कपटफुलांच्या रानगंधात

ऋतुराज-ऋतुजा केळकर


एका तळ्यात होती
बदके पिले सुरेख
होते कुरूप वेडे
पिल्लू तयात एक...”

दुरून येणारे आशा दीदींचे हे स्वर कानी आले आणि परवाचा एक प्रसंग सहजच डोळ्यांसमोर उभा राहिला. काही दिवसांपूर्वी आमच्याच ओळखीतील एक व्यक्ती, वय अगदी कोवळे जवळ जवळ तीस-पस्तीस. अचानक हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्याचे निधन झाले. तसा तो मुलगा दिसायला काळा-सावळाच खरंतर दुर्लक्षितच पण नेहमीच प्रत्येकाच्या मदतीकरिता धावणारा आणि जेव्हा जयमाला घालायची वेळ यायची तेव्हा मात्र दुसराच कुणीतरी बाजी मारून जायचा आणि अशातच सोसायटीत पूजेचा घाट घातला गेला आणि मग मात्र ‘त्याची’ तीव्रतेने आठवण आली. जेव्हा तो होता तेव्हा त्याला खिचगणतीतदेखील न घेणारे आज त्याची आठवण काढून काढून डोळे ओले करत होते.कसं आहे ना की, माणसाचं मन अनेकदा धुक्याच्या पडद्यामागे लपलेल्या सूर्यकिरणासारखं असतं. माणूस जिवंत असताना त्याचं तेज आपल्याला दिसत नाही, कारण आपण त्याचं अस्तित्व गृहीतच धरतो. जणू एखादं झाड रोज सावली देतं, फळं देतं, पण आपण त्याच्याकडे लक्षच देत नाही. मात्र ते झाड कोमेजलं की, त्याच्या सावलीची उणीव मनाला चटका लावते. तसंच, माणसाच्या आयुष्यातही होतं, जिवंत असताना त्याला कमी लेखणारे, दुर्लक्षित करणारे लोक, त्याच्या कायमच्या अनुपस्थितीत मात्र डोळे भरून त्याच्या आठवणी काढतात.

आता असं पाहा की, एखाद्याच्या मृत्यूच्या वेळी देखील लोकांचा स्वभाव हा वाऱ्याच्या झुळुकीसारखा क्षणभंगुर असतो. अंत्यविधीच्या वेळीही लोक विचारतात, “अजून किती वेळ आहे?” किंवा “अस्थी घरात न आणता बाहेर टांगून ठेवतात” आणि मग काही विशिष्ट विधी पूर्ण झाल्यावर, जन पळभर म्हणतील हाय हाय” या तालावर पुन्हा रोजच्या कामाला लागतात. हे दृश्य अगदी संध्याकाळच्या सूर्यास्तासारखं आहे. क्षणभर आकाश लालसर होतं, मनाला वेदना जाणवते, पण लगेचच अंधार पसरतो आणि लोक पुन्हा आपल्या धावपळीत गुंततात. मृत्यूच्या क्षणी वाहिलेली अश्रूंची नदी ही फक्त पश्चात्तापाची लाट असते पण जिवंत असताना दिलेला सन्मान हा आत्म्याला खऱ्या अर्थाने राजहंसासारखी भरारी घेण्याचं बळ देतो. बाह्य रूप कुरूप वाटलं तरी त्याच्यातील तेज हे परमप्रकाशाशी जोडलेलं असतं. जिवंत असताना दिलेला सन्मान हा आत्म्याला उंच भरारी घेण्याचं बळ देतो आणि तोच अध्यात्माचा खरा संदेश आहे.

अध्यात्म सांगतं की शरीर हे मातीचं भांडं आहे, कधी माठ, कधी घट, कधी मडकं. पण आत्मा हा शाश्वत आहे, तो परमप्रकाशाचा अंश आहे. म्हणूनच संत म्हणतात, “जिवंतपणीच सन्मानाने वागणूक द्या.” कारण मृत्यूनंतर केलेले विधी ही फक्त परंपरा असते, पण जिवंत असताना दिलेलं प्रेम, आदर, आणि मान हीच खरी आत्मसाक्षात्काराची पूजा असते. म्हणूनच खरी शहाणपणाची ओळख म्हणजे, ‘जिवंत असताना माणसाला मान देणे. जीवनात हेच सत्य आहे की, दिवसभर सूर्यकिरणांचा प्रकाश असतो, पण आपण त्याचं महत्त्व जाणत नाही. मात्र सूर्य अस्ताला जातो तेव्हा त्याच्या लालसर किरणांनी आकाश रंगून जातं आणि मनाला गूढ वेदना जाणवते. माणसाच्या जाण्याची वेदना ही अशाच अस्ताच्या क्षणासारखी असते. म्हणूनच खरी शहाणपणाची ओळख म्हणजे जिवंत असताना आत्म्याला मान देणे.

माणूस अनेकदा फुलाच्या पाकळ्यांकडे पाहून त्याचा सुगंध विसरतो. बाह्य रूप हे डोळ्यांना भुरळ घालणारं असतं, पण त्यामागे दडलेलं सार हेच खरं मूल्य असतं. संतांनी म्हणूनच सांगितलं आहे की, “ऊस डोंगा परि रस नव्हे डोंगा.” ऊस जरी खडबडीत दिसला तरी त्याच्या आत गोड रस दडलेला असतो. तसंच, माणसाचं बाह्य रूप कुरूप वाटलं तरी त्याच्या अंतःकरणात परमप्रकाशाचा अंश दडलेला असतो. बाह्य रूपावरून माणसाचं मूल्य ठरवू नये, तर त्याच्या अंतःकरणातील तेज पाहावं. जसं आकाश ढगांनी झाकलं तरी त्याची निळाई कायम राहते, तसंच आत्म्याचं स्वरूप शुद्ध आणि अखंड असतं. आता इथे मला असं वाटत की, हे दृश्य अगदी संगीताच्या रागासारखं आहे. एखादा स्वर विसंगत वाटला तरी मूळ सुराशी जोडला की त्याचं माधुर्य फुलतंच, तसंच माणसाचं बाह्य रूप विसंगत वाटलं तरी त्याच्या आत्मस्वराशी जोडला की त्याचं खरं सौंदर्य उमलतं. म्हणूनच कायम अंतःकरणातील प्रकाश ओळखा. कारण खरी गोडी ही उसाच्या रसात आहे, खरी निळाई ही आकाशात आहे आणि खरं तेज हे आत्म्यात आहे.

