महेश सावंत
राज्याच्या राजकारणात आपल्या वेगळ्या शैलीने, अभ्यासपूर्ण भूमिकेने आणि दमदार नेतृत्वाने ठसा उमटवणारे नाव म्हणजे नितेश नारायण राणे. तरुण, डॅशिंग, चाणाक्ष आणि अष्टपैलू मंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. हे स्थान त्यांना केवळ वारसाने मिळालेले नाही; त्यामागे आहे अथक परिश्रम, संघर्ष, जिद्द आणि स्वतःची ओळख निर्माण करण्याची धडपड. अशाच एका संघर्षमय प्रवासाचा आज वाढदिवसाच्या निमित्ताने घेतलेला हा मागोवा..
मला आठवतो तो साधारण २००४-०५च्या राणे परिवाराच्या राजकीय संघर्षाचा काळ. याच काळात नितेशजी विदेशातून सिंधुदुर्गात परतले आणि नकळत राजकारणाच्या प्रवाहात ओढले गेले. खरं तर राजकारणापासून दूर राहून विदेशात हॉटेल व्यवसाय करण्याचा त्यांचा विचार होता. मात्र त्या काळातील घडामोडींनी त्यांना जिल्ह्याच्या राजकीय प्रवासात आणून उभे केले. २००४-०५ पासून ते सक्रिय झाले असले तरी पहिली निवडणूक लढवण्यासाठी त्यांना २०१४ सालाची वाट पाहावी लागली. या दहा वर्षांच्या काळात त्यांनी घाई न करता सिंधुदुर्ग जिल्हा समजून घेतला. लोकांशी नाते जोडले, कार्यकर्त्यांचे जाळे उभे केले, विविध लोकहिताची कामे केली आणि त्यानंतरच निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. राज्याच्या राजकारणात वडिलांचे मोठे नाव आणि मोठी राजकीय ओळख असतानाही त्यांनी केवळ त्या आधारावर पुढे जाण्याची घाई केली नाही. स्वतःची ओळख निर्माण केली, स्वतःचे मैदान तयार केले आणि मगच राजकारणाच्या रणांगणात प्रवेश केला. २०१४ हे वर्ष नितेशजींच्या राजकीय आयुष्यात अत्यंत महत्त्वाचे ठरले. याच वर्षी त्यांनी आपल्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत विजय मिळवत आमदार म्हणून राजकीय प्रवासाला सुरुवात केली, तर दुसरीकडे त्यांचे वडील नारायण राणे यांना पहिल्यांदाच मोठा राजकीय पराभव स्वीकारावा लागला. सन २०१४ मध्ये नितेशजींना काँग्रेसकडून कणकवली-देवगड मतदारसंघातून उमेदवारी मिळाली. ही त्यांची पहिलीच निवडणूक आणि तीही थेट आमदारकीची. त्याच वेळी राणे साहेब कुडाळ-मालवण मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. दोन्ही ठिकाणी समान लक्ष देणे सहज शक्य नव्हते. कुडाळ-मालवण मतदारसंघात नारायण राणेंसमोर शिवसेनेचे वैभव नाईक उमेदवार होते. शिवसेनेने राणेंच्या पराभवासाठी पूर्ण ताकद लावली होती. तर कणकवली-देवगड मतदारसंघात नितेशजींसमोर भाजपचे विद्यमान आमदार प्रमोद जठार हे उमेदवार होते. विद्यमान आमदाराला अनुभव, संघटन आणि निवडणुकीची रणनीती याचा फायदा असतो. त्यामुळे नवख्या उमेदवारासाठी अशी निवडणूक लढवणे निश्चितच आव्हानात्मक असते. मात्र या निवडणुकीत नितेशजींनी सर्व समीकरणे बदलत प्रमोद जठार यांच्यावर विजय मिळवला. पहिलीच निवडणूक, पहिलाच विजय आणि थेट विधानसभेत प्रवेश हा क्षण कोणत्याही राजकीय व्यक्तीसाठी अत्यंत आनंदाचा असतो. पण नियतीने या आनंदातही एक वेदना मिसळली होती. कारण त्याचवेळी कुडाळ-मालवण मतदारसंघातून वडिलांचा अनपेक्षित पराभव झाला होता. कल्पना करा, त्या क्षणी नितेशजींच्या मनात किती मोठा भावनिक संघर्ष सुरू असेल. एका बाजूला आयुष्यातील पहिला मोठा विजय आणि दुसऱ्या बाजूला वडिलांचा पहिला पराभव. स्वतःच्या यशाचा आनंद मनापासून साजरा करण्याची संधीही त्यांना मिळाली नाही. तरीही त्यांनी मनातील दुःख चेहऱ्यावर येऊ दिले नाही. संयम ठेवला, परिस्थिती स्वीकारली आणि पुढचा राजकीय प्रवास अधिक ताकदीने सुरू केला. ते केवळ मैदानात उतरले नाहीत, तर त्या मैदानात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत स्थिरावले.
