Thursday, June 25, 2026

गोकुळ गीते यांच्या रूपाने शिवसेनेला नाशिकमध्ये आणखी बळ

गोकुळ गीते यांच्या रूपाने शिवसेनेला नाशिकमध्ये आणखी बळ

नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या निकालाने राजकीय समीकरणांना हादरा दिला आहे. महायुतीचे सर्वस्व पणाला लागलेले असतानाही, अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी विजय मिळवला. या विजयानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने, नाशिकच्या राजकीय पटलावर आता शिवसेनेचे पारडे जड होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. नाशिक विधान परिषद निवडणुकीचा निकाल राज्यभरात चर्चेचा विषय ठरला. राज्यात महायुतीचे संख्याबळ आणि राजकीय वर्चस्व असतानाही नाशिकमधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणारे गोकुळ गीते यांनी विजय मिळवत सर्वांनाच धक्का दिला. महायुतीकडे आवश्यक संख्याबळ असूनही गीते यांनी मिळवलेला विजय हा केवळ राजकीय गणितांना छेद देणारा नव्हे, तर स्थानिक पातळीवरील संघटनशक्ती आणि वैयक्तिक जनाधाराचेही प्रतीक मानला जात आहे. नाशिकमध्ये, विशेषतः निफाड तालुक्यात आ. गोकुळ गीते यांच्या रूपाने शिवसेनेला आणखी बळ मिळणार आहे. विजयानंतर गोकुळ गीते यांनी विशेष विमानाने मुंबईत जाऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी विधान परिषदेत शिवसेनेचे सहयोगी सदस्य म्हणून काम करणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले. त्यामुळे त्यांच्या संभाव्य शिवसेना प्रवेशाची चर्चा अधिक रंगू लागली असून नाशिक जिल्ह्यासह विशेषतः निफाड तालुक्यातील राजकीय समीकरणांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सुमारे तीन वर्षांनंतर झालेल्या या विधान परिषद निवडणुकीत नाशिकची निवडणूक संपूर्ण राज्याच्या केंद्रस्थानी राहिली. अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांची उमेदवारी मागे घेण्यासाठी महायुतीतील अनेक वरिष्ठ नेत्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मंत्री उदय सामंत, पालकमंत्री दादा भुसे तसेच भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे मंत्री गिरीश महाजन यांनी सलग चार ते पाच दिवस नाशिकमध्ये तळ ठोकून राजकीय घडामोडींना वेग दिला. अनेक चर्चांनंतर गीते यांनी प्रचार थांबवण्याची घोषणा केल्याचेही सांगितले गेले. मात्र त्यांचे कार्यकर्ते, समर्थक आणि स्थानिक पदाधिकारी निवडणुकीच्या मैदानातून माघार घेण्यास तयार नव्हते. त्यांनी प्रचाराची धुरा स्वतः सांभाळत निवडणूक गोकुळ गीते यांच्या विजयापर्यंत नेली. दुसरीकडे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव दराडे यांचा मोठा वेळ प्रचारापेक्षा गीते यांच्या माघारीच्या प्रयत्नांमध्येच खर्च झाला. पुरेसे संख्याबळ असल्याच्या विश्वासामुळे दराडे यांच्याकडूनही अपेक्षित आक्रमक प्रचार दिसून आला नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. निवडणुकीदरम्यान शिवसेना आणि भाजपच्या अनेक लोकप्रतिनिधींना नाशिकमध्ये पाठविण्यात आले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः सेनेच्या लोकप्रतिनिधींशी संवाद साधत परिस्थितीचा आढावा घेतला होता. मात्र अंतिम निकालाने सर्वच राजकीय अंदाज फोल ठरवले. निफाड तालुक्यात सध्या विविध पक्षांतील प्रभावी नेत्यांमध्ये राजकीय स्पर्धा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)मधून दिलीप बनकर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून माजी आमदार अनिल कदम आणि भाजपकडून यतीन कदम हे आपापली ताकद वाढविण्याच्या प्रयत्नात आहेत. अशा परिस्थितीत गोकुळ गीते यांचा उदय हा निफाडच्या राजकारणातील महत्त्वाचा घटक ठरू शकतो. गीते यांनी शिवसेनेशी जवळीक वाढविल्यास तालुक्यात शिवसेनेला नव्या सामाजिक आणि राजकीय आधाराची भर पडू शकते. स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी क्षेत्र आणि ग्रामीण भागातील त्यांचा प्रभाव लक्षात घेता भविष्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार राहुल ढिकले यांच्याविरोधात गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून गणेश गीते यांनी उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत गणेश गीते यांनी उल्लेखनीय मताधिक्य मिळवत स्वतःचे स्वतंत्र राजकीय अस्तित्व सिद्ध केले होते. त्यामुळे गीते कुटुंब आणि भाजपमधील एका गटाचा सुप्त राजकीय संघर्षाची चर्चा तेव्हापासून सुरू आहे. तो संघर्ष वाढत असल्याचे गणेश गीते यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. आता गोकुळ गीते यांच्या विजयामुळे या संघर्षाला आणखी धार मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नाशिक जिल्ह्यातील आगामी राजकीय घडामोडींमध्ये गीते बंधूंची भूमिका अधिक प्रभावी ठरू शकते, असा अंदाज राजकीय निरीक्षक व्यक्त करत आहेत.गणेश गीते यांना भारतीय जनता पक्षाने सलग दोन वेळा मनपा स्थायी समिती सभापतीपदाची संधी दिली होती, तर गोकुळ गीते यांनी अपक्ष उमेदवार म्हणून विधान परिषदेत प्रवेश मिळवत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. विजयानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना विशेष विमानाने मुंबईत बोलावून घेतल्याने राजकीय चर्चांना अधिक उधाण आले आहे. भविष्यात गोकुळ गीते यांना शिवसेनेत संघटनात्मक किंवा अन्य महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते, अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात गीते बंधूंचा वाढता प्रभाव आणि त्यांची राजकीय रणनीती याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. नाशिक विधान परिषद निवडणुकीने एक गोष्ट मात्र स्पष्ट केली आहे, पक्षीय गणितांपेक्षा स्थानिक पातळीवरील जनाधार, कार्यकर्त्यांची निष्ठा आणि नेतृत्वावरील विश्वास अधिक महत्त्वाचा ठरू शकतो. गोकुळ गीते यांच्या विजयाने हे पुन्हा एकदा सिद्ध झाले असून, त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा