पुणे : पुण्याजवळील लोहगड किल्ल्याच्या भयावह दरीत केतन अग्रवाल (Ketan Agrawal) या तरुणाला ढकलून दिलेल्या प्रकरणाचा तपास आता निर्णायक वळणावर पोहोचला आहे. गुन्हे शाखा आणि पोलिसांच्या तांत्रिक तपासामधून रोज नवनवीन आणि धक्कादायक खुलासे होत आहेत. मुख्य आरोपी सिया गोयल (Siya Goyal) आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी (Chetan Chaudhari) यांच्या प्रेमकहाणीची सुरुवात नेमकी कशी झाली आणि त्यांनी हत्येचा कट कसा रचला, याचा संपूर्ण घटनाक्रम आता पोलिसांच्या हाती लागला आहे. तसेच, सियाचा भाऊ साहिल (Sahil) याची तब्बल १० तास चाललेली मॅरेथॉन चौकशी या प्रकरणाला वेगळी दिशा देण्याची शक्यता आहे.
पुणे : बहुचर्चित केतन अग्रवाल हत्या प्रकरणात न्यायालयीन लढाईला आता नवे वळण मिळाले आहे. एकीकडे आरोपी सिया गोयलच्या बचाव पक्षाने तिच्याविरोधात ...
क्रिकेटच्या पीचवर जुळले प्रेमाचे धागे
सिया आणि चेतनची प्रेमकहाणी कोणत्याही कॉलेज कट्ट्यावर किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू झाली नव्हती, तर त्याला निमित्त ठरले होते एक क्रिकेटचे मैदान. सियाचा सख्खा भाऊ साहिल आणि चेतन हे एकाच टीममधून क्रिकेट खेळायचे. भावाचा खेळ पाहण्यासाठी सिया अनेकदा मैदानावर हजेरी लावायची. याच ठिकाणी सिया आणि चेतनची पहिल्यांदा नजरानजर झाली. या ओळखीचे रुपांतर पुढे एका मित्राच्या दिवाळी पार्टीत भेटीत झाले. या पार्टीनंतर दोघांमधील जवळीक वाढली आणि मैदानावर सुरू झालेल्या साध्या मैत्रीने लवकरच एका गडद प्रेमसंबंधाचे स्वरूप धारण केले.
२००४ कॉल्स आणि २३८ तासांची 'खलबते'
केतन अग्रवालसोबत सियाचे लग्न निश्चित झाले होते, पण तिचे मन चेतनमध्येच अडकले होते. पोलिसांच्या हाती लागलेल्या 'कॉल डिटेल रेकॉर्ड्स' (CDR) मधून एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या काही महिन्यांत सिया आणि चेतनने एकमेकांना तब्बल २००४ वेळा फोन केला होता. या दोघांनी फोनवर एकूण २३८ तास चर्चा केली आहे. केतनशी लग्न ठरल्यानंतरही हे दोघे तासनतास एकमेकांच्या संपर्कात होते. याच दीर्घ संवादादरम्यान केतनला कायमचे संपवण्याचा आणि त्याला दरीत ढकलण्याचा भयानक कट शिजला असावा, असा पोलिसांचा ठाम कयास आहे.
साहिलची १० तास कसून चौकशी
१८ जूनच्या त्या काळळ्या दिवशी लोहगडावर केतनला मृत्यूच्या दरीत लोटले गेले. या घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता, भर उन्हात हुडी, तोंडावर मास्क आणि कानात हेडफोन लावलेला एक संशयित तरुण गडावर वावरताना दिसला. तपासात निष्पन्न झाले की, तो तरुण दुसरा कुणी नसून स्वतः चेतन होता. पोलिसांना संशय येऊ नये म्हणून त्याने आपला मोबाईल एका दुकानात कामगाराकडे ठेवून दिला होता. चेतन हा सियाचा भाऊ साहिलचाही जिवलग मित्र होता. त्यामुळे या भयंकर कटाची साहिलला आधीच कुणकुण होती का? की अनावधानाने त्याने या गुन्ह्यात मदत केली? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी साहिलला ताब्यात घेऊन सलग १० तास त्याची कसून चौकशी केली.
स्वतःला वाचवण्याची धडपड : आरोपींचा एकमेकांवरच पलटवार
सध्या सिया आणि चेतन दोघेही पोलिसांच्या कोठडीत आहेत. मात्र, आता तुरुंगाची हवा खावी लागल्याने या प्रेमीयुगुलाने स्वतःची कातडी वाचवण्यासाठी एकमेकांवरच आरोप करण्यास सुरुवात केली आहे. चेतनने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, "माझा उद्देश फक्त सियाला घेऊन पळून जाण्याचा होता, पण केतनला ठार मारण्याचा हट्ट सियानेच धरला होता." याउलट, सियाने सर्व खापर चेतनवर फोडत, "हत्येचा संपूर्ण प्लॅन चेतनच्याच डोक्यातील होता," असा दावा केला आहे. आता पोलीस या दोघांना समोरासमोर बसवून सत्य वदवून घेण्याचा प्रयत्न करत असून, या षड्यंत्रात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा कसून शोध घेतला जात आहे.