पुन्हा एकदा राजकीय उलथापालथ होत राणे परिवाराचा भाजपमध्ये प्रवेश झाला. पक्षांतराचा निर्णय घेणे आणि नव्या पक्षात स्वतःची ओळख निर्माण करणे हे कधीच सोपे नसते. अनेक वर्षांचे जुने राजकीय संबंध, कार्यकर्त्यांची साखळी आणि विश्वासाचे धागे सोडून नव्या प्रवासाला सुरुवात करावी लागते. मात्र हे शिवधनुष्य नितेशजींनी अत्यंत सहजपणे पेलले. सन २०१९ आणि त्यानंतर २०२४ अशा सलग दोन निवडणुका भाजपच्या माध्यमातून जिंकत त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीतील हॅट्रिक पूर्ण केली. सलग तीन वेळा आमदार होणे ही निश्चितच सोपी गोष्ट नाही. कारण सत्तेत असताना अनेकदा लोकांमध्ये नाराजीची भावना निर्माण होण्याची शक्यता असते. मात्र नितेशजींनी आपल्या कामाच्या जोरावर मतदारसंघातील जनतेच्या मनात वेगळीच जागा निर्माण केली. लोकाभिमुख कामे, आक्रमक भूमिका आणि जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून केलेल्या संघर्षामुळे त्यांनी स्वतःची ओळख एक कार्यसम्राट आणि दमदार आमदार म्हणून निर्माण केली. डंपर आंदोलन असो, बांगडा फेक आंदोलन असो किंवा महामार्गाच्या कामासाठी अभियंत्यांविरोधात केलेले चिखलफेक आंदोलन असो—प्रत्येक वेळी त्यांनी जनतेच्या प्रश्नांना आवाज दिला आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले. याच आक्रमक पाठपुराव्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात महामार्गाचे काम तुलनेने वेगाने पूर्ण झाले. त्यामुळे कोकणातील इतर जिल्ह्यांतील नागरिकांकडूनही “आपल्या जिल्ह्यालाही असा लढवय्या आमदार मिळावा” अशी भावना व्यक्त होऊ लागली. याच काळात कणकवलीतील संतोष परब हल्ला प्रकरण घडले. या प्रकरणात नितेशजींना आरोपी करण्यात आले. विरोधकांसाठी नियेशजी एक मोठे आव्हान ठरत असल्याने त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणात त्यांना कारावासाचाही सामना करावा लागला. राजकीय संघर्षाच्या या काळात त्यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहिले. मात्र संकटांनी खचून जाणारा हा अभिमन्यू नव्हता, तर प्रत्येक चक्रव्यूह भेदण्याची क्षमता असलेला योद्धा होता. या काळाने त्यांना राजकारणातील संघर्ष, सत्ता आणि विरोध यांचे वास्तव जवळून दाखवले. अशा अनेक संघर्षातून तावून-सुलाखून निघालेला हा तरुण नेता २०२४ नंतर मंत्रिपदाच्या प्रवासाकडे गेला. कार्यक्षमता असूनही मंत्रिमंडळ विस्ताराच्या वेळी त्यांचे नाव वारंवार चर्चेत येत राहिले; मात्र प्रत्येक वेळी पदाची संधी हुलकावणी देत होती. अशा परिस्थितीतही त्यांनी संयम सोडला नाही, नाराजी व्यक्त केली नाही आणि आपले काम प्रामाणिकपणे सुरू ठेवले. अखेर १५ डिसेंबर २०२४ रोजी संघर्षातून घडलेल्या या नेतृत्वाच्या नावाची कॅबिनेट मंत्री म्हणून घोषणा झाली. २१ डिसेंबर रोजी त्यांच्याकडे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे ही महत्त्वाची खाती सोपवण्यात आली. राणे साहेबांनंतर प्रथमच कोकणाशी थेट संबंधित असलेल्या या दोन्ही विभागांची जबाबदारी कोकणातीलच एका नेत्याकडे देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही खात्यांचा विश्वास एका सक्षम सहकाऱ्यावर दाखवला. यापूर्वी ही खाती वेगवेगळ्या मंत्र्यांकडे होती; मात्र यावेळी एकाच मंत्र्याकडे जबाबदारी देत त्यांनी नितेश राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. आणि इथून सुरू झाला मंत्री नितेश राणे यांच्या नव्या राजकीय प्रवासाचा एक महत्त्वाचा अध्याय…
