकाचा मृत्यू; बाबुलनाथ रोडवरील दुर्घटना

मुंबई : वाळकेश्वर (Walkeshwar) परिसरातील बाबुलनाथ रोड (Babulnath Road) येथील सूर्यप्रकाश इमारतीत (Surya Prakash Building) मंगळवारी (३० जून) रात्री

Vijaya Mehta : मराठी नाट्यसृष्टीवर शोककळा; ज्येष्ठ दिग्दर्शिका विजया मेहता यांचे निधन

मुंबई : मराठी रंगभूमीला नवे विचार, नवी दिशा आणि असंख्य गुणी कलाकार देणाऱ्या ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शिका (Theatre Director)