इथे एक गोष्ट प्रकर्षाने लक्ष्यात येते आणि ती म्हणजे जीवन हे स्वतःमध्येच एक अद्भुत देणगी आहे. विधात्याने प्रत्येकाला वेगळं रूप, बुद्धी, आणि शक्ती दिली आहे. जसं निसर्गात प्रत्येक ऋतूचं वेगळं सौंदर्य असतं, पावसात हिरवाई, उन्हाळ्यात तेज, हिवाळ्यात शांतता तसंच प्रत्येक माणसात त्याचं स्वतःचं तेज असतं. एखादं फूल लालसर, एखादं पांढरं, एखादं नाजूक, पण प्रत्येक फुलात सुगंधाचा अंश असतोच. तसंच, प्रत्येक जीवात परमप्रकाशाचा अंश दडलेला असतो पण, मानवी स्वभावात एक विचित्र प्रवृत्ती असते आणि ती म्हणजे सतत उणिवा दाखवणं. जणू एखाद्या आरशात फक्त डागच दिसावेत, पण त्यातलं तेज दिसू नये आणि अशाच सोबतींचा प्रभाव आत्मविश्वास खच्ची करतो. जसं वाऱ्याची झुळूक सतत ज्योतीला हलवत राहते, तसंच नकारात्मक शब्द आत्म्याच्या ज्योतीला डळमळीत करतात. माणूस मग स्वतःच्या तेजावर शंका घेतो आणि त्याचं आत्मभान धूसर होतं. पण इथेच खरी प्रेरणा महत्त्वाची ठरते. जसं जांबुवंतांनी हनुमानाला त्याचं सामर्थ्य आठवून दिलं, तसं योग्य वेळी मिळालेलं प्रोत्साहन आत्म्याला पुन्हा जागृत करतं. हनुमंत स्वतःचं सामर्थ्य विसरले होते, पण जांबुवंतांच्या शब्दांनी त्याच्या अंतःकरणात सुप्त असलेली शक्ती जागी झाली. हे दृश्य अगदी वाद्याच्या तारांवरून उमटणाऱ्या स्वरासारखं आहे योग्य स्पर्श झाला की विसंगत ताराही मधुर गाणं गाऊ लागतात.जीवनाची खरी देणगी म्हणजे विधात्याने दिलेलं रूप, बुद्धी, आणि शक्ती ओळखणं. सोबतींचा प्रभाव नकारात्मक असेल तर त्याला झटकून टाकणं आणि योग्य प्रेरणेने आत्मभान जागृत करणं हे गरजेचे आहे तरच आपल्या जीवनाच्या गोंदणवाटेची वाटचाल ही अधिकच रेखीव होईल आणि जीवनाच्या अखेरीस आपल्या आयुष्याच्या वाळलेल्या पानाच्या रेषांवर कर्माच्या फुलांची टिंबे ठळकपणे दिसून येतील आणि मग कपटफुलांच्या रानगंधात हरवलेल्या आपल्या आत्म्याला कर्माच्या काजळरेखेची जाणीव होऊन

कांचनमृगी चोळीचे आकर्षण आपोआपचनाहीसे होईल.
अखेरीस माझ्याच शब्दांत सांगायचे झाले तर...
“कपटफुलांच्या रानगंधात वैराण नूपुर वाजती...
डंख देत शाप-उशापातील दग्ध अंतराळ जळती...
पूर्ण-अपूर्णतेतील अंतर मिटविते सत्याची प्रीती...
जीवन पूर्णाकृती उमलते आत्मप्रकाशाशी एकरूप होती...”

Comments
Add Comment

जीवनप्रवास सुखाचा

जीवन संगीत-सद्गुरू वामनराव पै आपण प्रबोधनाचा जो विषय घेतलेला आहे तो म्हणजे संचित ते नशीब. या विषयाशी संबंधित

धार्मिक जीवन

आत्मज्ञान -प्राची परचुरे-वैद्य मानवी जीवनाच्या गुंतागुंतीत ‘धार्मिक जीवन’ ही संकल्पना अत्यंत प्राचीन, परंतु

काश्मिरी स्त्रीसंत लल्लेश्वरी

भारतीय संत-डॉ. अनुराधा कुलकर्णी एका काश्मिरी पंडिताच्या पोटी, श्रीनगरजवळील सिमपूर येथे इ. स. १३२० मध्ये

प्रारब्ध ते पाप- पुण्य

जीवन संगीत-सद्गुरू वामनराव पै मी या आधी श्रीमंत माणसाचे उदाहरण दिले. आता दुसरे उदाहरण घेऊ, ‘सत्ता’.

दवबिंदूतून झिरपणारा प्रकाश

ऋतुराज-ऋतुजा केळकर काळच्या दवबिंदूतून झिरपणारा सूर्यकिरण जसा पाण्याच्या थेंबात चमकतो, तसा आत्मा हा

वेळेचा अपव्यय

आत्मज्ञान-प्राची परचुरे-वैद्य मानवी जीवनातील सर्वांत मौल्यवान संपत्ती कोणती, असा प्रश्न विचारला तर बहुतांश