देवा भाऊंनी ठेवलेला विश्वास सार्थ ठरवत नितेशजींनी आपल्याकडे असलेली खाती केवळ सांभाळली नाहीत, तर आपल्या कार्यक्षमतेच्या जोरावर ती अक्षरशः पुढे नेली. कोणताही मोठा प्रशासकीय अनुभव पाठीशी नसताना केवळ प्रामाणिकपणा, अभ्यासूवृत्ती आणि काम करण्याची जिद्द या बळावर त्यांनी आपल्या दोन्ही विभागांमध्ये सुसूत्रता निर्माण केली. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या पहिल्या शंभर दिवसांच्या कृती आराखड्यात नितेशजींनी आपल्या बंदरे विभागाला राज्यातील अग्रक्रमाच्या पाचव्या स्थानावर आणले. यापूर्वी मत्स्य विभागाचा मंत्री कोण, याची माहिती सर्वसामान्य जनतेलाच नव्हे तर अनेक मच्छीमार बांधवांनाही फारशी नव्हती. मात्र नितेशजींनी मच्छीमारांसाठी घेतलेले निर्णय, राबवलेल्या योजना आणि केलेले काम यामुळे आज कोळीवाड्यातील लहान मुलालाही आपला मंत्री नितेश राणे आहेत, हे अभिमानाने सांगता येते. हीच त्यांच्या कामाची खरी पावती आहे. मत्स्यव्यवसायाला कृषीचा दर्जा देण्याचा निर्णय, शिपयार्ड धोरण, सागरी सुरक्षेसाठी आणि अवैध मच्छीमारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ड्रोन प्रणाली, अत्याधुनिक गस्ती नौकांची व्यवस्था अशा अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांमधून त्यांनी मच्छीमार समाजाच्या हिताला प्राधान्य दिले आहे. बंदरांवर अनेक वर्षांपासून असलेली अतिक्रमणे हटविण्याची सुरुवात त्यांनी रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदरापासून केली. मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी नितेशजी मुंबईत लवकरच वॉटर टॅक्सी सेवेसारख्या आधुनिक सुविधांना चालना देत आहेत. किनारपट्टीवरील प्रत्येक गावाचा जेटी आणि बंदरांच्या माध्यमातून विकास करण्याचा संकल्प त्यांनी केला असून त्याची अंमलबजावणीही अनेक ठिकाणी सुरू झाली आहे. कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना जाब विचारत, प्रशासनाला गतिमान करत त्यांनी विभागांना नवी दिशा दिली आहे. त्यांच्या कामाचा उत्साह पाहून अधिकारीही नव्या जोमाने कार्यरत झाले आहेत. त्यामुळेच मत्स्य आणि बंदरे ही दोन्ही खाती प्रगतीच्या मार्गावर आहेत. राज्यातील कार्यक्षम मंत्र्यांमध्ये नितेशजींचा उल्लेख आवर्जून केला जातो. राजकीय विरोधक असतानाही अनेकांनी त्यांच्या कामाची दखल घेतली आहे. मत्स्य आणि बंदरे विभागाची जबाबदारी सांभाळतानाच मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे आणि तीही ते यशस्वीपणे पार पाडत आहेत. पालकमंत्री कसा असावा, याचे उदाहरण म्हणजे नितेश राणे. पदभार स्वीकारल्यानंतर प्रशासनात पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्यांनी एआय आधारित कार्यप्रणालीचा अवलंब केला. अशी आधुनिक प्रणाली राबवणारा सिंधुदुर्ग हा राज्यातील पहिल्या जिल्ह्यांपैकी एक ठरला. तरुण पिढीच्या भवितव्याचा विचार करून अवैध धंद्यांना आळा घालणे, अंमली पदार्थांविरोधात कठोर भूमिका घेणे आणि जिल्ह्यात रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी विविध प्रकल्प आणण्यावर त्यांनी भर दिला आहे. हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश देत त्यांनी जनतेच्या अपेक्षांनुसार पालकमंत्र्यांची भूमिका निभावली आहे. सिंधुदुर्गवासीयांच्या अस्मितेचा विषय असलेल्या राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याच्या उभारणीच्या कामाकडे त्यांनी विशेष लक्ष दिले. जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होणारा, गरज पडताच धावून येणारा नेता म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी त्यांनी जनता दरबारांची मालिका सुरू केली आहे. त्यामुळे सिंधुदुर्गच्या जनतेला हा पालकमंत्री आपल्या कुटुंबातीलच एक सदस्य असल्याची भावना निर्माण झाली आहे. सामान्य नागरिकांच्या संदेशांनाही प्रतिसाद देणारा आणि जनतेशी सतत जोडलेला असा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.मत्स्य आणि बंदरे मंत्री म्हणून ज्या कार्यक्षमतेने ते जबाबदारी पार पाडत आहेत, त्याच निष्ठेने आणि संवेदनशीलतेने ते सिंधुदुर्गचे पालकमंत्री म्हणूनही काम करत आहेत. त्यांच्या कार्यातून विकासाला गती मिळत असून जनतेच्या अपेक्षांना न्याय देण्याचा त्यांचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे.
राज्यासह देशासमोर अनेक आव्हाने उभी आहेत. समाजातील विविध प्रश्नांवर ठाम भूमिका घेत, जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी सातत्याने कार्यरत असलेले नितेशजी आज एक कर्तव्यदक्ष मंत्री आणि जनतेच्या विश्वासातील नेता म्हणून पुढे येत आहेत. राज्यात कुठेही अन्याय किंवा अत्याचाराची घटना घडली, तर जनतेच्या मदतीसाठी तत्परतेने धावून जाण्याची त्यांची कार्यपद्धती नेहमीच दिसून येते. आपल्या स्पष्ट आणि परखड भूमिकेमुळे ते लोकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण करत आहेत. मंत्री म्हणून जबाबदाऱ्या पार पाडताना, तसेच मत्स्य आणि बंदरे मंत्री म्हणून काम करताना त्यांनी दाखवलेली कार्यक्षमता कौतुकास्पद आहे. त्याचबरोबर पालकमंत्री म्हणूनही ते सातत्याने जनतेच्या संपर्कात राहून काम करत आहेत. जनता दरबाराच्या माध्यमातून सामान्य माणसाच्या अडचणी ऐकून त्यावर मार्ग काढण्याचा त्यांचा प्रयत्न कायम असतो. सिंधुदुर्गच्या जनतेला ते आपल्या कुटुंबातील व्यक्तीसारखे वाटतात, यामागे त्यांचा जनतेशी असलेला जिव्हाळा आणि सततचा संवाद हेच कारण आहे. दिवस-रात्र जनसेवेसाठी झटणाऱ्या नितेशजींचा आज वाढदिवस. अनेकदा स्नेही त्यांना विश्रांतीचा सल्ला देतात, पण त्यांचे उत्तर असते. “या वयात पळणार नाही तर मग केव्हा पळणार?” जनतेसाठी स्वतःचा वेळ, आराम आणि सुख बाजूला ठेवून काम करणाऱ्या या नेतृत्वाला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. देव त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि जनसेवेसाठी आणखी बळ देवो, हीच सदिच्छा. साहेब, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!






